गर्जना मोर्चा : 'ज्ञानेश कुमार यांना हटवा, निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या', ठाकरे बंधूंनी नेमक्या काय मागण्या केल्या?

फोटो स्रोत, Shivsena YT Screengrab
भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह एसआयआर प्रक्रियेतील मुद्द्यांवर मुंबईत रविवारी गर्जना मोर्चा काढण्यात आला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात सर्वपक्षीयांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता तिरंगा हाती घेऊन हा मोर्चा काढण्यात आला.
रविवारी सकाळी दहावाजेपासून या मोर्चासाठी नागरिक जमायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. एसआयआरच्या प्रक्रियेत ज्यांना नावासंबंधी अडचणी निर्माण झाल्या असे अनेक नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
मुंबईतील मेट्रो सिनेमा परिसरातील या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. मेट्रो सिनेमा ते महानरपालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मोर्चासाठी या परिसरातील एका हॉटेलमध्ये दाखल झाले होते.
याशिवाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यासह महाविकास आघाडीतील इतरही काही नेते मोर्चासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
ठाकरे बंधूंसह थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते या हॉटेलमधून एकत्रितपणेच मोर्चाच्या ठिकाणाकडे रवाना झाले.
राज ठाकरे काय म्हणाले?

फोटो स्रोत, Shivsena YT Screengrab
- मतांमध्ये चोऱ्या सुरू आहेत हे 2017-18 पासून सांगत आहे. निवडणूक आयोगात ईव्हीएम, मतदार याद्या यातील घोळावर पाऊल उचललं पाहिजे, त्यासाठी निवडणुकावर बहिष्कार टाकल्याशिवाय दूध का दूध पाणी का पाणी होणार नाही हे मी सांगत होतो.
- महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला तेव्हा लोकांमध्ये जल्लोषच नव्हता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेपर्यंत सहा महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले.
- सत्तेवर बसले म्हणून नव्हे तर सत्ता कशाप्रकारे राबवली जात आहे, याचा राग आहे.
- सत्तेत आणि विरोधी पक्षात कोणाला बसवायचं हे मतदारांनी ठरवावं निवडणूक आयोगानं नाही.
- उद्योगपतींना जमीनी, विमानतळं देऊन टाकायचं अशी मनमानी करण्याचं धाडस निवडणूक आयोग बरोबर असल्याशिवाय येत नाही. निवडणूक आयोग सोबत असेल तर कसेही निवडून येऊ असं त्यांना वाटतं.
- सत्ता गेली तर काय ही भीतीच त्यांच्यामध्ये दिसत नाही.
- काँग्रेसच्या काळात अनेक उद्योगपती उभे राहिले यांच्या काळात फक्त एक उद्योगपती उभा राहिला.
- सगळी न्यायालयं, माध्यमं निवडणूक आयोग यांनी ताब्यात घेतली आहेत. तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर जे सत्तेत येतील तेही असेच वागले तर काय करणार?
- महाराष्ट्रात आतापर्यंत झालेला SIR पूर्णपणे रद्द झाला पाहिजे.
- माजी केंद्रीय गृहसचिव आर के सिंह यांच्या मते SIR अपवादात्मक परिस्थितीत करता येते. देशात एकाचवेळी एवढी प्रक्रिया करणं बेकायदेशीर आहे. याची कायद्यातच तरतूद नाही.
- दुसरं म्हणजे वोटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. हे झालं तरच दूध का दूध पाणी का पाणी होईल. मग कोणाचीही सत्ता आली तर हरकत नाही.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?

फोटो स्रोत, Shivsena YT Screengrab
- हा लढा देशाचा म्हणजेच स्वातंत्र्याचा लढा आहे. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी मेक इन इंडियाची घोषणा दिली होती. पण हुकूमशहा जर देशात तयार होणार असेल तर हुकूमशाही आम्ही गाडून टाकू.
- देशभरातले 13 कोटी मतदार अचानक वगळले. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येएवढे मतदार वगळले.
- हा लढा कोणत्याही एका पक्षाचा व्यक्तीचा जात पातीचा नाही.
- जो आयुक्त निवडणुकींवर लक्ष ठेवतो त्यांची निवडणूक का होत नाही नेमणूक कशी होते?
- ज्ञानेश कुमार यांची निवडणूक ही पक्षपातीपणे झाली आहे. राहुल गांधी यांनी नियुक्तीला विरोध केला होता.
- वल्लभभाई पटेलांनी मराठवाड्यात हा भाग देशात आणण्यासाठी सेना घुसवली होती. अमित शहांनी बंगालमध्ये एका महिलेविरुद्ध पक्ष जिंकवण्यासाठी सेना घुसवली.
- आपलं पण नुकसान होत आहे हे अंधभक्तांना कळत नाही.
- भाजपला सरकार चालवता येत नाही. याला सूड उगवणं असं म्हणतात. ठाण्यात पूर्णेकरांची हत्या झाली, गृहमंत्री कुठे आहेत.
- संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यावर ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना करू शकत नाही.
- वोट चोरी केलीच पण राम मंदिराच्या दानपेटीची आणि पक्षांचीही यांनी चोरी केली.
- महाराष्ट्रातून वगळलेल्या दोन कोटी मतदारांमध्ये किती बांगलादेशा आहेत हे सरकारनं स्पष्ट करावं.
- बांगलादेशींच्या नावाखाली मतदारांचा अधिकार काढून घेतला जात असेल तर हात उचलावा लागेल.
- आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना इतक्या शिव्या पडल्या नव्हत्या
- हिटलर कोणालाही घाबरत नव्हता पण त्याच्यावर शेवटी स्वतःवर गोळी झाडण्याची वेळ आली. तो गेल्यानंतर त्याच्यासोबत पाप करणाऱ्यांना शोधून शोधून शिक्षा दिली हे भाजप आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं.
- ज्ञानेश कुमारला जे संरक्षण आहे ते देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही देण्यात आलेलं नाही.
'आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, की बांगलादेशी'

फोटो स्रोत, BBC/Shahid Sheikh
ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने एसआयआरची प्रक्रिया आणि ज्ञानेश कुमारांना विरोध दर्शवण्यासाठी आलेल्या काही नागरिकांनी त्यांची विरोधाची कारणं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितली. मतदार यादीतील नावाशी संबंधित अडचणींमुळं यात सहभागी झाल्याचं या सगळ्यांनी सांगितलं. बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी त्यांच्या नावांच्या संदर्भात काही दावे केले आहेत. (बीबीसीनं अद्याप या दाव्यांची पडताळणी केलेली नाही.)
हर्षल चिपळूणकर दावा करतात की, "माझं नाव एसआयआरमधून कापण्यासाठी फॉर्म भरण्यात आला. मी मनसेला तक्रार केली तर त्यांच्या दबावानंतर अखेर बीएलओला नाव टाकावं लागलं. सगळी कागदपत्रं होती तेव्हा माझं नाव राखून ठेवलं नसता माझं नाव काढलं असतं. माझ्या भागातील अडीच हजार मतदारांची नावं कापण्यात आली आहेत."

कृष्णन दावा करतात की, "माझ्या वडिलांच्या नावामध्ये चूक आहे. ही छोटी गोष्ट आहे. पण अनेक लोकांची नावं गाळण्यात आली आहे. लोकांमध्ये याबाबत माहिती नाही. अडवाणी, केजरीवाल, नील्केनी यांच्या नावांमध्ये अडचणी येत असतील तर शोषित वंचितांबाबत काय होईल. त्यामुळं मी विरोध दर्शवण्यासाठी आलो आहे."

प्रशांत गुप्ते दावा करतात की, "माझ्या संपूर्ण कुटुंबाची नावं यादीत होती. एसआयआरचे फॉर्म भरल्यानंतर आईचं नाव जुन्या यादीत नव्हतं तर आमची नावंच आली नाहीत. आता फॉर्म सहा भरायला सांगत आहेत. आधी आमचं रेशन कार्ड सरेंडर करायला सांगितलं, गॅस सबसिडी काढली. आता मतदार यादीतलं नाव काढलं आहे. म्हणजे आमची देशातली ओळख संपत चालली आहे. आम्ही महाराष्ट्रीय आहोत, भारतीय आहोत की बांगलादेशी आहोत याचं उत्तर ज्ञानेश कुमारांनी द्यावं."
ज्ञानेश कुमारांविरोधात वाढता असंतोष
'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रानं इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्टमधून उघड केलेल्या काही बाबींनंतर, गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातत्यानं आयोगाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे.
त्यामुळे, विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तामध्ये, दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप नोंदवल्या आल्याचं म्हटलं होतं.
या वृत्तात प्रामुख्याने 3 मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.
- SIR अंतर्गत मतदारांच्या नावांचा समावेश आणि वगळण्याबाबत 2 निवडणूक आयुक्तांनी घेतलेला आक्षेप.
- फॉर्म 6 मध्ये करण्यात आलेल्या बदलांबाबत नोंदवण्यात आलेला आक्षेप.
- ECINet च्या केंद्रीकरणाचा, ज्यामुळे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांना त्याचा अॅक्सेस मिळत नव्हता.
याशिवाय, द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात गोव्याचे उदाहरण देण्यात आले होते. त्यामध्ये 97 मतदार पात्र ठरल्यानंतरही त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली नसल्याचं म्हटलं होतं.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या ताज्या प्रसिद्धीपत्रकात या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, ANI
या रिपोर्टनंतर, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं देशभरात आंदोलनं केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनंही मुंबईत आंदोलन केलं आहे.
इंडिया आघाडीच्यावतीने 6 ऑक्टोबर रोजी सर्व विरोधी पक्षाचे नेते आणि खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत.
तत्पूर्वी, आज रविवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा दोन्ही ठाकरेंचा मुंबईत मोर्चा होणार आहे.
याआधीही, शिक्षणमंत्री राहिलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत आंदोलन केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
सीजेपीच्या 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल
मुंबईच्या शिवाजी पार्क मैदान परिसरात आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलनाचं आयोजन करणारे आयोजक आणि इतर 400 ते 500 अज्ञात सीजेपी समर्थकांविरोधात शिवाजी पार्क ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनापरवाना बेकायदेशीर जमा जमावणे, लाउडस्पीकरचा वापर, गर्दी जमवून घोषणाबाजी करणे, वाहतुकीला अडथळा तसेच पोलीस आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फोटो स्रोत, ANI
पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीनुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान गेट नंबर 6, मीनाताई ठाकरे स्मारकासमोर आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
यात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेसह आशुतोष रांका, सौरभ दास, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आफरीन नवाज, पीएसयुच्या सौम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मलंगी, योगेश इंगळे व इतर अनोळखी 400 ते 500 सीजेपी समर्थक आंदोलकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 189 आणि 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37(1), 37(3) आणि 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. शिवाजी पार्क पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली.
ते म्हणाले, "आणखी गुन्हे दाखल करा, पण लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढा सुरूच ठेवू!"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)




























