चीनमधील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 90 जणांचा मृत्यू, सरकारी माध्यमांचे वृत्त

शेकडो बचाव कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

फोटो स्रोत, Xinhua

फोटो कॅप्शन, शेकडो बचाव कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

उत्तर चीनमधील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 90 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती चीन सरकारी माध्यमांनी दिली आहे.

सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले की, "शांक्सी प्रांतातील टोंगझोऊ ग्रुपच्या लिउशेन्यू कोळसा खाणीत झालेल्या गॅस स्फोटाच्या अपघातात किमान 90 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे."

हा स्फोट शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार 19:29 वाजता (11:29 GMT) शांक्सी प्रांतातील टोंगझोऊ ग्रुपच्या मालकीच्या लिउशेन्यू कोळसा खाणीत गॅसचा स्फोट झाला. घटनेच्या वेळी 247 कामगार खाणीत काम करत असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यांनी जखमींवर उपचार करण्यासाठी आणि अपघातात वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, असं आवाहन केलं आहे.

तसंच, या अपघाताच्या कारणांची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी सरकारला दिले.

चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कोळसा खाण चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गॅस स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खाणीमध्ये कार्बन मोनोऑक्साइड या अत्यंत विषारी, गंधहीन वायूचं याचे प्रमाण 'मर्यादेपेक्षा जास्त' आढळले आहे.

चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयानं या मोहिमेत मदत करण्यासाठी सहा बचाव पथकांमध्ये 345 जवान पाठवले आहेत.

चीनच्या गरीब प्रांतांपैकी एक असलेला शांक्सीला देशाची कोळसा खाण राजधानी म्हणून ओळखलं जातं.

2000 च्या दशकाच्या सुरुवातीला चीनमध्ये कोळसा खाण उद्योगात अनेक प्राणघातक अपघात घडले होते. त्यानंतर अलीकडच्या काही वर्षांमध्ये सुरक्षा मानके अधिक कडक करण्यात आली आहेत.

चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने बचावकार्यासाठी सहा बचाव पथकांमधील 345 कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे.

चीनच्या माध्यमांनी प्रसारित केलेल्या दृश्यांमध्ये, पॅरामेडिक्ससह मोठ्या संख्येने बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचताना दिसत आहेत.

घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.