छातीत दुखल्यावर चुकीची गोळी घेतल्यास काय होतं? ॲस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट या गोळ्यांमधला फरक काय?

छातीत दुखलं तर Aspirin की Sorbitrate? डॉक्टरांचा इशारा

फोटो स्रोत, Getty Images

  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

32 वर्षांच्या एक महिला रुग्ण. त्यांना कार्डिॲक हिस्ट्री म्हणजे हृदयाशी संबंधित आजार नव्हता. तसेच अतिरक्तदाब, मधुमेह किंवा कोणतंही व्यसन नव्हतं. पण एकेदिवशी त्यांच्या हृदयाचे ठोके अचानक वेगानं पडायला लागले. छातीतही दुखायला लागलं आणि श्वास कोंडल्यासारखं झालं. हॉस्पिटलकडे जाताना घाईघाईतच त्यांनी सॉर्बिट्रेटच्या तीन गोळ्या जीभेखाली ठेवल्या.

हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागाच्या दारातच त्या कोसळल्या. त्यांची नाडी एकदम अनियमित लागत होती आणि रक्तदाबही एकदम खाली आलेला. मग ईसीजी काढला गेला तो नॉर्मल आला मग ट्रोपोनिन्स, टुडी इकोसारख्या हृदयाच्या आजारासाठी केल्या जाणाऱ्या टेस्ट केल्या त्याही नॉर्मलच आल्या. हे सगळं झालं होतं पॅनिक ॲटॅकमुळे. या बाईंना हृदयाशी संबंधित काहीच झालं नव्हतं तर त्यांना पॅनिक ॲटॅक आला होता. सॉर्बिट्रेट गोळ्यांमुळे त्यांचा रक्तदाब एवढा खाली आला होता. तो नॉर्मल व्हायला डॉक्टरांना पुढचे 24 तास प्रयत्न करावे लागले.

हा अनुभव आपल्याला सांगितलाय मुंबईतल्या डॉ. निहार मेहता यांनी. डॉ. निहार मेहता हे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे स्ट्रक्चरल हार्ट व्हॉल्व्ह डिसिज विभागात असोसिएट डायरेक्टर आहेत.

या महिलेच्या अनुभवानंतर त्यांनी आणखी एक दुसरा पण एकदम उलटा अनुभव सांगितला.

डॉ. मेहतांनी दुसरं उदाहरण एका 43 वर्षांच्या गृहस्थांचं दिलं. त्यांचं कोलेस्ट्रॉल नेहमी जास्त असे आणि त्यांच्या घरात हृदयविकाराच्या धक्क्यांचा मोठा इतिहासच होता. त्यांचे वडील आणि भाऊ या दोघांनाही 40 ते 50 या वयामध्ये हार्ट ॲटॅक आले होते.

एकेदिवशी गाडी चालवत असताना या गृहस्थांच्या छातीत घट्टघट्ट वाटायला लागलं, एकदम दरदरुन घाम यायला लागला. त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि डॉक्टरांना फोन केला आणि मला छातीमध्ये अतिशय विचित्र असा त्रासदायक प्रकार जाणवतोय असं सांगितलं. मला हा हार्ट ॲटॅक असावा असं वाटतंय असंही त्यांनी सांगितलं. कारण असाच अनुभव त्यांच्या भावाला दोन वर्षांपूर्वी जेव्हा हार्ट अटॅक आला होता तेव्हा आला होता. मी नेहमीच ॲस्पिरिन (325मिग्रॅ) आणि सॉर्बिट्रेट या गोळ्या गाडीमध्ये ठेवतो आता मी काय करू? असा प्रश्न त्यांनी डॉ. निहार मेहतांना विचारला.

त्यावर डॉक्टरांनी तात्काळ ॲस्पिरिन घ्यायला सांगितली, सॉर्बिट्रेट घेऊ नका असं सांगून गाडी न चालवता टॅक्सी किंवा रुग्णवाहिकेनं जवळच्या हॉस्पिटलला जायला सांगितलं.

त्या गृहस्थांना हार्ट अटॅक आला होता. रुग्णालयात त्यांच्यावर पुढचे उपचार करण्यात आले.

डॉ. निहार मेहता कोटकार्ड

डॉ. निहार मेहतांचे हे अनुभव सांगण्याचं कारण म्हणजे सतत चर्चेत येणाऱ्या या दोन गोळ्या. Aspirin आणि Sorbitrate.

छातीत दुखणे ही नेहमीच गंभीर बाब समजली जाते आणि अशा वेळी कोणती गोळी घ्यावी याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. Aspirin आणि Sorbitrate या दोन्ही औषधांबद्दल अनेकांना वाटतं की ती एकाच कामासाठी वापरली जातात, पण प्रत्यक्षात त्यांची भूमिका वेगळी आहे.

तज्ज्ञांच्या मते, ॲस्पिरिन रक्तातील प्लेटलेटची क्रिया कमी करून गुठळी तयार होण्याची प्रक्रिया थांबवतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येताना ॲस्पिरिन उपयुक्त ठरू शकते.

मात्र, सॉर्बिट्रेट हे औषध प्रामुख्याने अंजायना असलेल्या रुग्णांसाठी असतं. हे औषध रक्तवाहिन्या रुंद करून तात्पुरता आराम देतं, पण ते प्रत्येकाने स्वतःहून घेणं धोकादायक ठरू शकतं, कारण त्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. (अंजायना म्हणजे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत होणारी वेदना किंवा जडपणा.)

छातीत दुखलं तर Aspirin की Sorbitrate? डॉक्टरांचा इशारा

फोटो स्रोत, Getty Images

महत्त्वाचं म्हणजे, सॉर्बिट्रेट घेतल्यावर वेदना कमी झाल्या तरी धोका टळतो असं नाही. यामुळे काही वेळा रुग्ण हॉस्पिटलला जाणं टाळतात, त्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते.

या दोन्ही गोळ्या उपलब्ध असल्या तरी त्या सहज वापरण्यासाठी नाहीत. कोणत्याही आजाराचं किंवा आपल्या शारीर-मानसिक स्थितीचं निदान डॉक्टरांनीच केलं पाहिजे. त्यांनी केलेल्या चाचण्यांमधूनच आपल्या आजाराचं निदान झालेलं असलं पाहिजे.

डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कोणतंही औषध घेणं धोकादायक आहे. त्यामुळेच या दोन्ही औषधांची माहिती असणं आवश्यक आहे.

छातीत दुखलं तर Aspirin की Sorbitrate? डॉक्टरांचा इशारा

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बहुतांश लोक कार्डिॲक अरेस्ट आणि हार्टॲटॅक हे एकच असल्याचं समजतात. पण हे खरं नाही. दोन्ही गोष्टींमध्ये फार फरक आहे. जेव्हा कोरोनरी आर्टरीमध्ये गुठळ्या तयार झाल्यानं हृदयापर्यंत रक्तपुरवठा होण्यात अडथळे येतात तेव्हा हार्ट ॲटॅक येतो.

तर कार्डिॲक ॲरेस्टमध्ये हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टिम बिघडते. कार्डिअक ॲरेस्टमध्ये हृदय अचानक धडधडणं थांबवतं किंवा गंभीरपणे अनियमित होतं आणि त्यामुळे मेंदू किंवा इतर अवयवांपर्यंत रक्त पोहोचवण्यात अडथळे निर्माण होतात.

अशा वेळी काही क्षणांतच व्यक्ती बेशुद्ध पडते आणि हृदयाचे ठोकेही मंदावत जातात. जर योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत, तर काही सेकंदांत किंवा मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

या दोघांपेक्षा पॅनिक ॲटॅक वेगळा असतो. चिंता आपल्या सर्वांना कमी अधिक प्रमाणात जाणवत असतेच पण अचानक तीव्रतेने चिंता वाटायला लागून जेव्हा गोंधळलेली अवस्था निर्माण होते तेव्हा पॅनिक ॲटॅक आला असं म्हणतात.

पॅनिक ॲटॅक आलेल्या व्यक्तीला अचानक छातीत धडधडू लागतं, घाम येतो, भीती वाटते, अस्वस्थ वाटून कुठंतरी मोकळ्या हवेत जावं असं वाटू लागतं, तोंड सुकतं. सर्व लक्ष शरीराकडे केंद्रित होतं.

अशा रुग्णाने घाबरुन अधिक धावपळ केल्यास हृदयाचे ठोके अधिक जलदगतीने पडून आणखी भीती वाटायला लागते. घाबरल्यामुळे या लक्षणांमध्ये अधिकच वाढ होते.

कोणतं औषध कधी?

आता ही औषधं नक्की काय काम करतात हे समजून घेतलं तर त्यांच्यामधला फरक समजू शकतो.

डॉ. मेहता सांगतात, "छातीत जडपणा, अस्वस्थता, घाम येणे आणि डाव्या हाताकडे वेदना जाणे छातीत दुखणं अशाप्रकारचं छातीचं दुखणं अंजायना (हृदयविकारसदृश वेदना) सूचित करतं. अशा वेळी सॉर्बिट्रेट उपयोगी ठरते."

ते पुढं म्हणाले, "हे औषध आधीपासून हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी (ज्यांना आर्टरीत ब्लॉकेजेस आहेत किंवा ज्यांनी स्टेंट किंवा बायपास सर्जरी केली आहे) विशेषतः उपयोगाचं असतं.

सॉर्बिट्रेट हे हृदयाच्या रक्तवाहिन्या (कोरोनरी आर्टरीज) तात्पुरत्या रुंद करते, यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि वेदना कमी होतात. त्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी थोडा वेळ मिळतो.

मात्र, सॉर्बिट्रेट घेतल्यावर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन इसीजी करणं अत्यावश्यक आहे."

ते पुढं सांगतात, "ॲस्पिरिन हे अँटिप्लेटलेट औषध आहे, त्याला सामान्यतः 'ब्लड थिनर' असं म्हटलं जातं. हे औषध रक्तातील प्लेटलेटचं कार्य कमी करतं. हृदयविकाराच्या झटक्यात आर्टरीमध्ये गुठळी तयार होते, कारण प्लेटलेट एकत्र येऊन रक्तवाहिनी बंद करतात आणि काही सेकंदांत हार्ट अटॅक येऊ शकतो. ॲस्पिरिन ही प्रक्रिया थांबवून गुठळी तयार होण्याचा वेग कमी करते आणि त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यास मदत होते."

छातीत दुखत असल्यास ॲस्पिरिन घेणं उपयोगी ठरू शकतं. मात्र, तेवढ्यावर थांबून चालत नाही. त्यानंतर त्वरित इमर्जन्सी विभागात जाऊन इसीजी करणं अत्यावश्यक आहे.

निरोगी व्यक्तीनं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रोज ॲस्पिरिन घ्यावी का?

या दोन औषधांबद्दल होणाऱ्या गल्लतीबद्दल आणि गैरसमजुतीबद्दल आम्ही डॉ. अमित सिंग यांच्याकडून अधिक माहिती घेतली. डॉ. अमित सिंग हे नवी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय येथे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

निरोगी व्यक्तीनं डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय दररोज ॲस्पिरिन घेतली तर चालते का असं विचारल्यावर त्यांनी याला नाही असं उत्तर दिलं.

डॉ. अमित सिंग सांगतात, "ज्यांनी आधी हार्ट अटॅक येऊन गेलाय, ज्यांना स्टेंट बसवलाय, बायपास शस्त्रक्रिया झालीय किंवा कोरोनरी आर्टरीच्या आजाराचं ठोस निदान झालंय अशा लोकांनीच रोज हे औषध घेणं योग्य ठरतं. मात्र निरोगी लोकांनी 'संभाव्य आजार टळेल' असा विचार करुन रोज हे औषध घेतलं तर मात्र दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे गॅस्ट्रिक अल्सर्स, आतड्यात रक्तस्राव काही बाबतीत मेंदूतही रक्तस्राव होण्याचा घटना घडल्या आहे.

ASPREE ट्रायल या अभ्यासात असं आढळलं की, 70 वर्षांवरील निरोगी प्रौढांमध्ये दररोज ॲस्पिरिन घेण्यामुळे गंभीर रक्तस्त्रावाचा धोका वाढतो, पण हृदयविकाराच्या घटनांमध्ये कोणताही ठोस फायदा दिसून येत नाही.

म्हणून, हृदयासाठी दररोज कोणतंही औषध सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बसून आपला व्यक्तिगत धोका आणि गरज यावर चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे."

सॉर्बिट्रेट घेतली आता विषय संपला?

काही लोक घरच्याघरी उपचार करुन किंवा स्वतःच्या मनाची समजूत काढून पुढील उपचार टाळत असतात. बऱ्याच लोकांना आपण सॉर्बिट्रेट गोळी घेतली आता कशाला पुढे उपचार असं वाटू शकतं. यातला धोका काय आहे, याबद्दल आम्ही डॉ. सिंग यांना विचारलं.

त्यावर ते म्हणाले, "या गोष्टीचा धोका लोकांना आजिबात समजलेला नसतो याचा अनुभव मला वारंवार येतो. एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि त्यानं सॉर्बिट्रेट घेतली तर थोडा आराम मिळू शकतो. यावेळेत तुमचा रक्तदाब कमी होतो, वेदना थोड्या कमी होतात. मग त्यांना काही विशेष झालंच नव्हतं, गोळी घेतल्यावर बरं वाटलं, असं वाटायला लागतं."

यातला धोका सांगताना डॉ. अमित पुढं म्हणाले, "पण प्रत्यक्षात रक्तवाहिनी अजूनही ब्लॉक असते. हृदयाच्या स्नायूंना अजूनही ऑक्सिजन मिळत नसतो. या तात्पुरत्या आरामामुळे रुग्ण 2 , 3, अगदी 4 तास हॉस्पिटलला जाणं पुढे ढकलतो. तोपर्यंत झालेली हानी परत भरून न निघणारी (irreversible) असू शकते.

मी स्वतः अशा अनेक रुग्णांना पाहिलं आहे, ज्यांनी अशा पद्धतीमुळे हृदयाची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर गमावली आहे. सॉर्बिट्रेटमुळे हृदयविकाराचा धोका बरा होत नाही तर हार्ट अटॅकचं एक लक्षण तात्पुरतं कमी होतं. त्यामुळेच तात्पुरता आराम मिळाला की थांबणं ही मोठी समस्या आहे."

छातीत दुखलं तर Aspirin की Sorbitrate? डॉक्टरांचा इशारा

फोटो स्रोत, Getty Images

छातीत दुखल्यावर घरी गोळी घेण्याऐवजी हॉस्पिटलला कधी जायचं? असा प्रश्न विचारल्यावर डॉ. अमित सिंग म्हणाले,"मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगतो...जर छातीत दुखण्यासोबत काही कारण नसताना घाम येत असेल, तर तो एक मोठा इशारा आहे. जर वेदना डाव्या हाताकडे, जबड्याकडे, मानेला किंवा पाठीकडे पसरत असतील, तर तात्काळ हॉस्पिटलला जा."

त पुढं म्हणाले, "जर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वेदना टिकून राहिल्या आणि विश्रांती घेतल्यावरही कमी होत नसतील, तर थांबू नका. अचानक श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ, किंवा काहीतरी गंभीर बिनसलंय अशी भावना होत असेल. तसेच त्याला रुग्ण अनेकदा "काहीतरी मोठं वाईट होणार आहे" असं वर्णन करतात अशा वेळी त्या भावनेवर विश्वास ठेवा. आणि जर एखादा रुग्ण क्षणभर जरी बेशुद्ध झाला, तर लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल करा."

"मी अनेकदा पाहिलं आहे की लोक 3-4 तास वेगवेगळ्या गोळ्या घेण्यात, पाणी पिण्यात किंवा झोपण्यात वेळ घालवतात. पण हृदयविकाराच्या झटक्यात प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. प्रत्येक मिनिटाला हृदयाच्या पेशी मरत असतात. घरातली कुठलीही गोळी इतका मोठा धोका पेलू शकत नाही."

व्हायग्रा औषधांचा कसा त्रास होऊ शकतो?

व्हायग्रा (सिल्डेनाफिल) आणि सॉर्बिट्रेट सारखी नायट्रेट औषधं दोन्हीही शरीरातील रक्तवाहिन्या सैल करून त्यांना रुंद करतात. त्यामुळे रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी होतो. मात्र ही दोन्ही औषधं एकत्र घेतल्यास त्यांचा परिणाम एकत्रितपणे वाढतो आणि रक्तदाब अचानक व धोकादायकरीत्या खाली जाऊ शकतो.

अशा वेळी मेंदू, हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. परिणामी चक्कर येणे, अशक्तपणा, बेशुद्ध पडणे, गोंधळ निर्माण होणे किंवा गंभीर गुंतागुंत तयार होऊ शकते. काही प्रसंगी ही स्थिती जीवघेणीही ठरू शकते.

याबाबत ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमधील कार्डिअक सायन्सेस विभागाचे प्रमुख डॉ. बी. सी कलमठ यांनी अधिक माहिती दिली.

ते सांगतात, "सिल्डेनाफिल घेतल्यानंतर साधारण 24 तासांचा कालावधी विशेष धोकादायक असतो, तर टॅडालाफिलसारख्या औषधांचा परिणाम 48 तास किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतो. त्यामुळे या कालावधीत नायट्रेट औषधं घेणे टाळणे आवश्यक आहे. रुग्णांनी डॉक्टरांना आपण घेत असलेल्या सर्व औषधांची माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे."

ते म्हणाले, "या औषधांबद्दल जाणीव वाढत असली तरी अनेक रुग्णांना या धोक्याची तीव्रता पूर्णपणे समजलेली नसते. विशेषतः भारतात काही पुरुष लाजेपोटी व्हायग्रा किंवा तत्सम औषधं घेतल्याचं डॉक्टरांना सांगत नाहीत. मात्र आपत्कालीन स्थितीत ही माहिती लपवल्यास चुकीचा उपचार होऊ शकतो आणि धोका वाढू शकतो.

छातीत दुखणाऱ्या रुग्णांमध्ये डॉक्टर प्रथम औषधांचा इतिहास विचारतात, रक्तदाब मोजतात, ECG आणि इतर तपासण्या करतात. हृदयरोग प्रत्येक व्यक्तीत वेगळा असतो. काही रुग्ण स्थिर अवस्थेत असतात, तर काहींमध्ये हृदयाची पंपिंग क्षमता खूप कमी असते. अशा रुग्णांना अचानक रक्तदाब घसरणे अधिक धोकादायक ठरू शकते."

म्हणूनच, इरेक्टाइल डिसफंक्शन संबंधित औषधं आणि नायट्रेट औषधं कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एकत्र घेऊ नयेत. छातीत दुखल्यास त्वरित आणि प्रामाणिकपणे सर्व माहिती डॉक्टरांना सांगणे हेच सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

छातीत दुखलं तर Aspirin की Sorbitrate? डॉक्टरांचा इशारा

फोटो स्रोत, Getty Images

छातीत होणाऱ्या वेदना ही काही प्रयोग करुन पाहायची गोष्ट नाही.

डॉ. निहार मेहता सांगतात याबद्दल अगदी स्पष्ट सल्ला देतात.

ते सांगतात, "छातीत वेदना झाल्या तर हॉस्पिटलमध्ये जाऊन ईसीजी काढा. अनावश्यक औषधं घेऊ नका. हार्ट ब्लॉकेजेस असतील आणि छातीत वेदना होत असतील तरच सॉर्बिट्रेट दिलं जाऊ शकतं. तसंच रक्तदाब तपासल्यावरच द्यावं अन्यथा रक्तदाब एकदम खाली येऊ शकतो."

छातीत दुखायला लागल्यावर रुग्णाबरोबर त्याच्या घरातले लोकही घाबरतात. अशावेळेस मग घरातली औषधाची कपाटं शोधली जातात, शेजाऱ्यांना विचारलं जातं तसंच फोनमध्ये सर्च करुन काही माहिती मिळतेय का ते पाहिलं जातं. पण हृदयासाठी एकेक क्षण महत्त्वाचा असतो.

डॉ. अमित सिंग सांगतात, जर तुम्हाला डॉक्टरांनी ही औषधं लिहून दिली असतील तसेच ती कधी वापरायची, कशी वापरायची हे सांगितलं असेल तरच ती वापरावीत. पण छातीत होणारी वेदना नवीच असेल, पूर्वी कधीही असा अनुभव आला नसेल तर गोळी घेऊन शांत बसू नका. सरळ हॉस्पिटल गाठा. हार्टअटॅकसाठी वेळ हे सर्वात महत्त्वाचं औषध आहे. जितक्या लवकर तुम्ही रुग्णालयात जाल तितक्या लवकर उपचार करणं शक्य होईल."

एकूणच, छातीत होणाऱ्या वेदना, धडधड किंवा अस्वस्थता ही कधीही दुर्लक्षित करून प्रयोग करण्याची गोष्ट नाही. ॲस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट या औषधांचा उपयोग नक्कीच महत्त्वाचा आहे, पण तो केवळ योग्य रुग्णांमध्ये आणि योग्य वेळीच. चुकीच्या वेळी घेतलेलं औषध जीव वाचवण्याऐवजी धोका वाढवू शकतं, तर वेळेवर घेतलेले योग्य उपचार जीवदान देऊ शकतात. त्यामुळे स्वतःहून निर्णय घेण्यापेक्षा लक्षणं ओळखा, वेळ दवडू नका आणि तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.कारण हृदयाच्या बाबतीत प्रत्येक मिनिट अनमोल असतो.

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)