You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याची इराणची घोषणा, अमेरिकेबरोबरच्या शांतता चर्चेचं पुढं काय होणार?
- Author, कॅथरिन आर्मस्ट्राँग
- Role, बीबीसी न्यूज
- वाचन वेळ: 3 मिनिटे
व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलंय. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गातून येणाऱ्या कोणत्याही जहाजाला लक्ष्य केलं जाईल, असंही म्हटलंय.
शनिवारी (18 एप्रिल) या सामुद्रधुनीतून जात असलेल्या जहाजांवर इराणकडून हल्ले झाले.
या हल्ल्यांचं लक्ष्य झालेल्या जहाजांध्ये टँकरचाही समावेश होता. या घडामोडींनातर होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा इराणनं केली.
अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी सुरू ठेवल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC ने सांगितलं.
जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा जलमार्ग पुन्हा खुला करण्याचा निर्णय इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीर केला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी निर्णय फिरवून, सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय.
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की, इराण या जलमार्गाबाबतच्या धमक्यांद्वारे अमेरिकेला 'ब्लॅकमेल' करू शकत नाही.
गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून इराणने हा जलमार्ग अत्यंत परिणामकारकरित्या अडवला असून, त्यामुळे जागतिक ऊर्जा दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
IRGC नौदलाने शनिवारी (18 एप्रिल) दिलेल्या निवेदनात इशारा दिला की, "पर्शियन आखात किंवा ओमानच्या समुद्रातील कोणत्याही जहाजानं नांगर टाकलेल्या ठिकाणापासून हलू नये."
त्यांनी निवेदनात पुढे सांगितलंय की, शुक्रवारी (17 एप्रिल) रात्रीपासून त्यांच्या देखरेखीखाली काही जहाजं सामुद्रधुनीतून गेली. परंतु अमेरिका इराणी बंदरांवरील नाकेबंदी थांबवत नाही, तोपर्यंत सामुद्रधुनी पुन्हा बंद ठेवली जाईल.
"होर्मुझ सामुद्रधुनीकडे जाणं म्हणजे शत्रूसोबत सहकार्य मानले जाईल आणि संबंधित जहाजाला लक्ष्य केलं जाईल," असे IRGC नं म्हटलं.
ट्रम्प यांनी शुक्रवारी (18 एप्रिल) सांगितलं की, दोन्ही देशांमध्ये शांतता करार होईपर्यंत इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी सुरू राहील. सध्या लागू असलेली दोन आठवड्यांची युद्धविरामाची मुदत 22 एप्रिलला संपणार आहे.
तसंच 13 एप्रिलपासून नाकेबंदी लागू केल्यापासून त्यांनी 23 जहाजांना परत पाठवलं आहे, असं अमेरिकेने सांगितलं.
इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल (SNSC) नं म्हटलं की, ही कृती युद्धविराम कराराचे उल्लंघन आहे आणि तोपर्यंत सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार नाही.
युद्ध समाप्त करण्यासाठीच्या चर्चांबाबत SNSC ने सांगितलं की, अमेरिकेकडून काही नवीन प्रस्ताव आले आहेत, ज्यांचा तेहरान सध्या आढावा घेत आहे. मात्र, अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या शांतता चर्चाही निष्फळ ठरल्या.
"आमच्यात खूप चांगल्या चर्चा सुरू आहेत. सर्व काही चांगल्या दिशेने जात आहे," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (19 एप्रिल) सांगितलं.
इराणकडून शनिवारी (19 एप्रिल) जहाजांवर हल्ले झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या.
युके मेरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) च्या मते, इराणच्या दोन गनबोट्सने सामुद्रधुनीत एका टँकरवर गोळीबार केला.
तसेच, ओमानच्या ईशान्य किनाऱ्याजवळ एका कंटेनर जहाजावर "अज्ञात प्रोजेक्टाइल"नं हल्ला करण्यात आला, ज्यामुळे काही कंटेनरचे नुकसान झाल्याचं UKMTO ने सांगितलं.
दुसऱ्या घटनेत किमान दोन व्यापारी जहाजांनी सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिल्याचं सूत्रांनी रॉयटर्सला वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीत शनिवारी सकाळी भारतीय ध्वज असलेल्या दोन जहाजांवर गोळीबार झाला होता. त्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्याचीसाठी इराणच्या राजदूतांना पाचारण करण्यात आलं होतं.
सागरी वाहतुकीची माहिती देणाऱ्या MarineTraffic या ट्रॅकिंग संकेतस्थळाच्या माहितीनुसार, काही जहाजं थोड्या वेळासाठी सामुद्रधुनी सुरू असताना ती पार करून पुढं गेली. मात्र, इतर काही जहाजांना IRGC ने प्रवेश नाकारला त्यामुळं त्यांना मार्ग बदलावा लागला.
साधारणपणे जगातील अंदाजे 20% तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) ची वाहतूक या सामुद्रधुनीतून होते. पण अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर 28 फेब्रुवारीला हल्ला केल्यानंतर राजकीय संघर्ष सुरू झाला आणि त्यामुळं या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांच्या संख्येत कमालीची घट झाली.
होर्मुझची अरुंद सामुद्रधुनी पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडते. तसंच समुद्रामार्गे अनेक तेल उत्पादक देशांपर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. एकूण या संकटामुळं काही दिवसांत तेलाच्या एका बॅरलची किंमत 100 डॉलरच्या वर पोहोचली आहे.
इराणनं यापूर्वी टँकर्स आणि इतर जहाजांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती, तसंच समुद्रात स्फोटक खाणी (माइन्स) टाकल्याचा इशाराही दिला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)