SIR ड्राफ्ट मतदार यादीत नाव कसं शोधायचं? नाव नसेल तर काय करायचं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
SIR ची ड्राफ्ट यादी जारी झाली आहे. आता त्यात तुमचं नाव आहे की नाही, हे कसं शोधायचं?
नाव नसेल तर काय करायचं? आणि जर नाव नसेलच, तर तुम्हाला यापुढे मतदान करता येणार नाहीये का?
1. SIR प्रारूप मतदार यादीत नाव कसं शोधायचं?
प्रथम तुम्ही मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या वेबसाईटला किंवा भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट द्या.
सीईओ महाराष्ट्र वेबसाईटला भेट दिल्यानंतर तिथं प्रारुप मतदार यादी SIR 2026 हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन पुढं जावे. त्यानंतर निवडणूक आयोगाचं नवं पेज ओपन होईल.

फोटो स्रोत, Election Commission
राज्य महाराष्ट्र, वर्ष 2026, एसआयआर ड्राफ्ट रोल 2026 निवडा, यानंतर जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर भाषा निवडा, कॅप्चा नोंदवा. विधानसभा मतदारसंघातील यादीभाग निवडा. तो सिलेक्ट करुन, डाऊनलोड सिलेक्टेट पीडीएफस पर्यायावर क्लिक करा. मतदार यादी डाऊनलोड झाल्यानंतर पीडीएफमध्ये तुमचं नाव चेक करा.
कधीकधी असं होतं की तुमच्या नावाचं स्पेलिंग तुमच्या मूळ नावापेक्षा काहीतरी भलतंच छापलं गेलंय, त्यामुळे तुमच्या मतदार पत्रावर जे स्पेलिंग असेल, तेच सर्च करा.
2. वगळलेली नावं कुठं पाहायची?

CEO महाराष्ट्राच्या वेबसाईटवरील ASSD LIST (Absent, Shifted, Dead, Duplicate) SIR 2026 पर्यायावर क्लिक करा. इथं तुम्ही वैयक्तिक मतदार ओळखपत्र क्रमांक नोंदवून तुमचं नाव वगळलंय की नाही ते पाहू शकता. मतदान केंद्र निहाय वगळलेल्या मतदारांची यादी डाऊनलोड करुन त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे पाहू शकता.
जर तुमचं यापैकी कोणत्याही यादीत नाव असेल तर कुठल्याही त्रुटी दुरुस्त करण्यासाठी किंवा हरकती दाखल करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
3. यादीत नाव नसेल तर काय करावे?
पूर्वी मतदार यादीत नाव असलेल्या, मात्र SIR नंतरच्या प्रारूप यादीत नाव आढळत नसलेल्या मतदारांसाठी Form 6 महत्त्वाचा आहे.
जे नुकतेच 18 वर्षांचे झाले आहेत, त्या पात्र नागरिकांनीही मतदार म्हणून नाव मतदार यादीत दाखल करण्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे. स्थलांतर झालेल्या पात्र नागरिकांनाही नियमानुसार या प्रक्रियेचा लाभ घेता येऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
हा फॉर्म 6 ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरता येईल. अर्ज करताना त्यासोबत आवश्यक कागदपत्रं आणि पुरावे जोडावे लागू शकतात – जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिकृत भाडेकरार, वीज बिल, रेशन कार्ड, बँक पासबुक, ताजा कलर पासपोर्ट फोटो वगैरे.
4. अर्ज केल्यानंतर काय होणार?
हा फॉर्म 6 भरल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी निवडणूक यंत्रणेकडून केली जाते. आवश्यकतेनुसार मग बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) अर्जदाराच्या पत्त्याची आणि पात्रतेची पडताळणी करू शकतात. ती झाल्यानंतर मग तुमचं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया पुढे केली जाते.
त्यामुळे SIRच्या ड्राफ्ट मतदारयादीत तुमचं नाव आढळलं नाही, म्हणजे मतदानाचा हक्क गेलाच, असं समजण्याचं कारण नाही. पात्र मतदारांनी प्रथम आपलं नाव तपासावं, आणि नाव वगळले असल्यास आयोगाने दिलेल्या मुदतीत, म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
5. जर उत्तर आलं नाही तर काय?

फोटो स्रोत, Election Commission
प्रत्येक जिल्ह्यासाठी SIR साठी एक विशेष मतदारसंघनिहाय हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. ती यादी तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर मिळू शकते.
तुमच्या विधानसभा मतदारसंघनिहाय ही यादी आहे, यावर संपर्क साधून तुम्ही तुमचं शंका विचारू शकता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























