वटवाघळांपासून पसरणारे व्हायरस 'एवढे' धोकादायक, चावल्यास त्वरित करा 'हे' काम

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, कमलादेवी नल्लपनेनी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अलीकडेच कॅनडामध्ये वटवाघळांमुळे रेबीजची लागण होऊन एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

या घटनेनंतर वटवाघळांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, भूतकाळात निपाह आणि इबोलासारखे आजार पसरण्यामागे वटवाघळं हेच मुख्य कारण होतं.

वटवाघळांमुळेच कोरोना व्हायरस माणसांमध्ये पसरला अशी एक अफवा देखील उठली होती. पण याबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत.

भारतासह अनेक देशांमध्ये वटवाघळाला अशुभ मानलं जातं. अशा समजुती का सुरू झाल्या याचं नेमकं कारण माहीत नाही. पण जेव्हा वटवाघळांमुळे अनेक जीवघेणे व्हायरस पसरू शकतात हे कळतं तेव्हा त्यांची भीती वाटणं अगदी साहजिक आहे.

रेबीज हा वटवाघळांद्वारे पसरणारा एक धोकादायक आजार आहे. याशिवाय श्वसनसंस्थेशी संबंधित इतर व्हायरस देखील पसरतात. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलनुसार, वटवाघळामुळे पसरलेल्या रेबीजमुळे एका कॅनेडियन मुलाचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार अमेरिकेच्या अनेक भागांत रक्त शोषणाऱ्या वटवाघळांमुळे रेबीज पसरण्याचा धोका असतो.

पण यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) अभ्यासात शोधलं आहे की, वटवाघळांच्या एकूण संख्येच्या तुलनेत 1 टक्क्याहून कमी वटवाघळांमध्ये रेबीजचा संसर्ग असतो. तरीही वटवाघळांपासून सावध राहणं आवश्यक आहे.

या शोधानुसार, दिवसाच्या वेळी विचित्रपणे उडणाऱ्या किंवा आजारी वाटणाऱ्या वटवाघळांना कधीही हात लावू नये. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा इजा देखील पोहोचवू नये.

चांगली-निरोगी वटवाघळं सहसा माणसांना बघून उडून जातात. ती स्वतःहून कधीही हल्ला करत नाहीत.

बहुतांश वटवाघळं आकाराने खूप लहान असतात. त्यांचे लहान दात आणि कमकुवत जबडे फक्त किडे चावून खाण्यासाठीच बनलेले असतात.

पण होरी बॅट (Hoary bat) आणि बिग ब्राउन बॅट (Big brown bat) सारख्या काही प्रजातींच्या वटवाघळांचे दात मोठे आणि खूप तीक्ष्ण असतात.

जर त्यांना योग्य पद्धतीने पकडले नाही तर ते त्वचेत दात रुततील अशा प्रकारे चावू शकतात. त्यामुळे वटवाघळांना कधीही हाताने पकडू नये किंवा स्पर्श करू नये.

तुम्हाला वटवाघूळ चावले तर ताबडतोब ती जखम साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. त्यानंतर तातडीने डॉक्टरांकडे जावे.

कॅनडातील मुलाच्या प्रकरणात वटवाघूळ त्याच्या चेहऱ्यावर बसले होते तरीही पालकांना ते मुलाला चावल्याचं समजलं नव्हतं. कारण चावल्याची कोणतीही स्पष्ट खूण दिसत नव्हती.

वटवाघूळ चावल्यास वेदना होऊ शकतात. परंतु रक्त येईल किंवा स्पष्ट जखम दिसेलच असे गरजेचे नाही.

त्यामुळे जर वटवाघळाचा शरीराला थेट स्पर्श झाला असेल किंवा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा थेट संपर्क आला असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्यावी. जर आवश्यक वाटले तर डॉक्टर रेबीजची लस देऊ शकतात.

रेबीजची लक्षणे दिसण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे काही महिन्यांपूर्वी जरी तुम्ही वटवाघळाच्या संपर्कात आला असाल तरी तुम्ही संपूर्ण तपासणी करून घेतली पाहिजे.

चावल्याची खूण दिसत नसली तरीही रेबीज प्रतिबंधक उपचारांची गरज आहे की नाही, याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

जर चावलेले वटवाघूळ पकडले गेले तर त्याची रेबीजसाठी तपासणी केली जाऊ शकते. त्याचे निकाल 48 तासांतच मिळतात.

त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीजचे उपचार सुरू करण्यापूर्वी थोडी प्रतीक्षा करता येऊ शकते.

कॅनेडियन मुलाच्या प्रकरणात कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलने नमूद केलं होतं की, वटवाघूळ मुलाच्या चेहऱ्यावर बसले असूनही त्याला डॉक्टरांकडे घेऊन न जाणं हे जागरूकता नसल्याचं उदाहरण आहे.

रेबीजने संक्रमित वटवाघळे दिवसाच्या वेळीही पाहायला मिळतात. ती असामान्य वर्तन करू शकतात. जसं की, जमिनीवर पडून राहणं, कोणाच्या चेहऱ्यावर येऊन बसणं, व्यवस्थित उडू न शकणं किंवा सहजपणे माणसांच्या अगदी जवळ येणं इत्यादी.

अर्थात, यांपैकी कोणतेही लक्षण नसले तरी त्या वटवाघळाला रेबीज नाही असं गृहीत धरून चालणार नाही.

वटवाघळे व्हायरसचा मुख्य स्त्रोत आहेत का?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

माणसांमध्ये जीवघेणा व्हायरस पसरवणाऱ्या प्राण्यांमध्ये वटवाघळांचा नंबर सगळ्यात वर लागतो. रेबीजपासून ते इबोलापर्यंतच्या कितीतरी व्हायरससाठी वटवाघळं हे एक नैसर्गिक घरच आहेत.

निपाह, मारबर्ग, रेबीज आणि मर्ससारख्या व्हायरससोबतच इतर प्राण्यांमध्ये पसरून त्यांच्यामार्फत माणसांत येणारे अनेक व्हायरस वटवाघळांमध्ये पाहायला मिळतात.

पण वटवाघळांच्या शरीरात असणाऱ्या एका वेगळ्याच रोगप्रतिकारक शक्तीमुळे या व्हायरसचा त्यांच्या स्वतःच्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही.

टेरोपोडिडे प्रजातीची फळं खाणारी वटवाघळं (फ्रूट बॅट) ही निपाह व्हायरसचं नैसर्गिक घर आहेत. ती आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांत आढळतात. आफ्रिकेतील टेरोपोडिडे कुळातील फ्रूट बॅट्समध्ये निपाह आणि हेंड्रा व्हायरसचे अँटीबॉडीज आढळून आले आहेत.

यावरून शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, हा व्हायरस आफ्रिकेतील वटवाघळांमध्येही असू शकतो.

निपाह व्हायरसची लागण झाल्यानंतरही वटवाघळांमध्ये सामान्यतः कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. परंतु अशी संक्रमित वटवाघळं, डुक्कर किंवा घोडे यांसारख्या प्राण्यांच्या माध्यमातून हा व्हायरस माणसांमध्ये पसरू शकतो.

याशिवाय संक्रमित वटवाघळांमुळे दूषित झालेली फळं आणि फळांपासून बनवलेल्या पदार्थांमार्फत देखील संसर्ग पसरण्याची शक्यता असते.

फळं खाणाऱ्या वटवाघळांना 'मेगा बॅट्स' असंही म्हणतात. ही जगातल्या सगळ्यात मोठ्या आकाराच्या वटवाघळांच्या प्रजातीमध्ये मोडतात.

ही वटवाघळं सहसा मध्यम हवामानाच्या किंवा उबदार भागात पाहायला मिळतात.

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

संपूर्ण जगाला ठप्प करणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी वटवाघळंच जबाबदार आहेत, असेही अनेक दावे केले गेले होते.

पण बऱ्याच शास्त्रज्ञांचं असं म्हणणं होतं की कोरोनाच्या संसर्गासाठी थेट वटवाघळांनाच दोषी ठरवणं योग्य नाही.

त्यांचं असं म्हणणं होतं की, जरी या व्हायरसची सुरुवात वटवाघळांपासून झाली असली तरी तो थेट वटवाघळांमुळे माणसांमध्ये पसरला नव्हता. तर एका मध्यस्थ प्राण्याद्वारे तो माणसांमध्ये पसरला. तो प्राणी पँगोलिन असू शकतो अशी शंकाही वर्तवली गेली होती.

काही शास्त्रज्ञांनी असाही दावा केला की, कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी वटवाघळांवर संशोधन करणं आणि त्यांचं टिकून राहणं माणसांसाठी खूप गरजेचं आहे.

वटवाघळांमुळे काय फायदे होतात?

शास्त्रज्ञांच्या मते, फुलांचे परागीकरण, बियांचा प्रसार करणं आणि पिकांवरील कीड नियंत्रित राखणं यांसारखी कामं करून वटवाघळं पर्यावरणाची खूप मोठी सेवा करतात.

खाद्यपदार्थांपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत, घरगुती वापराच्या अनेक वस्तू, काही औषधांपर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये वटवाघळांचे योगदान आहे.

तज्ज्ञांच्या मते, वटवाघळं ही पक्ष्यांपेक्षा दुप्पट वेगाने बिया पसरवतात.

त्यामुळेच उष्णकटिबंधीय भागात नष्ट झालेली जंगले पुन्हा उभी करण्यात आणि निसर्गाचा समतोल राखण्यात त्यांची भूमिका खूप मोलाची आहे.

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

भारताच्या 32.8 लाख चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रातील विविध निसर्गरम्य ठिकाणी वटवाघळांच्या एकूण 135 प्रजाती आढळतात.

यापैकी 16 प्रजाती अशा आहेत ज्या जगातील इतर कोणत्याही देशात पाहायला मिळत नाहीत.

पण वटवाघळांच्या अनेक प्रजातींची संख्या सातत्याने घटत आहे. सध्या भारतीय कायद्यांतर्गत केवळ 12 प्रजातींनाच कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.

वटवाघळांच्या प्रजाती नामशेष होऊ नयेत म्हणून, 'बॅट कन्झर्वेशन इंटरनॅशनल' आणि 'नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन' हे दोन्ही मिळून भारतात वटवाघळांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत.

वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि सरकारी संस्थांसोबत मिळून एक व्यापक कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करून सर्वाधिक धोक्यात असलेल्या वटवाघळांच्या प्रजातींचं संरक्षण करणे हा त्यांचा उद्देश आहे.

एका संशोधनात समोर आलं आहे की, वाढती पर्यटन गर्दी आणि शहरांचा विस्तार यांमुळे गुहा आणि ऐतिहासिक इमारतींमध्ये राहणाऱ्या वटवाघळांच्या राहण्याच्या जागांवर वाईट परिणाम होत आहे.

27 संस्थांच्या 34 तज्ज्ञांनी दोन वर्ष अभ्यास करून 'स्टेट ऑफ इंडिया बॅट्स' हा रिपोर्ट तयार केला आहे.

व्हॅम्पायर वटवाघूळ म्हणजे काय?

केवळ रक्तावर जगणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये व्हॅम्पायर वटवाघूळ (Vampire bat) हा एक वेगळा प्राणी आहे.

रात्रीच्या वेळी ते खाली उतरून गाय, इतर जनावरं आणि कधीकधी माणसांवरही हल्ला करतात आणि त्यांचं रक्त पिऊन स्वतःचं पोट भरतात.

व्हॅम्पायर वटवाघळे रक्त चोखत नाहीत.

ती आपल्या पुढच्या तीक्ष्ण दातांनी त्वचेवर एक लहान चीर पाडतात आणि नंतर त्या जखमेतून निघणारे रक्त जिभेने चाटून पितात.

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेत सापडणारी व्हॅम्पायर वटवाघळं गाय, घोडे यांसारख्या पाळीव जनावरांसोबतच हरीण, रानडुक्कर आणि काही वेळा सीलसारख्या जलचर प्राण्यांचं रक्त पिऊनही जगतात.

कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडातील त्या मुलाच्या चेहऱ्यावर बसलेलं वटवाघूळसुद्धा याच व्हॅम्पायर प्रजातीचं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)