You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण-अमेरिका संघर्षामुळे काँडमच्या किमती 30% वाढण्याचा इशारा का देण्यात आलाय?
- Author, ओसमंड चिया
- Role, बिझनेस रिपोर्टर
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता सर्वच क्षेत्रावर होताना दिसत आहे. जगातील सर्वात मोठी काँडम उत्पादक कंपनी केरेक्सच्या सीईओंनी काँडमच्या दरवाढीची शक्यता वर्तवली आहे.
इराण संघर्षामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यातील अडचणी कायम राहिल्यास कंपनीला आपल्या उत्पादनाच्या किमतीमध्ये 30 टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.
इराण संघर्ष सुरू झाल्यापासून उत्पादनाचा खर्च खूप वाढला आहे, असं कंपनीचे सीईओ गोह मिया कियाट यांनी रॉयटर्स आणि ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थांना सांगितलं.
मलेशिया येथील केरेक्स ही कंपनी दरवर्षी 5 अब्जाहून अधिक काँडम तयार करते. ती ड्यूरेक्स आणि ट्रोजनसारख्या मोठ्या ब्रँड्ससाठी काँडमची निर्मिती करते. तसेच ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) यांना देखील पुरवठा करते.
अमेरिका आणि इस्रायल यांच्या हवाई हल्ल्यांना उत्तर म्हणून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिली. त्यामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे.
ही सामुद्रधुनी जवळपास बंद पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीमध्येही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
साधारणपणे जगातील सुमारे 20 टक्के कच्चं तेल आणि एलएनजीचा पुरवठा याच मार्गाने होतो.
केरेक्स कंपनीला तेलावर आधारित कच्च्या मालावर अवलंबून राहावं लागतं. यात अमोनिया (ज्याचा वापर लेटेक्स टिकवण्यासाठी केला जातो) आणि सिलिकॉनवर आधारित ल्युब्रिकंटचा (वंगण) समावेश होतो.
काँडमची मागणी वाढली पण पुरवठा कमी
केरेक्सचे सीईओ म्हणाले की, यावर्षी काँडमची मागणी सुमारे 30 टक्क्यांनी वाढली आहे. परंतु, वाढलेला मालवाहतूक खर्च आणि शिपिंगला होणारा उशीर यामुळे काँडमचा तुटवडा जाणवत आहे.
त्यांनी ब्लूमबर्गला सांगितलं की, "वाईट किंवा अनिश्चित काळात काँडमची मागणी वाढते, कारण लोकांना भविष्याबद्दल आणि नोकरीबद्दल चिंता वाटत असते."
"आता आपल्याला मूल झालं तर आणखी एका व्यक्तीचा खर्च उचलावा लागेल," असा लोक विचार करतात.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आधीच ऊर्जा बाजारपेठेला धक्का बसला आहे.
आता कंडोमच्या तुटवड्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी इतर वस्तूही महाग होताना दिसत आहेत.
या संघर्षामुळे विमानप्रवासही महाग झाला आहे. नवीन संशोधनानुसार, इकॉनॉमी क्लासमधील सर्वात स्वस्त तिकिटे गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी 24 टक्क्यांनी महाग झाली आहेत.
याशिवाय आखाती भागातून माल पाठवण्यात अडचणी आल्यामुळे खतांच्या किमती वाढल्या आहेत. तसेच हेलियमचीही कमतरता जाणवत आहे. याचा वापर संगणक चिप बनवण्यासाठी केला जातो.
बाटलीबंद पाण्याचा उद्योगही अडचणीत आला आहे. कारण कंपन्यांना कच्चा माल मिळणं कठीण होत आहे.
वाहतूक खर्च वाढल्यामुळे साखर, दुग्धजन्य पदार्थ आणि फळांच्या किमतीही वाढू शकतात, असा इशारा या महिन्याच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्राने दिला होता.
इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी करारांवर परस्परविरोधी वक्तव्यं समोर येत आहेत. अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चेची स्थिती अद्यापही स्पष्ट नाही.
चर्चेत प्रगती होत नाही तोपर्यंत शस्त्रसंधी वाढवली जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)