पतीने 50 हजार रुपयात पत्नीला विकल्याचा आणि मित्रांनी बलात्कार केल्याचा आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फोटो स्रोत, Paresh Padhiyar/BBC
टीप: या बातमीतील काही तपशील अस्वस्थ करू शकतात.
"पालनपूरमध्ये (गुजरात) पतीने 50 हजार रुपयांसाठी आपल्या पत्नीची मित्रांना विक्री केली आणि खरेदी करणाऱ्या पतीच्या मित्रांनी या महिलेवर बलात्कार केला, " अशी माहिती पश्चिम पालनपूर पोलिसांनी 26 मे रोजी एका पत्रकार परिषदेत दिली.
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथील या प्रकरणात आरोपी पतीने 11 मे रोजी पश्चिम पालनपूर पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.
पोलीस तिचा शोध घेतच होते तोच अवघ्या 2 दिवसांत पतीने पालनपूर पूर्व पोलीस स्टेशनमध्येही पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
एकाच गोष्टीसाठी 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला आणि हे प्रकरण समोर आले.
पालनपूर पोलिसांचे काय म्हणणे आहे?

फोटो स्रोत, Paresh Padhiyar/BBC
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी पश्चिम पालनपूर पोलीस स्टेशनमध्ये एका पतीने त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर 13 मे रोजी त्याच व्यक्तीने पूर्व पालनपूर पोलीस स्टेशनमध्ये दुसरी तक्रार नोंदवली. त्यामध्येही त्याची पत्नी बेपत्ता असल्याचीच तक्रार होती.
पहिल्या तक्रारीच्या आधारे पालनपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतच होते. दरम्यान दुसरी तक्रार आल्याने पोलिसांना संशय आला.
त्यानंतर पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आणि महिलेचा शोध घेतला.
जेव्हा पोलिसांनी सर्व्हायवर महिलेची चौकशी केली, तेव्हा तिने सांगितले की, तिला दुसऱ्या कोणी नाही तर तिच्या स्वतःच्या पतीनेच विकले होते.
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीने काही लोकांना 50 हजार रुपयांमध्ये तिची विक्री केली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पतीने त्याच्या मित्रांनाच स्वतःच्या पत्नीचा 50 हजार रुपयात सौदा केला होता. इतकंच नाही तर तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोपही या महिलेने केला आहे.
'आरोपीने महिलेचे दागिनेही विकले'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला जेव्हा आरोपीच्या मित्रांच्या ताब्यात होती तेव्हा त्या मित्रांनी जबरदस्तीने तिचे दागिने काढून घेतले. त्यामध्ये तिच्या कानातील दागिण्यांचा समावेश होता. त्यांनी हे दागिने विकले.
पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या मित्रांवर पीडित महिलेला डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याचाही आरोप आहे.
पश्चिम पालनपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर. के. पटेल आणि त्यांच्या पथकाने मुख्य आरोपी असलेल्या पतीसह इतर आरोपींना अटक केली आहे.
मुख्य आरोपी आधीपासूनच सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
पालनपूर पोलिसांनी या केसचा छडा कसा लावला?

फोटो स्रोत, Paresh Padhiyar/BBC
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पालनपूरचे डीवायएसपी जिग्नेश गामीत यांनी मीडियाला सांगितले की, पालनपूर पश्चिम आणि पूर्व अशा दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता झाल्याच्या 2 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.
जिग्नेश गामीत यांनी सांगितले, "आम्हाला या गोष्टीचा संशय आला. त्यामुळे जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने आणि सखोल तपास केला."
डीवायएसपी जिग्नेश गामीत पुढे म्हणाले, "जेव्हा एकाच महिलेच्या बेपत्ता होण्याच्या 2 तक्रारी आल्या तेव्हा पोलिसांनी सर्वात आधी तक्रार करणाऱ्या पतीला शोधून त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी समजल्या आणि संपूर्ण प्रकरणाचा सुगावा लागला."

फोटो स्रोत, Paresh Padhiyar/BBC
पोलिसांनी पुढे तपास करून त्या महिलेला सुखरूप शोधून काढलं. पण जेव्हा पोलिसांनी तिच्याकडे या तक्रारीबाबत विचारपूस केली तेव्हा पोलिसांसमोर संपूर्ण घटनेचे तपशील आले.
जिग्नेश गामीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "तक्रार करणाऱ्या पतीनेच स्वतःच्या पत्नीला अवघ्या 50 हजार रुपयांना मित्रांना विकले होते."
"तक्रारदार पतीच्या मित्रांनी पीडित महिलेवर बलात्कारही केला होता. त्यानंतर तिच्या कानातील दागिनेही जबरदस्तीने काढून घेतले," अशी माहिती डीवायएसपी जिग्नेश गामीत यांनी दिली.
पश्चिम पालनपूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांकडून 7 आरोपींना अटक

फोटो स्रोत, Paresh Padhiyar/BBC
पालनपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याप्रकरणी एकूण 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आली आहे.
डीवायएसपी जिग्नेश गामीत यांनी सांगितले की, पोलिसांनी अटक केलेल्या 7 आरोपींना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी पती यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून पोलीस त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास करत आहेत.
(बीबीसी गुजरातीने याप्रकरणी आरोपींची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण हे वृत्त प्रकाशित करेपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. त्यांची बाजू समोर येईल तेव्हा या बातमीत अपडेट केली जाईल.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























