You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणचे परराष्ट्रमंत्री पोहोचले इस्लामाबादमध्ये, अमेरिकेसोबतच्या चर्चेबाबत मात्र अजूनही अनिश्चितता
अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या काळात पुन्हा एकदा चर्चेचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत.
या चर्चेसाठी अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह व्हिटकॉफ आणि जेरेड कुश्नर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला जाणार आहेत.
दुसरीकडे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची एका शिष्टमंडळासह इस्लामाबादला गेले आहेत.
परंतु, अब्बास अरागची आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाची भेट होण्याची अपेक्षा नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
या दौऱ्याचा उद्देश हा द्विपक्षीय विषयांवर चर्चा करण्याचा असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेत झालेली चर्चेची पहिली फेरी अपयशी ठरली होती. अमेरिकेकडून या चर्चेचं नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स करत होते.
पाकिस्तानच्या मध्यस्थीने 11 आणि 12 एप्रिलला इस्लामाबादमध्ये चर्चेची पहिली फेरी झाली होती. पण ती चर्चा यशस्वी झाली नाही.
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात पाच आठवडे चाललेल्या संघर्षादरम्यान दोन आठवड्यांची शस्त्रसंधी झाली होती. ती पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवली होती.
'इराण-अमेरिका यांच्यात बैठक नाही'
व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह व्हिटकॉफ आणि त्यांचे जावई जेरेड कुश्नर हे शनिवारी (25 एप्रिल) इराणसोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानला जाणार आहेत.
"इराणला चर्चा करायची आहे," असं व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्हटलं आहे.
जर चर्चा यशस्वी झाली आणि गरज पडल्यास अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स भेट देण्यास तयार असल्याचेही त्या म्हणाल्या.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बकाई यांनी सांगितले की, ते आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची शनिवारी सकाळी इस्लामाबादला पोहोचले आहेत. अरागची हे 'पाकिस्तानमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची' भेट घेणार आहेत.
"इराण आणि अमेरिका यांच्यात कोणत्याही बैठकीचे नियोजन नाही. इराण आपलं मत पाकिस्तानच्या माध्यमातून मांडेल," असं ते म्हणाले.
'इराणला चांगल्या कराराची संधी'
इस्माइल बकाई यांच्या वक्तव्यापूर्वी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराणला 'चांगला करार' करण्याची संधी असल्याचे म्हटलं होतं.
"इराणने फक्त अण्वस्त्रांचा त्याग करावा. आणि तोही ठोस आणि प्रामाणिक पद्धतीने," असं ते ठामपणे म्हणाले.
शुक्रवारच्या (24 एप्रिल) पत्रकार परिषदेत हेगसेथ यांनी इशारा दिला की, "होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अमेरिकेची 'नाकाबंदी' वाढत आहे आणि ती आता जागतिक रुप घेत आहे."
अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ले सुरू केले होते. त्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर निर्बंध घातले होते.
होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक बाजारपेठेत तेल आणि एलएनजी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. जगभरात वापरल्या जाणाऱ्या सुमारे 20 टक्के तेल आणि एलएनजीची वाहतूक याच मार्गाने केली जाते.
दोन्ही बाजूंच्या या कारवाईमुळे जगभरात तेलाच्या किमती वेगाने वाढल्या आहेत.
शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना कॅरोलिन लेविट यांनी सांगितलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी 'इराणचं म्हणणं ऐकावं' यासाठी स्टीव्ह व्हिटकॉफ आणि जेरेड कुश्नर यांना इस्लामाबादला पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष "नेहमीच कूटनीतीला (मुत्सद्देगिरीला) संधी देण्यासाठी तयार असतात," असंही त्यांनी सांगितलं.
"गेल्या काही दिवसांत आम्ही इराणकडून प्रगती पाहिली आहे," असंही लेविट म्हणाल्या.
दुसरीकडे, अब्बास अरागची पाकिस्तानसोबत 'द्विपक्षीय मुद्द्यांचा आढावा घेतील' आणि प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा करतील, असं इस्लामाबादमधील इराणच्या दूतावासाने म्हटलं आहे.
या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प आणि पीट हेगसेथ यांनी इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेवर कोणताही दबाव नाही, हे आवर्जुन सांगितलं आहे.
यावेळी ट्रम्प प्रशासन इराणबरोबरच्या चर्चेबाबत सावध भूमिका घेत आहे.
यावेळी उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांना पाठवलं जाणार नाही. व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिवांनी सांगितल्याप्रमाणे, यामागचा उद्देश फक्त 'इराणींचं मत ऐकणं' हा आहे.
इराणला 'सर्वमान्य प्रस्ताव' देता यावा यासाठी ट्रम्प यांनी शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी शस्त्रसंधी वाढवल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव आणखी वाढला. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या कारवाईला शस्त्रसंधीचे उल्लंघन मानले.
परंतु, होर्मुझची सामुद्रधुनी हा एकमेव वादाचा मुद्दा नाही. इराणच्या आण्विक क्षमतेवर आणि या प्रदेशातील इराण समर्थक गटांवरून अमेरिका आणि इराण यांच्यात अजूनही मतभेद आहेत.
जर काही प्रगती झाली तर उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स इस्लामाबादला जाण्यासाठी तयार राहतील, असं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे.
पण सध्या इराण काय प्रस्ताव देणार आहे, याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)