मिनी-मून, क्वासी-मून, घोस्ट मून... पृथ्वीच्या या गूढ सोबत्यांबद्दल तुम्हाला माहीत आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सँडरीन लुंगुबू
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
पृथ्वीच्या कक्षेत आता एक नवा 'मिनी-मून' म्हणजे लघुचंद्र दाखल झाल्याचं खगोलशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
2026 QQ8' नावाच्या या लघुग्रहाचा (ॲस्टेरॉइड) शोध ऑगस्टमध्ये हंगेरियन खगोलशास्त्रज्ञ क्रिस्टियान सार्नेझकी यांनी लावला होता. मात्र 'इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियन'च्या 'मायनर प्लॅनेट सेंटर'ने गेल्या महिन्यात याची अधिकृत नोंद जाहीर केली.
हा लघुग्रह खूपच लहान असून अवघा 1 ते 2 मीटर रुंद आहे. विशेष म्हणजे तो पृथ्वीपासून 5,00,000 किलोमीटरहून (3,23,000 मैल) जास्त दूर आहे. म्हणजेच आपल्या मूळ चंद्रापेक्षाही अधिक अंतरावर आहे.
'मिनी-मून' म्हणजे असे छोटे लघुग्रह (अॅस्टरॉइड्स) जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खेचले जातात आणि त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आपल्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतात.
'2026 QQ8' हा लघुग्रह एप्रिलमध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत अडकला असावा, असा खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र पुढच्या दोन-तीन महिन्यांत तो या कक्षेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
पृथ्वीभोवती फिरणारे हे तात्पुरते सोबती फक्त 'मिनी-मून'पुरतेच मर्यादित नाहीत.
क्वासी-मून म्हणजे नक्की काय?
पृथ्वीच्या कक्षेतील या चंद्रांना 'क्वासी-मून' म्हणतात. हे नाव पडण्यामागं एक खास कारण आहे. आपल्या पृथ्वीवरून पाहताना असं वाटतं की, ते खऱ्या चंद्रासारखेच पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. पण बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की, हे प्रत्यक्षात असे लघुग्रह आहेत जे पृथ्वीसोबतच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात.
याचं एक ताजं उदाहरण म्हणजे '2025 PN7'. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शोध लागलेला हा लघुग्रह गेल्या अनेक दशकांपासून जवळपास पृथ्वीच्याच वेगाने आणि तिच्यासोबतच प्रवास करत आहे.
खगोलशास्त्रज्ञ डॉ. जेनिफर मिलार्ड सांगतात, "'क्वासी-मून' खूप रंजक असतात, कारण आपला चंद्र जसा पृथ्वीभोवती फिरतो, तसे हे प्रत्यक्षात आपल्या ग्रहांभोवती फिरत नाहीत. ते फक्त पृथ्वीच्या कक्षेजवळ म्हणजे पृथ्वीच्या आसपासच्या भागात असतात."
'2025 PN7' हा लघुग्रह सुमारे 20 मीटर लांबीचा आहे.
बीबीसीशी बोलताना डॉ. मिलार्ड म्हणाल्या, "हा काही खूप अवाढव्य नाही. एखाद्या छोट्या ऑफिसच्या इमारतीइतकाच त्याचा आकार आहे. त्याच्या सध्याच्या कक्षेवरून केलेल्या गणितानुसार, तो गेल्या 60 वर्षांपासून आपल्या आसपास आहे आणि अजून पुढची 60 वर्षं तो इथेच राहील, असं आम्हाला वाटतं."

फोटो स्रोत, Getty Images
पण या तात्पुरत्या 'चंद्रांपैकी' कोणीही आपल्या पृथ्वीच्या खऱ्याखुऱ्या 'चंद्रा'ची बरोबरी करू शकत नाही.
"ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असताना अंतराळात अगदी पृथ्वीसारख्याच मार्गावरून पुढे सरकत असतात. ते आपल्या अगदी जवळून प्रवास करत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते आपल्याभोवतीच फिरत आहेत. कधी ते आपल्या पुढे जातात तर कधी मागे राहतात. पण प्रत्यक्षात ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात बांधलेले नसतात आणि हाच खरा फरक आहे," असं त्या स्पष्ट करतात.
मात्र हे लघुग्रह आपापल्या कक्षेत फिरत असताना त्यांच्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा थोडाफार प्रभाव नक्कीच होतो ज्यामुळे ते आपल्या अधिक जवळ ओढले जातात.
पृथ्वीचे आतापर्यंत माहीत असलेले सर्व 'क्वासी-मून' हे तात्पुरतेच आहेत त्यांचा हा सहवास काही दशकांपासून ते अगदी 100 वर्षांहून अधिक टिकू शकतो.
मिनी-मून (लघुचंद्र)
End of podcast promotion
याच्या अगदी उलट, 'मिनी-मून' म्हणजे असा खगोलीय घटक जो खरोखरच एखाद्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालतो.
पृथ्वीचे 'मिनी-मून' हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तात्पुरते अडकलेले छोटे लघुग्रह असतात. ते सूर्यमाला तयार होताना राहिलेले अवशेष किंवा अवकाशातील इतर कचरा असू शकतात आणि ते सहसा एक वर्षापेक्षा कमी काळ पृथ्वीच्या कक्षेत राहतात.
ते आकाराने खूपच लहान असल्यामुळे त्यांचा शोध घेणं कठीण असतं. अवकाश क्षेत्रात काम करणाऱ्या 'द प्लॅनेटरी सोसायटी' या संस्थेच्या मते, '2026 QQ8' चा शोध लागण्यापूर्वी असे फक्त 4 मिनी-मून दिसले होते. आणि त्यापैकी एकही आज पृथ्वीभोवती फिरत नाही.
'2026 QQ8' च्या आधी ऑगस्ट 2024 मध्ये शेवटचा मिनी-मून दिसला होता. '2024 PT5' नावाने ओळखला जाणारा हा लघुग्रह सुमारे 10 मीटर लांब होता.
सूर्याभोवती अगदी पृथ्वीसारख्याच कक्षेत फिरणाऱ्या अंतराळातील खडकांचा एक समूह आहे, ज्याला 'अर्जुन अॅस्टरॉइड बेल्ट' म्हणतात. हा लघुग्रह तिथूनच आला असावा, असा अंदाज आहे.
पण त्याच्या रासायनिक रचनेचा अधिक अभ्यास केल्यावर असं दिसून आलं की, '2024 PT5' हा आपल्याच चंद्राचा एक तुकडा असू शकतो जो खूप वर्षांपूर्वी एखाद्या लघुग्रहाची धडक बसल्यामुळे चंद्रापासून तुटून बाहेर फेकला गेला होता.
खोल अवकाशात परत जाण्याआधी तो फक्त काही महिनेच पृथ्वीच्या आसपास राहिला होता. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते, 2055 मध्ये तो पुन्हा एकदा पृथ्वीच्या जवळून जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
घोस्ट मून (गूढ / अदृश्य चंद्र)
या तीनही प्रकारांमध्ये 'घोस्ट मून' हे आपल्या नावाप्रमाणेच सर्वात रहस्यमय आहेत.
पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिच्याच कक्षेत पुढे किंवा मागे राहणारे हे धुळीचे भोवरे किंवा ढग असावेत असं मानलं जातं. पण त्यांचं खरंच अस्तित्व आहे का, यावर शास्त्रज्ञांमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही.
मात्र डॉ. मिलार्ड यांना ही कल्पना पटण्यासारखी वाटते.
त्या म्हणतात, "अवकाशात खूप धूळ आहे. तिथे ग्रहांच्या मधल्या भागात धुळीचे कण असतात त्यामुळे पृथ्वीच्या कक्षेभोवती असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या स्थिर बिंदूंमध्ये काही धूळ खेचली गेली असेल तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही."
क्वासी-मून किंवा मिनी-मून धोकादायक असतात का?
अवकाशाच्या गणितानुसार ते जवळ वाटत असले तरी, पृथ्वीला काही धोका निर्माण होईल इतक्या जवळ हे लघुग्रह कधीच येत नाहीत.
ते अगदी जवळ आले तरी आपल्या चंद्रापेक्षा कित्येक पट जास्त अंतरावर असतात. अंतराळाच्या भाषेत याला जवळ मानलं जातं. पण प्रत्यक्षात घाबरण्यासारखं काहीच नाही.
डॉ. मिलार्ड सांगतात, "अंधारातून अचानक वेगाने आपल्या अंगावर येतात, असं काही नसतं."
"जर ते आपल्या जवळ येतही असतील तर त्यांचा वेग खूपच संथ असतो. ते येताना आपल्याला स्पष्ट दिसतील आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असेल."
इतर कोणत्या ग्रहांना 'क्वासी-मून' असतात?
गेल्या काही दशकांतच दुर्बिणी इतक्या प्रगत आणि संवेदनशील झाल्या आहेत की, या अतिशय अंधुक आणि सहज न दिसणाऱ्या लघुग्रहांचा शोध घेता येऊ लागला आहे.
सध्याचं तंत्रज्ञान जितका कमी प्रकाश टिपू शकतं, अगदी त्याच सीमारेषेवर हे लघुग्रह असतात.
या प्रगतीसोबतच कॉम्प्युटर तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे त्यांच्या हालचालींचा अचूक अंदाज बांधणं आणि या गूढ वस्तू खरंच 'क्वासी-मून' आहेत हे सिद्ध करणंही शक्य झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. मिलार्ड सांगतात, "ही काही दुर्मिळ किंवा असामान्य गोष्ट नाही फक्त त्यांना शोधणं खूप कठीण असतं. पृथ्वीच्या इतक्या जवळ असूनही त्यांना शोधणं अवघड जात असेल तर सूर्यमालेत इतरत्र दूरवर त्यांचा शोध घेणं किती कठीण असेल, याचा तुम्ही विचार करू शकता."
आतापर्यंत गुरू, शुक्र, शनि, नेपच्यून आणि प्लूटो या ग्रहांच्या आसपास 'क्वासी-मून' दिसले आहेत आणि भविष्यात आणखीही सापडू शकतात.
डॉ. मिलार्ड पुढे सांगतात, "आपली सूर्यमाला आजही खूप सक्रिय आणि सतत बदलणारी आहे. ती शांत किंवा स्थिर नाही तर इथे प्रत्येक गोष्ट सतत फिरत आणि हालचाल करत असते."



























