'शक्य होईल तितक्या मुलांना जन्म देईन' असं म्हणण्याची वेळ 'या' महिलांवर का आलीय?

- Author, सोफिया बेट्टिझा
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
करीना सहा महिन्यांची गरोदर आहे. मात्र तिच्या पोटात असणारं बाळ तिचं नाही.
करीना 22 वर्षांची असून ती युक्रेनच्या पूर्व भागात राहते. ती एक सरोगेट मदर आहे. म्हणजेच दुसऱ्याच्या बाळाची स्वत:च्या पोटात गर्भधारणा करून प्रसूतीनंतर ते बाळ त्याच्या जैविक आई-वडिलांना देणारी माता.
चीनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचं स्त्रीबीज आणि शुक्राणू यापासून तयार झालेला गर्भ करीना तिच्या पोटात वाढवते आहे.
करीना 17 वर्षांची होती, तेव्हा तिचं बाखमुत शहरातील घर उद्ध्वस्त झालं. रशियानं 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केलं, तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात बाखमुत शहर युद्धाच्या प्रमुख आघाड्यांपैकी एक बनलं होतं. त्यावेळेस करीनाचं घर नष्ट झालं होतं.
बहुतांश शहर उद्ध्वस्त झालं होतं. शहराचं रुपांतर ढिगारे आणि राखेत झालं होतं. त्यामुळे करीना आणि तिचा जोडीदार कीव शहरात स्थलांतरित झाले. मात्र त्यांना तिथे कायमस्वरुपी काम किंवा रोजगार मिळणं कठीण गेलं.
करीना पेड सरोगसीकडे का वळली?
मग एक दिवस, करीना एका दुकानात गेलेली होती. तिच्या दीड वर्षांच्या मुलीसाठी ब्रेड आणि डायपर्स विकत घेण्याइतकेच जेमतेम पैसे तिच्याकडे उरले होते. त्यावेळेस तिनं 'पेड सरोगसी'चा मार्ग निवडला.
पेड सरोगसी म्हणजे पैशांच्या मोबदल्यात दुसऱ्याचं अपत्य पोटात वाढवणारी माता (सरोगेट मदर) होणं.
करीनानं सांगितलं की, जर रशियानं आक्रमण केलं नसतं, तर ती 'सरोगेट मदर' झाली नसती. या आक्रमणामुळे लाखो लोकांवर त्यांच्या नोकऱ्या आणि व्यवसाय गमावायची वेळ आली. तसंच महागाई वाढली आहे आणि युक्रेनच्या जीडीपीमध्ये मोठी घट झाली आहे.
"सुरुवातीला, सरोगेट मदर होण्याच्या कल्पनेचा मला खूप राग आला होता. पण आता मी ती गोष्ट स्वीकारली आहे," असं करीना तारासेंको म्हणाली.
ती आता कीव शहराच्या उपनगरातील एका फ्लॅटमध्ये राहते. तिच्या सरोगसी क्लिनिकनं हा फ्लॅट उपलब्ध करून दिला आहे.
तिला आता एक मुलगी होणार आहे.
करीनाला सरोगसी मदर म्हणून किती पैसे मिळणार?
सरोगसी मदर म्हणून तिला अंदाजे 17,000 डॉलर्स (अंदाजे 16,37,270 रुपये) मिळणार आहेत. ही रक्कम युक्रेनमधील लोकांच्या सरासरी पगाराच्या दुप्पट आहे. तिला यातील बहुतांश पैसे बाळाला जन्म दिल्यानंतर मिळणार आहेत.
वास्तविक करिनाला 21,000 डॉलर्स (अंदाजे 20,22,510 रुपये) मिळणार होते. तसा तिचा करार झाला होता. मात्र तिच्या गर्भात जुळं होतं. त्यातील एका बाळाचा मृत्यू झाल्यामुळे, करारानुसार तिला मिळणाऱ्या रकमेत घट करण्यात आली.

करीनाला सुरुवातीला या कामाबद्दल शंका होत्या. मात्र आता ती सरोगेट मदर म्हणून तिच्या शरीराला शक्य होईल तितक्या बाळांना जन्म देणार आहे. पैसे वाचवण्यासाठी आणि घर विकत घेण्यासाठी ती असं करणार आहे.
मात्र तिचा हा निर्णय धोकादायक ठरू शकतो.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी, युक्रेनला व्यावसायिक सरोगसीचं जगातील दुसऱ्या क्रमांकाचं केंद्र मानलं जात होतं. यात अमेरिका पहिल्या क्रमांकावर होती.
युक्रेन युद्धामुळे सरोगसीच्या कामावर लक्षणीय परिणाम झाला असला, तरीदेखील आता ते पुन्हा जवळपास युद्धापूर्वीच्या स्थितीवर पोहोचलं आहे, असं तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं.
युक्रेनमधील पेड सरोगसीविरोधातील विधेयक
मात्र, आता या क्षेत्रावर कडक देखरेख ठेवता यावी यासाठी युक्रेनची संसद सध्या एका विधेयकावर विचार करत आहे. त्यामुळे याचा वापर करणाऱ्या परदेशी पालकांवर बंदी घातली जाईल. सरोगसीच्या या क्षेत्रात 95 टक्के संभाव्य पालक परदेशी नागरिक असतात.
या प्रस्तावांना युक्रेनच्या संसेदत व्यापक पाठिंबा मिळाला आहे.
प्रजननाच्या क्रियेला एक वस्तू किंवा व्यवसाय बनवण्याचा आणि गरीब तसंच असहाय्य महिलांचं शोषण करण्याचा आरोप असलेल्या सरोगसीच्या क्षेत्राचं अधिक कठोरपणे नियमन करणं, हे या प्रस्तावांमागचं उद्दिष्ट आहे.
या प्रस्तावांच्या समर्थकांचा असाही युक्तिवाद आहे की, युद्धामुळे जन्मदरात मोठी घट झालेली असताना युक्रेनच्या महिलांना परदेशी लोकांसाठी मुलं जन्माला घालण्यास भाग पाडलं जाऊ नये.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात अधिकृत आकडेवारीनुसार, जन्माला येणाऱ्या एकूण बाळांमध्ये सरोगसीद्वारे होणाऱ्या जन्मांचं प्रमाण खूपच कमी आहे.
"युद्धामुळे, हताश, निराश झालेल्या महिलांची संख्या वाढते आहे. क्लिनक या महिलांना ही संधी देत आहेत. कारण पाश्चात्य जोडप्यांना स्वस्तामध्ये बालकं हवी आहेत", असं मारिया दिमित्रिएवा म्हणाल्या. त्या महिलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्या नैतिकतेच्या आधारे सर्व प्रकारच्या सरोगसींना विरोध करतात. प्रस्तावित कायदा यासाठी पुरेसा नाही, असं त्यांना वाटतं.
त्यांना वाटतं की युक्रेनमध्ये या पद्धतीवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे.
सरोगसी क्लिनिक उघडपणे गरीब महिलांना लक्ष्य करत आहेत, असा दिमित्रीएवा यांचा आरोप आहे. यासाठी क्लिनिक सोशल मीडियावर जाहिराती दाखवत आहेत.
'ब्लॅक फ्रायडे सेल'सारख्या जाहिरातींचा परिणाम
एका क्लिनिक यावर्षी जानेवारी महिन्यात एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. ती स्पष्टपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार करण्यात आलेली होती. नवीन सरोगेट मातांची भरती करण्यासाठी ही जाहिरात करण्यात आली होती.
या जाहिरातीत दाखवण्यात आलं होतं की एका महिलेला तिची चूल पेटवण्यासाठी लाकूड किंवा सरपण विकत घेणं किंवा तिच्या मुलांसाठी कपडे खरेदी करणं, यापैकी एका निवड करण्यास भाग पडतं आहे.
युद्धाच्या काळात युक्रेनमधील महिलांनी ज्या हालअपेष्टा, त्रास सहन केला आहे, त्याला या जाहिरातीतून अधोरेखित करून त्यातून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
युक्रेनमधील सर्वात मोठ्या सरोगसी क्लिनिकनं 2021 मध्ये एक जाहिरात मोहीम चालवली होती. बायोटेक्सकॉम सेंटर फॉर ह्युमन रिप्रोडक्शन असं या क्लिनिकचं नाव आहे. या जाहिरात मोहिमेत सरोगसीतून जन्माला आलेल्या बाळांवर 'ब्लॅक फ्रायडे सेल'ची जाहिरात करण्यात आली होती.
बीबीसीनं बायोटेक्सकॉमला विचारलं की याप्रकारच्या जाहिराती आक्षेपार्ह असू शकतात का? त्यावर बायोटेक्सकॉमनं सांगितलं की या जाहिरातींनी प्रभावीपणे किंवा यशस्वीरित्या लोकांचं लक्ष सरोगसीकडे वेधून घेतलं होतं.
बायोटेक्सकॉमवरील कारवाई
या क्लिनिकच्या कार्यपद्धतींवरदेखील टीका झाली आहे. सरकारी वकिलांनी 2018 मध्ये या क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट टोचिलोव्स्की आणि इतर 2 माजी कर्मचाऱ्यांविरोधात तपास सुरू केला होता. त्यांच्यावर मानवी तस्करीसह इतर विविध गुन्ह्यांचा संशय होता.
'आंतरराष्ट्रीय सहकार्य' मिळवण्यासाठी आणि परदेशातून माहिती संकलित करण्यासाठी हा प्राथमिक तपास स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.
बायोटेक्सकॉम आणि टोचिलोव्स्की यांचा दावा आहे की ते नेहमीच कायद्यानुसार काम करतात आणि त्यांच्यावरील "आरोप ठामपणे फेटाळतात."

फोटो स्रोत, Getty Images
सरकारी वकिलांनी या क्लिनिकवरील मानवी तस्करीच्या आरोपाबाबत सविस्तर माहिती दिली नाही. मात्र बायोटेक्सकॉमनं बीबीसीला सांगितलं की, पालकांचा डीएनए आणि बाळाचा डीएनए यामध्ये फरक होता किंवा ते एकमेकांशी जुळत नव्हते. क्लिनिकचं म्हणणं आहे की यासाठी त्यांचे कर्मचारी जबाबदार नव्हते. तसंच त्यांना "वाटतं की समस्या शुक्राणूच्या संकलनाच्या प्रक्रियेच्या वेळेस घडली असावी."शुक्राणू संकलनाची प्रक्रिया दुसऱ्या देशात पार पडली होती.
कंपनीचा दावा आहे की ते लोकांना पालक होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतात. ते महिलांना कायदेशीररित्या पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून देतात. तसंच ते महिलांना वैद्यकीय सेवा, राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था पुरवतात.
करीना सुरुवातीला बायोटेक्सकॉममध्ये सरोगेट मदर होण्यासाठी गेली होती. मात्र तिनं या क्लिनिकबरोबर पुढे काम न करण्याचा निर्णय घेतला. कारण या क्लिनिकला तिनं दिलेल्या सुरुवातीच्या काही भेटींदरम्यान तिला असं वाटलं की तिथल्या लोकांनी तिला दिलेली वागणूक भावनाशून्य किंवा कोरडेपणाची होती.
सोडून देण्यात आलेली बालकं
अशीही काही प्रकरणं आहेत, ज्यात बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या जैविक पालकांनी त्यांचा विचार बदलल्यामुळे त्या बालकांना सोडून देण्यात येतं.
युक्रेनमध्ये इच्छूक असलेले पालक म्हणजे जे पालक गर्भधारणेसाठी पैसे देतात, ते बाळाच्या जन्मानंतर त्याच्यासाठी कायदेशीररित्या जबाबदार असतात. कोणत्याही कारणास्तव बाळाला सोडून देणं, हे बेकायदेशीर आहे.
मात्र प्रत्यक्षात, सीमेपलीकडे कायद्याची अंमलबजावणी करणं कठीण ठरू शकतं.
वेई आता 5 वर्षांचा आहे. त्याचा 2021 मध्ये मुदतीआधी म्हणजे अकाली जन्म झाला होता. त्यानंतर त्याच्या मेंदूला गंभीर स्वरुपाची इजा किंवा अपाय झाला होता. त्याची गर्भधारणा बायोटेक्सकॉमच्या माध्यमातून झाली होती.
वेई सध्या कीवमध्ये सरकारकडून चालवल्या जात असलेल्या दिव्यांग मुलांसाठीच्या निवाऱ्यात किंवा केंद्रात राहतो.
बीबीसीनं जेव्हा तिथे भेट दिली, तेव्हा वेई त्याच्या सहकाऱ्यांबरोबर कुस्करलेलं केळं खात होता. ते प्रत्येक जेवण एकत्र बसून करतात.
वेईचं दुर्दैवी आयुष्य
वेई मदतशिवाय बसू शकत नाही. तो मान किंवा डोक वर उचलू शकत नाही, तो नीट पाहू शकत नाही. त्याला त्याच्या आयुष्यभर सतत देखभालीची गरज असेल.
वेईच्या स्थितीबद्दल माहित झाल्यावर, त्याच्या आई-वडिलांनी त्याचा स्वीकार न करण्याचं ठरवलं. ते आग्नेय आशियातील देशामधील होते. ते गायबच झाले. अधिकाऱ्यांनी आणि बायोटेक्सकॉमनं त्यांच्याशी संपर्क करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले.
वेईच्या सरोगेट आईलादेखील तो नको होता. युक्रेनमधील कायद्यानुसार सरोगेट आईवर वेईच्या बाबतीत कोणतंही कायदेशीर बंधन नव्हतं.
व्हॅलेरिया सोरुचन युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयात कार्यरत आहेत. कायदेशीर बदलांमागील त्या एक प्रमुख शक्ती आहेत. त्या म्हणतात की सरोगसीच्या माध्यमातून जन्माला आलेल्या 'अनेक' मुलांना सोडून दिलं जातं. अर्थात सरकारकडे याची अचूक आकडेवारी नाही.
त्यांचा तत्त्वत: सरोगसीला विरोध नाही. मात्र सरोगसीबाबत युक्रेनमध्ये नियमनाचा अभाव आहे यावर त्या टीका करतात. तसंच याबाबतीत परदेशी नागरिकांवर बंदी घालण्यास त्या पाठिंबा देतात.
बायोटेक्सकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, टोचिलोव्स्की, या घटनेला 'दुर्दैवी' म्हणतात. ते म्हणाले की जेव्हा पालक बालकाला सोडून देतात, तेव्हा "त्यात काही जबाबदारी आमची आहे असं आम्ही मानतो."
जेव्हा बालकांना सोडून दिलं जातं, तेव्हा या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या सरकारी निवारा किंवा केंद्रांमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाचा काही भार उचलण्याचं कोणतंही कायदेशीर बंधन या क्लिनिक्सवर नसतं. या केंद्र किंवा निवाऱ्यांना सार्वजनिक आणि खासगी असा दोन्ही प्रकारचा निधी मिळतो. वेईच्या प्रकरणात बायोटेक्सकॉमनं कोणताही निधी किंवा पैसे दिलेले नाहीत.
वेईसारखं गंभीर अपंगत्व असलेल्या मुलांना दत्तक घेणारी कुटुंब क्वचितच मिळतात. वेईची फाईल 15 कुटुंबांनी पाहिली आहे. मात्र त्याला दत्तक घेण्यात कोणीही रस दाखवलेला नाही.
दूर अंतरावरून तयार झालेलं एक कुटुंब
मात्र, काहीजणांचा युक्तिवाद आहे की, व्यावसायिक सब्रोगेशन किंवा हक्कांची अदलाबदल ही गोष्ट याच्याशी संबंधित सर्व पक्षांसाठी फायदेशीर ठरू शकते.
हिमात्रज आणि राजवीर बाजवा लंडनमध्ये राहतात. त्यांनी 5 वर्षे गर्भधारणेसाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आलं नाही. यामध्ये विट्रो फर्टिलायझेशनच्या दोन फेऱ्या किंवा चक्रांचाही समावेश आहे. मग त्यांनी सरोगसीचा पर्याय निवडला.
राजवीर 38 वर्षांच्या आहेत. त्यांना एंडोमेट्रिओसिसची समस्या आहे. त्यामुळे गर्भधारणा होणं खूप कठीण होतं. तसंच त्यांना मल्टिपल स्क्लेरोसिसचा (मज्जासंस्थेशी संबंधित) आजारदेखील आहे.
यूकेमध्ये सरोगसीची प्रक्रिया करण्याचा पर्याय या जोडप्यानं नाकारला. तिथे फक्त परोपकारी पद्धतीनं केल्या जाणाऱ्या सरोगसीलाच परवानगी आहे. म्हणजेच सरोगसी मदर होणाऱ्या आईला त्याचा आर्थिक मोबदला मिळत नाही. मात्र तिचा खर्च भागवला जाऊ शकतो.

यूकेमध्ये यासाठीची व्यवस्था सहसा अनौपचारिक स्वरुपाची असते. ती मित्रमंडळी, कुटुंब किंवा संभाव्य पालकांची सरोगेट्सशी गाठ घालून देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत केली जाते.
ब्रिटिश कायद्यानुसार, जोपर्यंत त्या बाळाच्या पालकत्वाचा आदेश जारी करून त्याची जबाबदारी त्याच्या अभिप्रेत किंवा इच्छूक पालकांकडे हस्तांतरित केली जात नाही, तोपर्यंत कायद्यानं त्या बाळाची जबाबदारी त्या सरोगेट मदरवर असते.
आणि हीच मुख्य चिंतेची बाब होती. हिमात्रज आणि राजवीर या पर्यायाबद्दल साशंक होते. कारण यात बाळावर लगेच कायदेशीर हक्क न मिळण्याची शक्यता आहे. कारण अशी काही उदाहरणं आहेत, ज्यात परोपकारी हेतूनं सरोगेट मदर झालेल्या मातांनी त्यांचा विचार बदलला होता. अर्थात ही उदाहरणं खूपच दुर्मिळ आहेत.
युक्रेनमधील सरोगसीची प्रक्रिया पाहून हे जोडपं प्रभावित झालं. तसंच सरोगसीच्या संदर्भातील खर्चाचाही त्यांच्या निर्णयावर प्रभाव पडला.
हिमात्रज आणि राजवीर या जोडप्याला बाळ कसं मिळालं?
गेल्या वर्षी त्यांनी यासाठी बायोटेक्सकॉमची सेवा घेतली. यासाठी त्यांनी जवळपास 87,770 डॉलर्स (अंदाज 84,82,093 रुपये) मोजले. अमेरिकेच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे. अमेरिकेत यासाठी 1,50,000 डॉलर्सहून (अंदाजे 1,44,96,000 रुपये) अधिक खर्च येऊ शकतो. त्यांच्यासाठी हा अनुभव सकारात्मक होता.
विट्रो फर्टिलायझेशनच्या प्रक्रियेद्वारे त्यांनी लंडनमध्ये गर्भ तयार केला होता. तो कीवला पाठवण्यात आला. त्यानंतर तो क्लिनिकच्या क्रायोजेनिक टाक्यांमध्ये ठेवण्यात आला.
गेल्या वर्षी जून महिन्यात, हे जोडपं त्यांच्या मुलाच्या जन्माच्या वेळेस हजर राहण्यासाठी कीवला गेलं.
मात्र ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता आणि पासपोर्ट जारी करण्यास विलंब झाल्यामुळे, त्यांना त्यांच्या बाळाचे पहिले तीन महिने कीवमध्येच राहावं लागलं. तिथे रशियाकडून शहरावर बॉम्बहल्ला सुरू असताना, ते हवाई हल्ल्यांपासून बचावण्यासाठीच्या आश्रयस्थानांमध्ये सतत ये-जा करत होते.
"ते भयानक आणि अवास्तव होतं," असं राजवीर सांगतात.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ते त्यांच्या मुलाला घेऊन इंग्लंडमध्ये परतले.
जूनमध्ये ते त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करतील.
सरोगसीच्या संदर्भात, परदेशी नागरिकांवर बंदी घालणाऱ्या युक्रेनमधील विधेयकाला या जोडप्याचा विरोध आहे. त्यांचा युक्तिवाद आहे की सरोगसी एजन्सीनं त्यांच्या आयुष्यात 'आनंद आणि सुख' आणलं.
"जी गोष्ट आम्हाला कधी शक्य होईल असं वाटलं नव्हतं, ती गोष्ट त्यांनी आम्हाला दिली आहे. त्यांनी आमचं कुटुंब पूर्ण केलं आहे," असं 37 वर्षांचे हिमात्रज म्हणतात.
हिमात्रज आणि त्यांच्या पत्नीनं त्यांच्या बाळाच्या सरोगेट मातेला एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणली होती.
त्या सरोगेट मातेचं कोणतंही शोषण झलं आहे, असं आपल्याला वाटत नाही, असा त्यांचा दावा आहे.
"हा पूर्णपणे त्यांचाच निर्णय होता. हे त्यांच्यासाठी एक साधन होतं. जर यामुळे त्यांना मदत होत असेल, तर शेवटी जे हाती येतं त्यातून प्रत्येकजण समाधानी असेल, याची मला खात्री आहे," असं हिमात्रज म्हणतात.
पेड सरोगसीतून आयुष्य उभं करण्याच्या करीनाच्या आशा
करीनादेखील व्यावसायिक स्वरुपाच्या सरोगसीतून शोषण होतं, ही बाब फेटाळते.
"कोणीही आमच्यावर सक्ती करत नाही. हे माझं शरीर आहे, हा माझा निर्णय आहे. तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी मला मोबदला मिळेल," असं करीना म्हणते.
सरोगसीसाठीच्या कायद्यातील बदलाला ती विरोध करते. तिचं म्हणणं आहे की यामुळे घर विकत घेण्याची तिची योजना 'पूर्णपणे कोलमडेल.'
आपल्या पोटाकडे पाहत ती पुढे म्हणाली, "मला माहित आहे की हे माझं बाळ नाही. मात्र तरीसुद्धा माझं त्याच्यावर प्रेम आहे. मी तिच्याशी बोलते. ती जेव्हा पोटात लाथ मारते, तेव्हा मी तिला सांगते की तिचे आई-वडील तिची वाट पाहत आहेत."
"तिचं आयुष्य चांगलं, सुखी असावं हीच माझी इच्छा आहे," असं करीना शेवटी म्हणाली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)





















