पुण्याच्या विषारी दारूबळींनंतर भिवंडीत धडक कारवाई, असा सापडला 5929 किलो मिथेनॉलचा साठा

फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर या भागात अवघ्या 30 रुपयांत मिळणारी गावठी दारू पिल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

फोटो स्रोत, Getty Images, UGC

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूच्या सेवनानंतर झालेल्या 14 जणांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर धाड टाकून 'मिथेनॉल'चा मोठा साठा जप्त केला आहे.

फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर या भागात अवघ्या 30 रुपयांत मिळणारी गावठी दारू पिल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

या दारूत 'मिथेनॉल' हे विषारी रसायन मिसळल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट होताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.

याबाबत पुणे पोलीस तसेच राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे.

दारू पुरवठ्याची साखळी उघड

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नालसिंग विरका यांनी फुगेवाडी येथील घरी हातभट्टीची दारू पिली होती.

ही दारू त्यांना योगेश वानखेडे याने दिली होती. योगेश हा उरळी कांचन येथील राजू प्रजापतीकडून दारू आणून इतरांना पुरवठा करत होता.

याच साखळीत वापरलेले मिथेनॉल हे रेक्स इंटरनॅशनल या कंपनीकडून मिळाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे या कंपनीचा थेट दुवा समोर आला आहे.

भिवंडीत छापा; 39 ड्रममधील 5929 किलो साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांनी 29 मे रोजी भिवंडीतील अंजूर रोडवरील गाळ्यावर छापा टाकला.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या या कारवाईत 39 ड्रम आणि कारबॉयमध्ये साठवलेले एकूण 5929 किलो रासायनिक पदार्थ आढळून आले.

या साठ्याची अंदाजे किंमत सुमारे 3.6 लाख रुपये इतकी असून साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून गाळा सील करण्यात आला.

तपासणीदरम्यान या रासायनिक साठ्याची कोणतीही अधिकृत नोंद आढळली नाही. खरेदी-विक्रीचा तपशील उपलब्ध नव्हता, तसेच स्टॉक नोंदवहीही सापडली नाही.

ही परिस्थिती विष द्रव्य कायदा 1919 तसेच महाराष्ट्र विष द्रव्य नियम 1972 चे उल्लंघन करणारी असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. त्यामुळे विषारी पदार्थांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन साठा जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

परवाना रद्द करण्याची प्रक्रिया

या प्रकरणात रेक्स इंटरनॅशनलचे मालक अरुणकुमार चौबे आणि अभिषेक अरुणकुमार चौबे यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 274, 275 तसेच विष द्रव्य कायदा 1919 आणि महाराष्ट्र विष द्रव्य नियम 1972 अंतर्गत कारवाई सुरू आहे.

तसेच अन्न व औषध प्रशासनाने कंपनीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.

गावठी दारू प्राणघातक कशी ठरते?

फोटो स्रोत, UGC

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अवैध औषध उत्पादन, साठवणूक आणि विक्रीविरोधात यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल, असं अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले

तसेच नागरिकांनी संशयास्पद औषध किंवा साठ्याबाबत तक्रार केल्यास ती गोपनीयतेने तपासून तात्काळ कारवाई केली जाईल, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

गावठी दारू प्राणघातक कशी ठरते?

देशी दारूला कच्ची दारू असंही म्हणतात. तिचं मिश्रण करणं अतिशय सोपं असतं. पण या कच्च्या दारूची झिंग म्हणजे त्यामुळं होणारी नशा वाढवण्याच्या नादात ती विषारी बनते.

सामान्यत: गूळ आणि उसाच्या मळीपासून देशी दारू तयार केली जाते. त्यात युरिया आणि बेलाची पानं टाकली जातात. त्यामुळे त्याची नशा आणखी जास्त होते.

दारू जास्तीत जास्त चढावी, यासाठी त्यात ऑक्सिटॉसिन टाकलं जातं, ते मृत्यूला निमंत्रण देते.

गेल्या काही वर्षांत अशी माहिती मिळाली आहे की ऑक्सिटॉसिनमुळे वंध्यत्व येतं आणि मज्जासंस्थेशी निगडीत आजार होतात.

गावठी दारू प्राणघातक कशी ठरते?

फोटो स्रोत, UGC

त्याच्या सेवनामुळे डोळ्यात जळजळ, खाज आणि पोटात जळजळ होऊ शकते. दीर्घकाळ सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.

कच्च्या दारूत युरिया आणि ऑक्सिटॉसिन सारखे रासायनिक पदार्थ मिसळल्यास मिथिल अल्कोहोल तयार होतं आणि त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

मिथिल अल्कोहोल शरीरात जाताच झपाट्याने रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे शरीराच्या आतले अवयव निकामी होतात आणि लगेच मृत्यू ओढवतो.

जे द्रव्य दारू म्हणून विकलं जातं ते 95 टक्के शुद्ध अल्कोहोल म्हणतात. त्याला इथेनॉलसुद्धा म्हणतात.

उसाचा रस, ग्लुकोज, पोटॅशियम नायट्रेट, मोहाची फुलं तसंच बटाटे, भात, जवस, मका असे स्टार्च असलेले पदार्थ एकत्र आंबवून इथेनॉल तयार केलं जातं.

मिथेनॉल का घातक?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इथेनॉलमध्ये आणखी नशा टाकण्यासाठी त्यात मिथेनॉल टाकलं जातं. त्यात कास्ट अल्कोहोल किंवा कास्ट नॅप्था या नावाने ओळखलं जाणारं मिथेनॉल मिसळलं जातं की दारूचं संतुलन बिघडतं आणि ती धोकादायक बनते.

रसायनशास्त्रातील सर्वांत सोपं सरळ अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल. सामान्य तापमानात ते द्रवरूपात आढळतं.

हे एक रंगहीन आणि ज्वलनशील द्रव्य आहे. त्याचा गंध इथेनॉलसारखाच असतो. त्याचा वापर अँटीफ्रीझर म्हणून, म्हणजे गोठणबिंदू कमी करण्यासाठी केला जातो. तसंच एखादा पदार्थ तयार करण्यासाठी आणि इंधन म्हणूनही मिथेनॉल वापरलं जातं.

मिथेनॉल अतिशय विषारी असतं, हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचा वापर पिण्यासाठी अजिबात केला जात नाही. ते प्यायल्यामुळे मृत्यू ओढवतो तसंच दृष्टी जाण्याचाही धोका असतो.

औद्योगिक क्षेत्रात इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, कारण इथेनॉलची विरघळण्याची क्षमता जास्त आहे. त्याचा वापर वॉर्निश, पॉलिश, औषधं, क्लोरोफॉर्म, कृत्रिम रंग, पारदर्शक साबण, अत्तर आणि इतर द्रव्यं तयार करण्यासाठी होतो.

दारूच्या अनेक प्रकारात, जखमा स्वच्छ करताना जंतू नष्ट करण्यासाठी तसंच प्रयोगशाळेत द्रावण (solvent) म्हणून त्याचा वापर करण्यात येतो.

मिथेनॉल

फोटो स्रोत, Getty Images

विषारी दारू प्यायल्यामुळे शरीरात काय होतं?

या प्रश्नावर डॉ. अजित श्रीवास्तव म्हणतात, "सामान्य दारू ही इथाईल अल्कोहोल असते तर मिथाईल अल्कोहोल विषारी असते. कोणतंही अल्कोहोल शरीरात लिव्हरच्या माध्यमातून अल्डिहाईडमध्ये बदलतं. मात्र मिथाईल अल्कोहोलचं फॉर्मलडिहाईड नावाच्या विषात रूपांतर होतं.

"या विषाचा सगळ्यांत जास्त परिणाम डोळ्यांवर होतो. आंधळेपणा हे त्याचं पहिलं लक्षण आहे. एखाद्याने जास्त दारू प्यायली तर फॉर्मिक अॅसिड शरीरात तयार होतं. त्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो," श्रीवास्तव सांगतात.

आश्चर्याची गोष्ट अशी की विषारी दारूचा उपचारही दारूनेच होतो.

डॉ. अजित श्रीवास्तव सांगतात, "मिथाईल अल्कोहोलचा उपचार इथाईल अल्कोहोल आहे. विषारी दारूला उतारा म्हणून गोळ्याही मिळतात. मात्र भारतात त्या जास्त प्रमाणावर उपलब्ध नाहीत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)