सीजेपी प्रोटेस्ट : या तरुणीला मिळत आहेत बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमक्या, कुटुंबाला सोडावं लागले घर

सीजेपी आंदोलनानंतर 'या' तरुणीला धमक्या; संपूर्ण कुटुंबाला सोडावं लागलं घर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सीजेपी आंदोलनादरम्यान घेण्यात आलेले छायाचित्र
    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

(महत्त्वाची सूचनाः या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली 36 दिवस सुरू असलेलं आंदोलन सरकारशी चर्चा झाल्यानंतर संपुष्टात आलं. परंतु, या आंदोलनाशी संबंधित बातम्या अजूनही समोर येत आहेत.

त्यापैकी काही बातम्या त्या मुलींशी संबंधित आहेत ज्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्समुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

त्यापैकीच एका 15 वर्षांच्या मुलीने एक्सवर एक व्हीडिओ शेअर करत आपल्या भाषेबद्दल माफी मागितली.

या मुलीला भविष्यात फॅशन डिझायनर आणि मेकअप आर्टिस्ट व्हायची इच्छा आहे. परंतु, सध्या दहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीला बोर्डाची तरी परीक्षा देता येईल की नाही, याचीही खात्री नाही. त्यामुळे भविष्यासंदर्भात विचार करणंही तिच्यासाठी सध्या खूप कठीण झालं आहे.

तिच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर 26 जुलैपासून ती आपल्या आईसोबत घर सोडून दुसरीकडे राहत आहे. आता पुन्हा घरी कधी परतता येईल, याची त्यांनाही काहीच माहिती नाही.

इन्स्टाग्राम आणि मित्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर ती मुलगी 22 जुलै रोजी जंतर-मंतरवर गेली होती आणि ती तिथे एका ग्रूपमध्ये सहभागी झाली.

बीबीसी हिंदीला तिने सांगितलं की, आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याचा प्रभाव पडल्यामुळे तिच्या तोंडून असे काही असे शब्द निघाले, जे तिने बोलायला नको होते. याची जाणीव तिला नंतर झाली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. तिची रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.

या प्रकरणात 'झिरो एफआयआर दाखल'

श्रुती (बदललेलं नाव) सांगते, "ही घटना 22 जुलैची आहे. दोन दिवसांनी मी आईला याबद्दल सर्व सांगितलं. रील व्हायरल झाल्यानंतर माझ्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद कमेंट करण्यात आल्या. मला जीवे मारण्याच्या, बलात्कार करण्याच्या आणि माझ्यावर अ‍ॅसिड फेकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. माझ्याबद्दल आक्षेपार्ह शब्दही वापरण्यात आले."

"इतकंच नाही, तर माझ्याविरोधात बक्षीसही जाहीर करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मी खूप घाबरले होते. दोन दिवस मी घराबाहेरही पडले नाही. माझा मोबाइल नंबरही लीक झाला होता. त्यानंतर फोन आणि मेसेजद्वारेही मला अशाच धमक्या मिळत होत्या. हे अजूनही थांबलेलं नाही."

तिची आई सांगते की, त्या सोशल मीडियापासून दूर असतात. पतीच्या निधनानंतर त्या भजनात वेळ घालवतात आणि घर खर्च भागवण्यासाठी छोटी-मोठी कामंही करतात.

हा फोटो 22 जुलैचा आहे. त्यावेळी जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने युवक आंदोलनात सहभागी झाले होते.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, हा फोटो 22 जुलैचा आहे. त्यावेळी जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने युवक आंदोलनात सहभागी झाले होते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुलीकडून हा प्रकार समजल्यानंतर त्या तीन दिवस पूर्णपणे हादरून गेल्या होत्या. काय करावं, कोणाकडे मदत मागावी, हेच त्यांना सुचत नव्हतं, समजत नव्हतं.

तिची आई बीबीसी हिंदीला सांगते, "हे समजल्यावर जणू आमच्यावर एखादा बॉम्बच पडला. माझ्या मुलीने इतके आक्षेपार्ह आणि अर्वाच्य शब्द वापरले, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. कालपर्यंत सगळं सुरळीत होतं, पण एका दिवसात सर्व काही बदलून गेलं."

डोळ्यातील अश्रू पुसत त्या म्हणतात, "कोणी आम्हाला देशद्रोही म्हणतं, तर कोणी दहशतवादी. पाकिस्तानशी संबंध असल्याचेही आरोप केले जात आहेत. 'ही कसली आई आहे?', 'मुलीला असे संस्कार कसे दिले?' अशा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. हे योग्य नाही."

"सर्वांनी माफी मागायला सांगितलं आणि मीही मान्य करते की, तिने शिवीगाळ करायला नको होती, अपशब्द वापरायला नको होतं. आंदोलनाचा विरोध करण्याचा तो योग्य मार्ग नव्हता. एफआयआरमध्येही चुकीची माहिती देण्यात आली होती. ती एफआयआर नंतर रद्द झाली. पण 'आता तुम्ही घरी जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,' असं कोणीच म्हणत नाही."

या प्रकरणी वकील स्मृती सिंह चंदेल यांनी श्रुती विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता.

जंतर-मंतरवरील सीजेपी आंदोलनादरम्यान तैनात सुरक्षा दल.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, जंतर-मंतरवरील सीजेपी आंदोलनादरम्यान तैनात सुरक्षा दल.

त्याचबरोबर तक्रारीत असंही म्हटलं होतं की, या वक्तव्यांमुळे केवळ पंतप्रधानांच्या घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेलाच धक्का बसला नाही, तर जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याचा आणि सार्वजनिक शांतता बिघडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी नोएडा पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केला होता. त्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 352 (शांतता भंग होईल या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे), कलम 353(1) (सार्वजनिक अशांतता निर्माण करणारे वक्तव्यं करणे) आणि कलम 356(1) (मानहानी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलं होतं की, त्या तरुणीचं वक्तव्य चुकीचं असू शकतं, परंतु तिच्याविरोधात अशा प्रकारची कारवाई केली जाऊ नये.

सौरव दास यांनी एक्सवर लिहिलं होतं, "तिच्याविरोधात फौजदारी कायद्याचा वापर करणं योग्य नाही. अपशब्द वापरणं हे स्वतःहून फौजदारी गुन्हा ठरत नाही. लोकसभेतील सुमारे 50 टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सुमारे 100 खासदार भाजपचे आहेत. पोलिसांनी अशा प्रकरणांवर लक्ष द्यावं, एखाद्या 25 वर्षीय तरुणीला लक्ष्य केलं जाऊ नये. तरुणांचा छळ त्वरित थांबवला पाहिजे."

याबाबत बीबीसीने स्मृती सिंह चंदेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांना पोलिसांचा एक फोन आला. त्यानंतर त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.

स्मृती सिंह चंदेल

फोटो स्रोत, Facebook/SmrutiSinghChandel

फोटो कॅप्शन, स्मृती सिंह चंदेल यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.

त्या सांगतात की, सर्व कलमेही मागे घेण्यात आली आहेत. "पंतप्रधानांनी मुलांना माफ केलं, तर आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे नाही. त्यामुळे आम्हीही त्यांना माफ केलं."

स्मृती सिंह चंदेल या व्यवसायाने वकील असून जनता दल लोकतांत्रिक (डेमोक्रॅटिक) पक्षाशी त्या संबंधित आहेत.

झिरो एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना किंवा गुन्हा घडला त्या भागाऐवजी दुसऱ्या कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल केलेला एफआयआर. त्यानंतर हा एफआयआर घटना ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, त्या संबंधित पोलीस ठाण्याकडे पुढील कारवाईसाठी हस्तांतरित केली जाते.

मुलीने मागितली माफी

या मुलीने 1 ऑगस्टला माफी मागत एक व्हीडिओ जारी केला होता. त्यात ती म्हणाली होती, "ही माझ्याकडून झालेली पहिली आणि शेवटची चूक आहे." आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांच्या प्रभावामुळे आपण तसे बोललो, असंही ती या व्हीडिओत म्हणाली होती.

या व्हीडीओमध्ये ती म्हणाली, "मी आंदोलनस्थळी होते. तिथे काही गट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत होते आणि इतरांनाही तसं बोलण्यासाठी प्रवृत्त करत होते."

"मी जे बोलले, त्याबद्दल मला खूप पश्चात्ताप होत आहे. मला मान वर करून बघण्याचीही हिंमत होत नाही. यासाठी मी संपूर्ण देशाची माफी मागते. ही माझ्याकडून झालेली पहिली आणि अखेरची चूक आहे."

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक व्हीडिओ मेसेज जारी केला होता.

ते व्हीडिओत म्हणाले होते की,"लहानपणी चुका होतात आणि त्या सुधारण्याची संधीही असते. ही मुलं भरकटलेली आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची ही वेळ आहे. मी त्यांना माफ करू इच्छितो."

ते म्हणाले होते, "जंतर-मंतरवर काय घडलं, हे देशाने आणि संपूर्ण जगाने पाहिलं. काही मुलांनी अतिशय आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीची भाषा वापरली. कोणत्याही सुसंस्कृत समाजात असे शब्द योग्य मानले जाऊ शकत नाहीत. माझ्याविरोधात तर अपशब्द वापरण्यात आले आणि माझ्या दिवंगत आईबद्दलही अपमानास्पद भाषा वापरण्यात आली."

धमक्या अजूनही सुरूच

ही 15 वर्षीय मुलगी म्हणते की, "मी माफी मागूनही मला मिळणाऱ्या धमक्या कमी झालेल्या नाहीत. जणू काही मी अक्षम्य गुन्हाच केला आहे."

ती म्हणते, "मी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण नंतर मला जाणवलं की, आता खंबीर राहायलाच हवं. माझ्याकडून चूक झाली होती आणि मी त्याबद्दल माफीही मागितली. मला माफी मिळाली आहे. माझ्याकडे कोणतंही संरक्षण नाही, पण आता हे प्रकरण मलाच शेवटपर्यंत हाताळावं लागणार आहे. या लोकांसाठी मी माझा जीव देणार नाही."

ती प्रश्न विचारते, "मी या देशाचीच मुलगी आहे ना? कारण या देशातील मुलांना अशी वागणूक दिली जात नाही."

(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्हीही तणावाखाली असाल, तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 1800 233 3330 वर मदत घेऊ शकता. तुम्ही सरकारच्या किरण मानसिक आरोग्य हेल्पलाइन (1800-599-0019) किंवा मनोदर्पण हेल्पलाइन (844 844 0632) वर फोन करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तसेच, तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांशी बोलायला हवं.)

आई आणि मुलगी दोघीही म्हणतात, "हो, आमच्याकडून चूक झाली. आम्ही माफी मागितली आणि पंतप्रधानांनीही आम्हाला माफ केलं. पण, जे आम्हाला अशा पद्धतीने धमक्या देत आहेत, त्यांना रोखलं का जात नाही?"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनादरम्यान त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या मुलांना माफ करण्याबाबत भाष्य केलं होतं.

फोटो स्रोत, @arjunmodhwadia X/ANI Photo)

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनादरम्यान त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या मुलांना माफ करण्याबाबत भाष्य केलं होतं.

"आम्हाला किमान इतकी तरी मदत मिळावी. आम्ही स्वतःच्या घरीही परत जाऊ शकत नाही. ओळख पटू नये म्हणून चेहरा झाकून ठेवावा लागत आहे. कारण ओळख पटल्यास कोणी तरी आमच्यावर हल्ला करेल, अशी भीती वाटते."

भीतीमुळे तिघांचं हे कुटुंब अद्याप घरी परतलेलं नाही. पोलिसांच्या मदतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांचा पोलिसांवर विश्वास नाही असं सांगितलं आणि त्यांना स्वतःला सुरक्षितही वाटत नाही.

बीबीसीने स्मृती सिंह चंदेल यांना त्या आई-मुलीच्या अडचणींबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, "त्यांनी पोलिसांकडे मदत मागायला हवी. या प्रकरणाचं विनाकारण राजकारण केलं जात आहे."

मुलीची आई म्हणते, "आम्ही सध्या कसंबसं लपून-छपून जगत आहोत. नातेवाईकही आम्हाला फोन करू नका, असं सांगतात. त्यांना भीती वाटते की तसे केल्यास ते अडचणीत येतील. पूर्वी नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी नियमित संपर्कात होते. पण आता आम्हाला गरज आहे, पण आमच्यासोबत कोणीच नाही."

जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्याप्रमाणात होती.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्याप्रमाणात होती.

त्या प्रश्न विचारतात, "आपल्या संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. मग तो अधिकार आता कुठे दिसत का नाही?"

मुलीची आई म्हणते, "माझी मुलगी मुलांच्या हितांसाठी आंदोलन करताना मरण पावली असती, तर तिचा जीव मुलांचं भविष्य सुधारण्यासाठी गेला, असं समजून मी स्वतःला समजावलं असतं. पण आता कोणीतरी माझ्या मुलीला मारून टाकेन, या भीतीत आम्ही कसं जगायचं?"

"जे लोक अशा प्रकारच्या कमेंट करत आहेत, त्यांनी कधी चूक केलीच नसेल का?" असं वाटतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)