अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण

फोटो स्रोत, Bandi Sanjay Kumar/Facebook
- Author, अमरेंद्र यारलागड्डा आणि प्रवीण शुभम
- Role, बीबीसी तेलुगू
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात केंद्रीय गृहराज्य मंत्री बंडी संजय कुमार यांचा मुलगा बंडी साई भगीरथ याला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे.
सायबराबादच्या पोलीस आयुक्तांनी एक निवदेनात म्हटलं आहे की, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेंसेस (पॉक्सो) प्रकरणातील आरोपी बंडी साई भगीरथ याला शनिवारी (16 मे) रात्री अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्तांनी एका निवदेनात म्हटलं, "वैद्यकीय तपासणीनंतर भगीरथला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं. त्यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली."
निवेदनात पुढे म्हटलं, "आम्ही आरोपीला अटक करण्यासाठी खूप प्रयत्न केले. आम्ही करीमनगर, दिल्ली आणि इतर ठिकाणी पोलीस पथकं पाठवली. आरोपीच्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या घराचीदेखील झडती घेतली. आम्ही लुकआउट नोटिसदेखील जारी केली होती."
सायबराबादच्या विशेष पोलीस पथकानं नारसिंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मंचिरेवुलाजवळ टेक पार्कमध्ये आरोपीला अटक केली.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी बंडी भगीरथ याला अटक करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय गृहराज्य मंत्री बंडी संजय यांनी एका वक्तव्यात म्हटलं आहे की, त्यांचा मुलगा शरण आला आहे.
बंडी संजय यांनी म्हटलं, "कायदा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत, आज माझा मुलगा बंडी भगीरथ त्याच्या वकिलांसह तेलंगणा पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाला."
भगीरथचे वकील करुणासागर यांनी एएनआयला सांगितलं, "मी आणि ज्येष्ठ वकील अँथनी रेड्डी यांनी भगीरथला टेक पार्कजवळ पोलिसांच्या ताब्यात दिलं."
आतापर्यंत काय घडलं?
पोलिसांनी 12 मे ला पॉक्सो प्रकरणात आरोपी बंडी भगीरथ याला नोटीस जारी करून 13 मे ला दुपारी 2 वाजता पेट बशीराबाद पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं.
भगीरथ घरी नसल्यामुळे त्याचे काका वामसी कृष्णा यांच्याकडे नोटीस सुपुर्द करण्यात आली होती, असं पोलिसांनी सांगितलं.
मात्र भगीरथ चौकशीसाठी हजर झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडी भगीरथनं पेट बशीराबाद पोलिसांना ईमेल पाठवला. त्यात त्यानं म्हटलं होतं की, 13 मे ला होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी त्याला 2 दिवसांची मुदत हवी आहे.
बंडी भगीरथनं पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, "मी पुरेशा पुराव्यांसह तुमच्या समोर हजर होईन आणि माझा युक्तिवाद मांडेन."

फोटो स्रोत, Cybpolice
मेडचलचे एसीपी शंकर रेड्डी बीबीसीला म्हणाले, "भगीरथचा शोध घेण्यासाठी आम्ही 5 पथकं तयार केली होती. आम्ही हैदराबाद, दिल्ली आणि करीमनगरमध्ये शोध घेत होतो."
हैदराबाद पोलिसांनी 2 दिवस आधी म्हटलं होतं की, पॉक्सो प्रकरणातील आरोपी बंडी भगीरथ अद्याप सापडलेला नाही.
या प्रकरणात अंतरिम जामीन मिळण्यासाठी भगीरथनं तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावरील सुनावणी प्रलंबित आहे.
या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय वक्तव्यं सुरू आहेत.
यादरम्यान राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या बीआरएसकडून बंडी संजयच्या मुलाला अटक करण्याची मागणी केली जात होती.
सरकारचं म्हणणं आहे की, कोणत्याही भेदभावाशिवाय तपास केला जाईल. मात्र भाजपाचं म्हणणं आहे की, बंडी संजयचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
करीमनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू एकता यात्रेदरम्यान बंडी संजय म्हणाले की, त्यांच्या मुलाला पुरेसा वेळ न देण्याची चूक त्यांचीच आहे.
पोलिसांच्या नोटीसमध्ये काय म्हटलं होतं?
याच्या आधी बशीराबाद पोलिसांनी बंडी भगीरथला पॉक्सो कायद्याअंतर्गत नोटीस जारी केली होती. त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं आणि तसं न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हटलं होतं.
भगीरथला दिलेल्या नोटीसमध्ये असंही म्हटलं होतं की, मुलीचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर, आधी दाखल करण्यात आलेल्या कलमांमध्ये बदल करण्यात आले होते.

फोटो स्रोत, ANI
नोटीशीत म्हटलं होतं, "आम्ही या पोलीस ठाण्यामध्ये तुमच्या आणि इतर लोकांच्या विरोधात एफआयआर क्रमांक 684/2026, बीएनएस कलम 74, 75, कलम 11 आणि 12 अंतर्गत, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. नंतर 'सर्व्हायवर'च्या जबाबाच्या आधारे यात पॉक्सो कायद्याच्या कलम 5 (आय) सह कलम 6 देखील जोडण्यात आलं आहे."
डीसीपी रितिराज यांच्या नेतृत्वाखालील एका टीमनं 12 मे रोजी मुलीचा जबाब नोंदवला होता.
2019 मध्ये पॉक्सो कायद्यामध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, कलम 5 अंतर्गत एखाद्या गुन्ह्यात दोषी आढळल्यास किमान 20 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. या कलमाअंतर्गत मृत्यूदंडाची म्हणजे फाशीच्या शिक्षेची तरतूददेखील आहे.
'चूक केली असेल, तर मी मुलाला माफ करणार नाही'
केंद्रीय गृहराज्य मंत्री बंडी संजय कुमार यांनी त्यांच्या मुलाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पॉक्सो प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
करीमनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू एकता यात्रेच्या वेळेस ते या मुद्द्यावर बोलले.
ते म्हणाले की, ज्यावेळेस त्यांना समाजच आपलं कुटुंब वाटतं, त्याच वेळेस ते आपल्याच कुटुंबावर दगडफेक करत आहेत आणि गदारोळ करत आहेत.
"ही माझी चूक आहे. मी माझ्या मुलाला वेळ दिला नाही. मी त्याच्याशी बोललो नाही. तुम्ही मला तुमचा छोटा भाऊ मानलं. मी माझ्या मुलाला वेळ न देऊन चूक केली. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Telangana CMO
बंडी संजय म्हणाले की, त्यांच्या मुलानं वचन दिलं आहे की त्यानं काहीही चुकीचं केलेलं नाही आणि तो निर्दोष ठरेल.
"जर त्यानं खरोखरंच काही चूक केली असेल, तर मी माझ्या मुलाला देखील माफ करणार नाही. कृपया खोट्या प्रचारावर विश्वास ठेवू नका," असं ते म्हणाले.
बंडी संजय म्हणाले की, जे लोक त्यांच्याविरोधात कट करत आहेत, सर्वांसमोर त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहे, पक्षाला त्रास देत आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण करत आहेत, त्यांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही.
"ज्या घडामोडी घडत आहेत, ते पाहून त्यांची पत्नी डिप्रेशनमध्ये गेली आहे", असंही त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर वेगानं घडल्या घडामोडी
बंडी भगीरथ याच्या विरोधात 8 मे रोजी पेट बशीराबाद पोलीस ठाण्यात पॉक्सो प्रकरण नोंदवण्यात आलं होतं.
पेट बशीराबादचे इन्स्पेक्टर विजयवर्धन बीबीसी तेलुगूला म्हणाले होते, "मुलीच्या आईनं केलेल्या तक्रारीच्या आधारे बंडी साई भगीरथ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला."
प्रकरणाच्या तपशीलानुसार, मुलीच्या आईनं तिच्या तक्रारीत आरोप केला होता की, बंडी संजय यांचा मुलगा बंडी साई भगीरथ यानं 31 डिसेंबर 2025 च्या रात्री त्यांच्या 17 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
गुन्हा दाखल होण्याच्या काही तास आधी, बंडी भगीरथनं करीमनगर टू टाउन पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती.
त्यात आरोप करण्यात आला होता की, मुलगी आणि तिचे आई-वडील त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून पैशांसाठी त्रास देत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी हैदराबादचा दौरा केला. दुसऱ्या दिवशी 11 मे रोजी वेगानं घडामोडी घडल्या.
मुख्यमंत्री कार्यालयानं सोमवारी (11 मे) दुपारी एका निवेदनात सांगितलं की, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पेट बशीराबाद पोलीस ठाण्यात बंडी भगीरथ याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पॉक्सो प्रकरणाबद्दल माहिती घेतली आणि डीजीपी सी व्ही आनंद यांच्याशी चर्चा केली.
"मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना विचारलं की, 8 तारखेला तक्रार दाखल झाल्यानंतर देखील आतापर्यंत कोणतीही कारवाई का झालेली नाही? डीजीपींनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, पंतप्रधान मोदींच्या हैदराबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेत गुंतले आहेत," असंही मुख्यमंत्री कार्यालयानं नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


















