'गाण्यावर बंदी नाही, मग त्यावर नाचल्यानं गुन्हा का?', गडचिरोलीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हे; नेमकं प्रकरण काय?

सांस्कृतिक कार्यक्रम
फोटो कॅप्शन, 11 ते 13 एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि इतर महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुण्यातील शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात नक्षल कमांडर हिडमाच्या उदात्तीकरणाचे गाणे लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

या गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी पुण्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी गडचिरोलीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

या घटनेमुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

याप्रकरणी आलेल्या तक्रारी आणि आक्षेपांवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

तर गुन्हा दाखल झालेले विद्यार्थी निष्पाप असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे. हा प्रकार अनावधानाने घडल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, या प्रकरणी आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून, गाण्यावर बंदी नसताना केवळ विद्यार्थी त्यावर नाचले म्हणून गुन्हे दाखल करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

तसेच, प्रशासनाने गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

11 ते 13 एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि इतर महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुण्यातील शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या कार्यक्रमादरम्यान गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी विविध रिमिक्स गाण्यांवर नृत्य करून आपली आदिवासी संस्कृती सादर करण्याचा प्रयत्न केला.

पुण्यातील शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी येथे राहून शिक्षण घेणारे किरण गोमासे आणि श्रीनिवास कुमरी या दोन विद्यार्थ्यांनी 'मेरे जंगल की सिना' या गाण्यावर नृत्य सादर केले होते. हे गाणे जहाल नक्षलवादी हिडमा याच्याशी संबंधित असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी देशाच्या एकात्मतेला बाधा पोहोचवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नावे किरण नारायण गोमासे (वय 22 वर्षे) आणि श्रीनिवास हनुमंत कुमरी (वय 23 वर्षे) अशी आहेत. दोघेही बीबीएचे शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात 11 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) संघटनेशी संबंधित आणि पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) च्या बटालियन क्रमांक 1 चा कमांडर असलेल्या हिडमा मडावी याच्यावर आधारित गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले होते.

याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह काही लोकांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी पोलिसांकडे केली होती.

या प्रकारामुळे देशाच्या सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडतेला बाधा पोहोचेल, अशी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी कारवाई केली आहे.

तपास गुन्हे शाखेकडे; पोलिसांनी काय सांगितलं?

शासकीय वसतिगृहातील या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 197(1)(घ), 353(1) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "काही लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार गांभीर्य लक्षात घेत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरू आहे."

'गुन्हा दाखल झाल्यानं घाबरायला झालंय'

गुन्हा दाखल झालेला विद्यार्थी किरण गोमासे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाला की, "वसतिगृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सर्वजण आपल्या संस्कृतीसंदर्भात वेशभूषा आणि नृत्य सादरीकरण करणार होते. आम्ही देखील गडचिरोली भागातील आदिवासी असल्यामुळे तेथील संस्कृती दाखवण्याच्या दृष्टीने वेशभूषा आणि नृत्य करण्याचं ठरवलं होतं. त्या दृष्टीने यूट्यूबवर आम्ही काही गाणी शोधत होतो. त्यात आम्हाला आदिवासी संस्कृतीची दोन गाणी दिसली. मात्र, वेळ कमी असल्यामुळे आम्ही रिमिक्स गाणी शोधत असताना आम्ही निवडलेली दोन गाणी आणि हे गाणं यूट्यूबवर सुचवलं गेलं. ज्यामध्ये फक्त रिमिक्स गाण्याचा उल्लेख होता, कुठल्याही नक्षलवादी किंवा कोणाचाही फोटो नव्हता. फोटो, माहिती किंवा नाव आधीच आम्हाला माहित असतं तर ते घेणं आम्ही टाळलं असतं. फक्त डीजे आणि रिमिक्स असल्यामुळे हे गाणं निवडून आम्ही नऊ विद्यार्थ्यांनी यावर नृत्य केलं.

"हिडमाबद्दल आम्हाला यापूर्वी कधीच माहिती नव्हती. आम्ही दोन विद्यार्थ्यांनी रिमिक्स गाणं निवडलं, त्यामुळे गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी हिडमा बद्दल माहिती दिल्यानंतर आम्हाला याविषयी कळलं. आम्ही आमच्या या गाण्यांमध्ये सगळ्या महापुरुषांचा उल्लेख केला, मात्र हे चुकून झालं आहे."

किरण पुढे म्हणाला की, "गुन्हा दाखल झाल्यानंतर घाबरायला झालं आहे. गावाहून कुटुंबाचे फोन येत आहेत. आई फोन करून रडत आहे. कुटुंबाचं म्हणणं आहे, तू तिथे जाऊन काय केलं हे. पण मी हे मुद्दाम केलेलं नाही, अनावधानाने सगळं घडलं आहे. भविष्याची आता भीती वाटू लागली आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे नोकरीवर अडचण येऊ शकते. या प्रकरणामुळे शिक्षण, काम आणि कुटुंब या सगळ्यावर परिणाम होणार आहे."

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काय म्हणणं आहे?

विश्रांतवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय वसतिगृहात नक्षल कमांडर हिडमा यांच्या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगरच्या वतीने 17 एप्रिल रोजी स्वारगेट चौक येथे हिडमा यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

यावेळी वसतिगृहातील विद्यार्थी, गृहपाल आणि अधिकारी यांच्यावर देशविरोधी कारवाईस पाठबळ दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पुणे महानगरमंत्री राधेय बाहेगव्हाणकर, महानगर सहमंत्री आलोक पवार आणि विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर
फोटो कॅप्शन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले की, "या प्रकरणात विद्यार्थी निष्पाप आहेत. मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना अडकवले जात आहे. मात्र, हे कृत्य अनावधानाने घडले असे म्हणणे योग्य नाही. कारण सर्वांना काय चांगले आणि काय वाईट हे समजते. विद्यार्थ्यांचा यात दोष नाही, पण संबंधित वसतिगृह आणि समाज कल्याण विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत, मात्र त्यांच्या मागे हे कोणी घडवत आहे का हे तपासायला हवे."

'गाण्यावर बंदी नाही, मग डान्स गुन्हा कसा?'

केवळ आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली म्हणून या घटनेचा आदिवासी संघटना आणि आझाद समाज पक्ष त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आझाद समाज पक्षाकडून गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, गुन्हे मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच, गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

आझाद समाज पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड
फोटो कॅप्शन, आझाद समाज पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड

आझाद समाज पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी या कारवाईवर टीका केली.

बीबीसी मराठीशी बोलताना बन्सोड म्हणाले की, "काही संघटनांच्या दबावाखाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. आम्ही या कारवाईचा विरोध करतो. अशाप्रकारे बेकायदेशीर गुन्हा नोंद करणे चुकीचे आहे. गाणे युट्यूबवर उपलब्ध आहे. जर ते आक्षेपार्ह असेल, तर ते तयार करणारे, गाणारे किंवा प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. गाण्यावर बंदी नसताना त्यावर नृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार ठरवणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे."

विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली

'विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कायदेशीर प्रक्रिया पार पाडू'

सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

फोटो स्रोत, Facebook/VishalLondhe

फोटो कॅप्शन, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

या प्रकरणासंदर्भात समाज कल्याण विभागाचे पुणे येथील सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले की, "विद्यार्थ्यांकडून हे अनावधानाने झाले आहे. विद्यार्थ्यांना हिडमा कोण आहे हे माहीत नव्हते. 13 तारखेला आक्षेप घेतल्यानंतर या व्यक्तीविषयी माहिती मिळाली. आमचे विद्यार्थी निष्पाप आहेत आणि उमेदीच्या वयात चांगले काम करत आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि शिक्षण लक्षात घेता, त्यांच्याकडून ही चूक झाली असेल तर त्यांना माफ करायला हवे."

"विद्यार्थ्यांनी यूट्यूबवरून गाणे शोधून त्यावर कार्यक्रमात नृत्य केले. यात त्यांना दोषी ठरवायचे की नाही, हे प्रशासनाने ठरवावे. मात्र विद्यार्थ्यांकडून हे अनावधानाने झाले आहे, त्यामुळे त्यांना माफ करायला हवे. त्यामागे लोकनृत्य सादर करण्याव्यतिरिक्त कोणताही वेगळा उद्देश नव्हता. पोलीस त्यांची नियमानुसार प्रक्रिया पार पाडतील. आम्ही आमच्या विभागामार्फत आणि त्यांच्या पालकांमार्फत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडू."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)