'आधी 6 हजार रुपये बिल यायचं, आता थेट 70 हजार'; वाढलेल्या वीज बिलांना स्मार्ट मीटर कारणीभूत? - ग्राऊंड रिपोर्ट

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, नागपूर
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"लाडकी बहीण योजनेचे पैसे गोळा करतायेत की कोणत्या नवीन योजनांसाठी पैसे लोकांकडून गोळा करतायेत, हे समजत नाही. वीजबील भरलं नाही, तर वीज कापली जाईल असं सांगतात. एक लाख रुपये बील भरायचं की अंधारात राहायचं? एवढाच प्रश्न आमच्यासमोर ठेवलाय."
शैलेंद्र बनोदे भरमसाठ वीजबील आल्यामुळे बीबीसी मराठीशी बोलताना महावितरणवर रोष करत होते.
ते नागपुरातील भगवाननगर भागात राहतात. त्यांचे भाऊ धीरेंद्र बनोदे यांच्या घरी एप्रिल महिन्याचं वीजबील 70 हजार रुपये आलं, तर मे महिन्याचं 39 हजार रुपये वीजबील आलं. धीरेंद्र बनोदे हे किडनीच्या आजारानं ग्रासलेले आहेत. त्यामुळे ते अंथरुणावर असतात. आता माझा भाऊ दोन महिन्यांच एक लाख रुपयांच्या वर आलेलं वीजबील कसं भरेल? अशी चिंता शैलेंद्र बनोदे बोलून दाखवत होते.
त्यांच्या घरात दोन एसी, फ्रीज, टीव्ही इतका वीजेचा वापर आहे. डिसेंबर महिन्यात स्मार्ट मीटर लावल्यानंतर पहिले तीन महिने व्यवस्थित वीजबील आलं. पण, एप्रिल महिन्यात अचानक 70 हजार रुपये वीजबील आलं.
"आम्ही घरातले एसी पूर्णपणे बंद ठेवले. तरीही वीजबील 39 हजार रुपये आलं. याआधी गेल्या 2025 च्या एप्रिल महिन्यातही इतकाच विजेचा वापर होता. तेव्हा आम्हाला 6 हजार रुपये वीजबील आलं होतं. मग स्मार्ट मीटर लावल्यानंतर असं काय घडलं की एका महिन्याचं बील एकदम 70 हजार रुपये आलं?" असा सवाल बनोदे उपस्थित करत होते.
त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण मीटर व्यवस्थित असल्याचं त्यांना सांगितलं जातं. तसेच दोन्ही महिन्याच एक लाख सात हजार रुपये बील भरलं नाहीतर वीज कापणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. आता ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा विचार ते करत आहेत.
बनोदे सांगतात, घरातले सगळे उपकरणं बंद केले तरी स्मार्ट मीटरचं रीडींग सुरूच असतं. त्याची स्पीड प्रचंड आहे. मीटर थांबायचं नावच घेत नाही.

भरमसाठ वीज बिल आलेले एकटे बनोदे नाहीतर अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
स्मार्टमीटर लावल्यानंतर वीज बिल थेट दुप्पट झाल्याच्या तक्रारी घेऊन ग्राहक महावितरणच्या कार्यालयात गर्दी करत आहेत.
आम्ही नागपूरच्या तुकडोजी पुतळा चौकातल्या महावितरणच्या उपकेंद्राला भेट दिली. त्यावेळी तिथं अर्ध्या तासात 50 ग्राहक तक्रार करण्यासाठी येऊन गेले. सगळ्यांची तक्रार एकच होती की स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीजबील दुप्पट आलं.
इथेच तक्रार नोंदवण्यासाठी आलेले अविनाश शर्मा सांगतात, "आमच्या घरी स्मार्ट लावल्यानंतर काही दिवस नॉर्मल बिल आलं. पण, दोन महिन्यातच बील वाढायला लागलं. आमच्या घरात वीजेचा मर्यादित वापर असताना सुद्धा वीज बिल 8 हजार रुपये आलं. स्मार्ट मीटर लावायच्या आधी मला हजार रुपयांच्या आत बिल यायचं. यांच्या मीटरमध्येच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे इतकं जास्त बिल येत आहे."
तसेच ग्राहक रुपेश नबीरा यांनी तर हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.
ते म्हणतात, "आम्हाला महावितरणचे अधिकारी सांगतात फडणवीस साहेब विधानसभेत बोलले ते ऐकलं नाही का? तर मी म्हटलं फडणवीस साहेबांच्या वक्तव्यानं आम्ही वीज बिल भरू शकू का? पहिले इथं माणूस यायचा वीज कापायला. पण, आता तर तिथं बसल्या बसल्या वीज कापली जातेय. वीज बिल दुप्पट आलंय. आता मी एमएसईबीला पत्र देतो. त्यांनी माझं जुनं मीटर परत लावून दिलं नाहीतर थेट हायकोर्टात केस टाकणार आहे. सगळे कागदपत्रं सुद्धा तयार केले आहेत."
महावितरणचे कर्मचारी घरात कोणालाही न सांगता, परवानगी न घेता स्मार्ट मीटर लावत असल्याचा आरोपही ग्राहक करत आहेत.
रामेश्वरी इथं राहणारे राहुल बोरकर यांच्या घरी कोणीच नसताना जुनं मीटर बदलून स्मार्ट मीटर लावण्यात आलं. वीजबील जास्त आल्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यालयात तक्रार केली तर आमच्याकडे जीआर आहे. त्यामुळे न विचारता आम्ही मीटर बदललं असं अधिकारी त्यांना सांगतात.
सोलर ग्राहकांनाही हजारोंच्या घरात बिल
लोकांनी सोलर लावण्यासाठी सकारनं योजना आणली. त्यामधून सोलर बसवणाऱ्या ग्राहकांना सबसिडी देखील देण्यात आली. पण, आता ज्या ग्राहकांनी सोलर लावला त्यांना सुद्धा भरमसाठ वीज बिल येत असल्याच्या तक्रारी आहेत.
तुकडोजी पुतळा चौकातल्या महावितरणच्या केंद्रावर सोलर ग्राहकांनी गोंधळ घातला होता. सोलर लावल्यानंतर इतकं वीज बिल कसं काय येऊ शकतं? असा सवाल ते उपस्थित करत होते.
ग्राहक रमेश बन्सोड सांगतात, स्मार्टमीटरमुळे आम्हाला जास्त वीजबील येत आहे. सोलर त्याचं काम व्यवस्थित करतो. आधी दिडशे युनिट बील यायचं तर आता तिनेश युनिटचं बिल येत आहे. हे सगळं स्मार्ट मीटरमुळे होत आहे.
तर इथेच आलेले ग्राहक प्रणय ठवरे यांनी 2024 मध्ये नवीन घर बांधलं. घरातील सगळी वायरिंग नवीन आहे. कुठेही लिकेज नाही. तरी त्यांना वीजबील जास्त येत असल्याचं ते सांगतात.

"2025 मध्ये एप्रिल महिन्याचं 803 युनिट वापरलं होतं. पण, महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी जास्त उष्णता आहे तर चारशे युनिट वाढले असतील. पण, एप्रिल महिन्यात माझा वापर एकदम 1772 युनिट दाखवला आहे. मी सोलरमधून 1644 युनिट जनरेट केले ते देखील आम्हीच वापरले असं महावितरणचं म्हणणं आहे. आमचा काही व्यावसायिक वापर नाही. घरगुती वापरासाठी आम्ही दिवसाला 60 युनिट वापरले असं दाखवत आहे. हे कसं शक्य आहे? सोलर लावून फायदा काय? आम्हीच यांना वीज तयार करून द्यायची आणि आम्हीच वीजबील भरायचं का?" असा सवाल प्रणय ठवरे उपस्थित करत होते.
पण स्मार्ट मीटर खरंच फॉल्टी आहे का? जास्त वीज बिल येण्यामागे स्मार्ट मीटर कारणीभूत आहे का? याबद्दल आम्ही काही ऊर्जा क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांसोबत चर्चा केली.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांचा वापर किती होतो आहे? वीजेचा वापर कुठे कमी करायचा? याबद्दल अचूक माहिती मिळते, असं पुण्यातील प्रयास ऊर्जा गटाच्या श्वेता कुलकर्णी सांगतात.
त्या म्हणतात, "आधीच्या मीटर आणि आताच्या मीटरमध्ये फार काही फरक नाही. स्मार्ट मीटरमध्ये काय डेटा रेकॉर्ड होतो, मीटर कसा चालतो? तो डेटा ग्राहकांना कसा मिळेल याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचली नाही. स्मार्ट मीटरचा डेटा मोबाईल अप द्वारे तुम्हाला कळू शकतो. तुम्हाला व्यवस्थित दिसतं की दरदिवशी तुम्ही किती वीज वापरली, कधी वापरली? वीज वापरात वाढ होतेय का? ही सगळी माहिती मिळते. ग्राहक म्हणून तुम्ही वीज वापरता कसे बदल करू शकता? हे कळतं. या गोष्टी ग्राहकांपर्यंत पूर्णपणे पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे स्मार्ट मीटर लावताना वितरण कंपनीनं त्यांची ही जबाबदारी आहे की ग्राहकांना सगळी माहिती द्यावी की स्मार्ट मीटर कसा काम करतो?"
स्मार्ट मीटरमुळे बेरोजगारीचं संकट?
वीजबील वाढल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीमुळे स्मार्ट मीटरला विरोध होतो आहे. पण, याशिवाय या स्मार्टमीटरमुळे महावितरणच्या कर्मचारी बेरोजगार होतील असं तज्ज्ञ सांगतात.
स्मार्ट मीटरच्या विरोधात नागपुरात प्रिपेड स्मार्ट मीटर नागरी संघर्ष समिती तयार करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष मोहन शर्मा आहेत. शर्मा हे महावितरणचे माजी अधिकारी सुद्धा आहेत. त्यामुळे या स्मार्ट मीटरचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार आहे? याबद्दल ते बोलत होते.
जुन्या मीटरमध्ये वीजबील भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत असते. त्यानंतरही वीजबील भरलं नाहीतर आणखी 8 दिवसांची मुदत दिली जाते.

त्यानंतर वीज कापण्यासाठी घरी महावितरणचे कर्मचारी असतात. त्यामुळे ग्राहकांना आपली वीज कापली जाईल हे माहिती असतं. पण, स्मार्ट मीटर लागल्यानंतर वीज थेट कापली जाईल.
तसेच मीटर रीडींग सुद्धा थेट नोंदवलं जातं. त्यामुळे मीटर रीडींग घेणारा व्यक्ती घरी येणार नाही. वीज कापणारे, रीडींग घेणारे, वीजबील तयार करणारे, वीजबील वितरीत करणारे या सगळ्या लोकांवर स्मार्ट मीटरमुळे बेरोजगारीची वेळ येणार आहे, असं शर्मा सांगतात.
सरकारचं म्हणणं काय?
स्मार्ट मीटर विरोधात इतक्या तक्रारी का आहेत? लोकांना वीजबील अधिक का येत आहे?
याबद्दल आम्ही ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासोबत संपर्क साधला. त्या म्हणतात, "आपल्या राज्यात 01 कोटी 40 लाख स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे. फक्त तीन लाख साठ हजाराच्या आसपास तक्रारी आलेल्या आहेत. त्याठिकाणी आपण चेकमीटर लावून तक्रारींचं निराकरण सुद्धा केलं आहे. फक्त 211 ठिकाणी मीटर फॉल्टी असल्यानं बील जास्त आलं आहे. अडचण आहे तिथं तक्रार केल्यानंतर आमची टीम लगेच जाते. चेकमीटर लावून ग्राहकांचा गैरसमज दूर केला जातो.
"सोलरचा फायदा आहे की सकाळी 9 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीज वापरली तर त्याचं बील कमी येणार आहे. आपला दिवसभराचा वापर किती आहे हे आपल्याला स्मार्ट मीटरमुळे कळणार आहे. त्यामुळे हे आरोप करण्यात तथ्य नाही. कोणी परिचित लोक असतील तर सांगा आम्ही त्याठिकाणी जाऊन त्यांची अडचण सोडवू."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























