'कर्ता-धर्ता गेला, मला कोण सांभाळणार?'; पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणानंतर कुटुंबांसमोर जगण्याची भ्रांत

"आज माझे मालक गेले. आमचा कर्ता-धर्ता माणूस गेलाय. रोज मजुरी करायचा. दहा रुपये कमावयचा. त्यातल्या पाच रूपयाची दारू प्यायचा. पण उरलेल्या पैशात घर चालवायचा. आता मला कोण सांभाळणार? आता तरी सरकारने दारूचे अड्डे बंद करावं की."
हडपसरमधील पांढरेमळा परिसरात राहणाऱ्या इंदूबाई डाडर डोळे पुसत सांगत होत्या.
विषारी दारू पिऊन त्यांचे पती अरुण डाडर यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरात आता दुःखासोबतच उद्याच्या जगण्याची भ्रांतही आहे.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील 10 जणांचा, तर हडपसरमधील पांढरेमळा भागातील 4 जणांचा समावेश आहे.
मृतांचे कुटुंबीय काय म्हणाले?
बीबीसी मराठीच्या टीमने हडपसरमधील मृत अरुण डाडर यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या पत्नी इंदूबाई डाडर यांनी आता जगायचं कसं हा प्रश्न पडल्याचं सांगितलं.
ही घटना घडली तेव्हा इंदूबाई घरी नव्हत्या त्या बाहेरगावी होत्या. फोनवरच नवऱ्याला होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना माहिती मिळाली.
"मला समजल्यानंतर मी दुपारी इकडे यायला निघाले. रात्री 10 वाजता पोहोचले, पण नंतर मला त्यांच्याशी बोलताच आलं नाही," असं त्या म्हणाल्या.
त्यांची मुलगी ललिता जगताप म्हणाल्या, "माझे वडील रोज कामाला जातानाही आणि परत येतानाही दारू प्यायचे. त्यांना दारू पिल्याशिवाय कुठलंही काम होत नव्हतं. पण ते आम्हाला असं अचानक सोडून जातील, असं कधीच वाटलं नव्हतं."
याच्या आधीही काहीवेळा अशा प्रकारचा त्रास त्यांना झाला होता, असंही त्यांची मुलगी ललिता जगताप यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांत सारख्या अशा घटना घडल्याचं समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या.

पांढरेमळा परिसरात फिरताना रस्त्याच्या कडेला पडलेली गावठी दारूची रिकामी पाकिटे सहज दिसतात.
पोलिसांच्या तपासात, ही दारू उरळी कांचन परिसरात तयार केली जात होती आणि तिची विक्री पिंपरी चिंचवड आणि हडपसरमध्ये होत होती, असं समोर आलं आहे.
त्यावर अनेकदा कारवाई केल्याचा दावा पोलीस करतात. तर नागरिक या परिसरात अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करतात.
गावठी दारूला कच्ची दारू असंही म्हणतात.
तिचं मिश्रण करणं अतिशय सोपं असतं. पण या कच्च्या दारूमुळं होणारी नशा वाढवण्याच्या नादात ती विषारी बनते.
सामान्यत: गूळ आणि उसाच्या मळीपासून देशी दारू तयार केली जाते.
त्यात युरिया आणि बेलाची पानं टाकली जातात. त्यामुळे त्याची नशा आणखी जास्त होते. दारू जास्तीत जास्त चढावी, यासाठी त्यात ऑक्सिटॉसिन टाकलं जातं, ते मृत्यूला निमंत्रण देतं.

या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनानं तातडीने कारवाई केली. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून 8 संशयितांना ताब्यात घेतलं. तर काही पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं आहे.
या प्रकरणात आकाश दीपक जाधव (30) हा मुख्य आरोपी असून त्याने विषारी द्रव्य मिसळून बेकायदेशीर दारू तयार करून विक्री केल्याचा आरोप आहे.
त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचं स्पष्ट केलंय.
याबद्दल अधिक माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त म्हणाले, "आम्ही या प्रकरणात सदोष मनुष्यवध, विषबाधा आणि बेकायदेशीर दारू या कलमांखाली गुन्हा दाखल करत आहोत. तपास युद्धपातळीवर सुरू आहे. मेडिकल रिपोर्ट्स आल्यानंतर नेमकं काय घडलं हे स्पष्ट होईल."
विषारी दारू की कार्डियाक अरेस्ट?
पोलिसांच्या तपासानुसार, 27 आणि 28 मे दरम्यान गावठी दारू प्यायल्यानंतर काही जणांना उलट्या, चक्कर आणि इतर त्रास सुरू झाले.
उपचारादरम्यान पुणे शहरात राहुल क्षीरसागर, अरुण डाडर, दत्ता सूर्यवंशी आणि अशोक चव्हाण यांचा मृत्यू झाला.
तर पिंपरी चिंचवडमधील मृतांमध्ये पांडुरंग फुगे, अकबर पठाण, राजेश राजपूत, आनंद देसाई, आनंद निकाळजे, भिमण्णा नागराल, अक्षय अवसरमल, सचिन नेटके, सुरप्पा बांगरी, राजू राठोड या दहा जणांचा समावेश आहे.
दरम्यान, या मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील स्थांनिकांकडून म्हटलं जात आहे.
त्याचं कारण म्हणजे, हे मृत्यूसत्र 26 मे रोजी पासून सुरू झालं आहे, तसंच अजून काहीजण उपचार घेत असल्याचंही काही नागरिक सांगतात.
असंच एक उदाहरण मृत यशवंत पवार यांचं आहे. पण विषारू दारुमुळं मृत्यू झालेल्यांची जी अधिकृत यादी पोलिसांनी दिली आहे, त्यात त्यांचं नाव नाही.

डॉक्टरांनी पवार यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याचं नमूद केलं आहे.
पण त्यांची बहीण कल्पना जाधव यांना त्याबद्दल शंका आहे.
"26 तारखेला सकाळी अंघोळ करायच्या आधीच माझ्या भावाने दारू प्यायला होती. त्यानंतर तो अंघोळीला बसला पण तिथेच त्याला चक्कर येत होती. म्हणून मी त्याला अंघोळ घातली. घरात आल्यावर तो थुंकू लागला आणि लगेच उलट्या झाल्या. नंतर तोंडाला फेस आला. तो बडबडू लागला. डोळे पांढरे झाले आणि दुपारी एक वाजता मृत्यू झाला," असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं.
परिसरात विषारी दारूमुळं इतर मृत्यूंची माहिती समोर आल्यानंतर कल्पना जाधव यांनाही आपल्या भावाचा मृत्यू विषारी दारूमुळेच झाला असावा, असं वाटत आहे.
असाच प्रकार पिंपरी चिंचवडमध्येही घडल्याचं पीडिताचे नातेवाईक सांगत आहेत.
'रिपोर्टनंतर चित्र स्पष्ट होणार'
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना मृत बाबा शेख यांचे चुलत मावस भाऊ अख्तर पठाण यांनी म्हटंल की, "माझा भाऊ नेहमी दारू पित होता. आम्हाला वाटलं की त्याने नेहमीपेक्षा जास्त दारू पिल्यामुळे त्याला त्रास होतोय. त्यामुळे आम्ही त्याला 26 मे रोजी दवाखान्यात घेऊन गेलो.
तिथे डॉक्टरांनी सांगितलं की, त्याने खूप जास्त दारू प्यायली होती. त्यानंतर त्याच्या पोटातील दारू उलटीद्वारे बाहेर पडली. तेव्हा त्याच्या तोंडातून फेस येत होता. आम्हाला वाटलं की तो बरा होईल. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचं कळलं."
दुसऱ्या दिवशी बाबा शेख यांचा मित्र अकबर पठाण यालाही तसाच त्रास झाला आणि त्याचाही यात मृत्यू झाला. ते सोबतच दारू प्यायचे, असं अख्तर पठाण यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मृत यादीत अकबर पठाण यांचं नाव आहे. पण त्यांचाच मित्र बाबा शेख यांचं नाव दिसत नाही.
दरम्यान, यापैकी काही पीडितांचे शवविच्छेदन रिपोर्ट अजून आलेले नाहीत.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत आणि पीडितांचा व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर या मृत्यूंचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
'संपूर्ण कुटुंबावर संकट'
या दुर्घटनेत मृत्यू झालेली बहुतांश माणसं रोजंदारीवर काम करणारी होती. अनेक घरांमध्ये कमावणारा एकमेव पुरुष गेला आहे. त्यामुळं दुःखासोबतच आर्थिक संकटही उभं राहिलं आहे.
पांढरे मळ्यातील इंदूबाई डाडर यांना दुखापत झाल्यामुळं त्यांना काही महिन्यांपासून काम करता येत नाही.
त्या सांगतात, "माझा हात मोडला आहे. मी कामाला जाऊ शकत नाही. ते जे काही कमवून आणायचे, त्यावरच आमचं घर चालायचं. आता पुढे काय करायचं, हेच कळत नाही. सरकारने आधी ही दारूबंदी करावी आणि मला जगण्यासाठी मदत करावी"
त्या पुढे म्हणाल्या, "ते रोज दारू प्यायचे. कारण त्याशिवाय त्यांना काम करणं शक्य नव्हतं. घरी येताना बाजारहाट आणायचे. मीही आधी बिगारी कामावर जायची. पण आता हातपाय मोडल्याने मी घरीच बसून होती. दारूच्या पायी आमचा माणूस गेला. पण आता मला यापुढे भोगायची वेळ आलीय."
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू
स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरात पिशव्यांमधून गावठी दारू विकली जाते. विक्रेते कोण आहेत, याची माहिती अनेकांना आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर त्यांची नावं सांगायला लोक घाबरतात.
सध्या पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी केलेल्या दारूविक्रीच्या आरोपाबाबत बोलताना, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "या प्रकरणातील मृत्यू झालेले लोक राहत असलेल्या परिसरातील तसेच ज्याठिकाणी दारूविक्रीचे आरोप आहे तिथल्या सीसीटीव्हीची बारकाईने तपासणी केली जात आहे. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर यात जे कोणी सहभागी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल."
अमितेश कुमार यांनी शुक्रवारीच या प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबनही केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























