'शिक्षण हाच पुढचा ट्रेंड आणि 'फॅशन' बनला पाहिजे', विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिनेता सलमान खानचा पाठिंबा

सलमान खान

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

मागील काही आठवडंयापासून दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्येही आता आंदोलनं सुरू झाली आहेत. या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळत आहे.

दरम्यान, काल बुधवारी 22 जुलै रोजी दिल्लीमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला कला, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातूनही पाठिंबा मिळत आहे. अभिनेता सलमान खाननंही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

अभिनेता सलमान खान यानेही या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सलमान खान म्हणाला, "हे अतिशय शांततापूर्ण आंदोलन होते, ते हिंसक वळणावर गेले याबद्दल खूप दुःख वाटते. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना त्रास झाला, त्यांच्याबद्दल मनापासून सहानुभूती वाटते. पेपरफुटी हा खूप गंभीर मुद्दा आहे आणि आपल्या देशातील मुलं एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत व त्यांच्या पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून आणि जाणून आनंद होतोय.

त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. या मुलांची कठोर मेहनत, एक चांगला आणि सुशिक्षित भारत घडवण्यासाठी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्सुकता वाखाणण्याजोगी आहे."

विद्यार्ती

फोटो स्रोत, Getty Images

सलमान खान पुढे म्हणाला, "हे आंदोलन, हा विरोध ही योग्य दिशा आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेने केले आहे. अत्यंत धाडसी आणि शूर! शिक्षणासाठी प्रेरित असलेली ही पिढी नक्कीच भारताला अभिमान वाटेल असे काम करेल.

"हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्था यांच्यातील आहे, त्याचं राजकारण होता कामा नये. याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच मिळायला हवे. मला खात्री आहे की सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत होईल. मी एका चांगल्या व सकारात्मक निर्णयाची आशा आणि प्रार्थना करतो. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तुम्हा सर्वांवर देवाचा आशीर्वाद असो."

शिक्षण हा पुढचा 'ट्रेंड' आणि 'फॅशन' बनायला हवा आणि दरवर्षी तो अधिक ट्रेंडी व फॅशनेबल होत गेला पाहिजे. इतका की परदेशातील लोक भारतात शिकायला येतील आणि भारत एक शैक्षणिक केंद्र बनेल, अशी भावना त्याने व्यक्त केली.

दरम्यान, यापूर्वी सोनाक्षी सिन्हा, प्रीती झिंटा, सोनू सूद, दिलजीत दोसांझ, रितेश देशमुख, अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि जेनेलिया देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे.

'राजकीय पोळ्या भाजू नका', जे. पी नड्डांचं विरोधकांना आवाहन

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल 22 जुलैरोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका केली.

नड्डा म्हणाले, "तुम्हाला या मुद्द्यावर राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत, हे दुर्दैवी आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. अशा घटनांची मोठी यादी आहे, ज्या वेळी यूपीएची सरकारे सत्तेत होती आणि पेपरफुटी झाली होती."

ते पुढे म्हणाले, "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. या विषयावर सखोल चर्चा व्हावी. संसदेतच यावर गांभीर्याने चर्चा होऊ शकते. आपण ठोस धोरण घेऊन यायला हवे, कारण देशातील मुले हे देशाचे भविष्य आहेत. ही केवळ सरकारचीच नव्हे तर विरोधकांचीही जबाबदारी आहे."

जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, ते आंदोलकांशी चर्चेसाठी तयार आहेत. आंदोलक जेव्हा म्हणतील तेव्हा सरकार त्यांच्याशी चर्चा करेल. मात्र, आज कोणतीही चर्चा झालेली नाही.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा

फोटो स्रोत, JP NADDA

फोटो कॅप्शन, भाजप नेते आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा

दरम्यान, सोनम वांगचूक यांनी काल एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध करत मी अजूनही जिंवत असून उपोषणाच्या 25 व्या दिवशी आपलं 11 किलो वजन कमी झाल्याचं त्यांनी सांगितलंय.

जंतर-मंतरवरून हलवल्यानंतर सोनम वांगचूक पहिल्यांदाच समोर आलेले आहेत.

त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं की, "माझ्या बऱ्याच मांसपेशी कमकुवत होत आहेत. पण, मी ठीक आहे. काल मला गुरूग्राममधील एका खासगी दवाखान्यात आणण्यात आलंय."

सोनम वांगचूक

फोटो स्रोत, X/Sonam Wangchuk

ते म्हणाले की, "मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांची पाठ थोपटू इच्छितो ज्यांनी स्वत: लाठी झेलत इतक्या शांततेमध्ये आंदोलन पार पाडलं. इतकं उकसवून सुद्धा पलटून तुम्ही हल्ला केला नाहीत. आधीपासूनच दगडं आणून ठेवण्यात आली, तरीही तुम्ही शांत राहिलात, हे पाहून माझं मन भरून आलं. फारच क्रूरपणे हल्ले होत होते म्हणून मी माझं उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आताही अनेक राजकीय नेते माझ्याकडे उपोषण सोडण्याची विनंती करण्यासाठी आले होते. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधीही 65 खासदारांची स्वाक्षरी असलेलं पत्रही घेऊन आले होते.

मात्र, मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी पुन्हा अशा ताकदीचा प्रयोग करू नका. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत, हे आश्वासन मला तातडीनं मिळालं तरच मी आज उपोषण सोडेन. मात्र, जर असं आश्वासन मला मिळालं नाही, तर मी उपोषण सुरू ठेवेन," असंही ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.