त्या कर्मचाऱ्यांना झुरळ खाण्याची, मूत्र पिण्याची शिक्षा

फोटो स्रोत, Science Photo Library
ऑफिसमध्ये सेल्स टार्गेट पूर्ण करू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांना लघवी प्यायला लावणं, झुरळ खायला लावणं असा अघोरी प्रकार चीनमध्ये समोर आला आहे. चीनमधल्या स्थानिक मीडियानं ही बातमी दिली आहे.
मार्केटिंग कंपन्यांमध्ये सेल्स टार्गेट पूर्ण करण्याचा मोठा ताण कर्मचाऱ्यांवर असतो. टार्गेट पूर्ण न करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार कपात करणं, त्यांना कमी नफा देणं असे प्रकार होत असतात. ही एक प्रकारची शिक्षाच असते. मात्र चीनमधल्या एका कंपनीनं तर हद्दच केली आहे.
कर्मचाऱ्यांना पट्ट्याने बेदम मारहाण करत असतानाचे आणि बळजबरीने पिवळं द्रव्य पाजलं जात असतानाचे व्हीडिओ उघड झाल्यावर पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे.
या कर्मचाऱ्यांनी आपले टार्गेट्स पूर्ण केले नाही तर त्यांना झुरळही खायला सांगितली जातात, असे आरोप सोशल मीडियामधल्या पोस्टमध्ये करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, iStock
'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार हे हीन कृत्य करणाऱ्या तीन मॅनेजर्सना तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.
चीनची सोशल मीडिया साईट असलेल्या Weibo वर सध्या एक व्हीडिओ खूपच व्हायरल झाला आहे. यात माणसांच्या गराड्यात एक कर्मचारी मध्यभागी उभा आहे आणि त्याला पट्ट्याने बेदम मारहाण केली जाताना दिसते.
दुसऱ्या एका व्हिडियोमध्ये गाईझो शहरातल्या घर सजावट करणाऱ्या कंपनीतला कर्मचारी नाक दाबून प्लॅस्टिकच्या कपातून पिवळं द्रव्यं पिताना दिसतोय.

फोटो स्रोत, PEARVIDEO.COM
तुम्ही चांगलं काम केलं नाही तर तुम्हाला झुरळं खावी लागतील, अशी कथित धमकी असणाऱ्या मेसेजेसचा स्क्रिनशॉट्ससुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे मेसेज मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवल्याचं सांगितलं जातंय.
मीडियातल्या बातम्यांनुसार या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना बाथरूममधलं पाणी किंवा व्हिनेगर पाजणं किंवा बळजबरीने त्यांचं मुंडन करणं, अशा प्रकारच्या शिक्षाही केल्या जातात.
या कंपनीने गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारही दिला नसल्याचं कळतं. शिवाय या सर्व प्रकाराची वाच्यता कुठे केली तर पगारच मिळणार नाही, अशी भीती इथल्या कर्मचाऱ्यांना वाटतेय.

फोटो स्रोत, PEARVIDEO.COM
अखेर या कंपनीतल्या तीन मॅनेजर्सना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
चीनमधल्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी, त्यांचा अपमान करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विचित्र क्लृप्त्या करत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यातलाच हा प्रकार आहे.
यापूर्वी अशा अनेक घटना उघड झालेल्या आहेत. एका कंपनीच्या कार्यक्रमात प्रेरित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना एकमेकांना कानशीलात लावायला सांगण्यात आलं होतं.
एका कंपनीने काही कर्मचाऱ्यांना रस्त्यावर रांगायला सांगितलं तर काहींना शिक्षा म्हणून कचराकुंड्यांचं चुंबन घ्यायला सांगितल्याचेही प्रकार चीनमध्ये घडलेले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)























