कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार, दिल्लीमध्ये काढणार मोर्चा

फोटो स्रोत, ANI
NEET पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे.
येत्या 5 सप्टेंबरला इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण युवा मोर्चा काढणार असल्याचं सीजेपीने म्हटलं आहे.
सीजेपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेण्याचं आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे.
25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यासोबतच केंद्र सरकारने सीजेपीच्या आंदोलकांविरोधातील एफआयआर मागे घेण्यासह अनेक मागण्या मान्य केल्या होत्या.
20 जुलैला 'संसद चलो' मोर्चादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यामध्ये अनेक आंदोलक आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर आंदोलकांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. तिथे केंद्र सरकारने गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या लोकांविरोधात दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेतले जाऊ शकतात, असं मान्य केलं आहे.
सीजेपीने आपल्या निवेदनात काय म्हटलं?
सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं आहे की, "25 जुलैला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही आणि एफआयआर मागे घेण्याबाबत कोणताही लेखी करार झालेला नाही."
"कॉक्रोच मागे हटणार नाहीत. 5 सप्टेंबरला इंडिया गेटवर भेटूया."

फोटो स्रोत, ANI
सीजेपीने आपल्या 'एक्स' हँडलवर म्हटलं आहे की,"केंद्र सरकारने 25 जुलैला भारतातील तरुणांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा कॉक्रोच जनता पार्टी तीव्र निषेध करते. विशेषतः विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेण्यासंदर्भातील आश्वासनं पाळण्यात आलेली नाहीत."
"सरकारकडून सातत्याने होत असलेला विलंब आणि आश्वासनांची पूर्तता टाळण्याच्या भूमिकेमुळे सीजेपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शांततापूर्ण आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे."
"5 सप्टेंबरला सीजेपी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण युवा मोर्चा काढेल. या मोर्चाचं नेतृत्व नीट पीडित आणि पोलिसांच्या कथित क्रूरतेचे बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांकडून केलं जाईल."
"सरकारने आपलं आश्वासन पाळलं पाहिजे. आमच्या संयमाला आमचा कमकुवतपणा समजू नये."
कोणत्या अटींवर सहमती झाली होती?
25 जुलैला सीजेपीच्या नेत्यांची केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत तिसऱ्या फेरीची चर्चा झाली होती.
याच दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सीजेपीच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.

फोटो स्रोत, ANI
या वेळी सीजेपीच्या इतर मागण्यांवरही सहमती झाल्याचं सांगण्यात आलं होतं. यामध्ये आत्महत्या केलेल्या नीट परीक्षार्थींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देणे आणि आंदोलकांविरोधात एफआयआर दाखल न करणे, या मागण्यांचा समावेश होता.
आंदोलनानंतर आंदोलकांवर पोलिस कारवाई केली जाणार नाही, यावरही सहमती झाल्याचं सीजेपीने म्हटलं होतं.
आंदोलकांविरोधातील कारवाई थांबवली नाही, तर त्यांना पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही सीजेपीने दिला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























