'महाराजांचं नाव घेऊन दंगली नाही, तर...', 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला'चे प्रयोग पुन्हा का सुरू झाले?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"महाराजांचं नाव घेऊन दंगली नाही, तर रक्तदान ठेवण्याची प्रेरणा या नाटकानं मिळालीय, याच्यापेक्षा आमच्यासाठी अजून काय मोठं आहे?"

राजकुमार तांगडे शेताच्या बांधावर बसून सांगत होते.

'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाचे प्रयोग सप्टेंबर 2025 पासून पुन्हा सुरू करण्यात आलेत. शेतकरी राजकुमार तांगडे हे या नाटकाचे लेखक आहेत.

राजकुमार तांगडे हे जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ गावचे रहिवासी.

आम्ही त्यांच्याकडे पोहचलो तेव्हा त्यांच्या घरासमोरच नाटकात सहभागी मंडळींचा सराव सुरू होता. दिग्दर्शक संभाजी तांगडे इतर पात्रांना काही सूचना करत होते.

या ठिकाणाहूनच 2010 च्या सुमारास 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला'च्या जन्माचं बीज पेरलं गेलं.

आतापर्यंतचे या नाटकाचे 933 प्रयोग झालेत. बीडच्या छोट्या गावापासून ते दिल्ली, बंगळुरू, कर्नाटकमध्ये प्रयोग पार पडलेत.

"आता प्रेक्षकच या नाटकाचे हजारो प्रयोग करतील," अशी प्रतिक्रिया दिवंगत अभिनेते श्रीराम लागू यांनी या नाटकाविषयी दिली होती.

ती आजही राजकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आहे.

पुन्हा प्रयोग कशासाठी?

'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाची मूळ संकल्पना लोकशाहीर संभाजी भगत यांची. त्यांनीच या नाटकातील गाणी आणि पोवाडे लिहिले.

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक करण्याची कल्पना कशी पुढे आली? या प्रश्नावर बोलताना संभाजी भगत सांगतात,

"छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक बाबतीतलं धोरण हे कुठल्याही एका धर्माचं नाहीये. सर्व धर्मांना समसमान पाहणारे महाराज होते. ज्यावेळेस त्यांचं प्रतीक कुठल्यातरी एका धर्मासाठी वापरलं जातं, तेव्हा ते मला हिंसक वाटलं. शिवाजी महाराजारांबद्दल हा न्याय होत नाहीये, त्यांच्या प्रतीकांबद्दल हा अन्याय होतोय, असं मला जाणवत होतं."

हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्यामागचं कारण सांगताना संभाजी भगत म्हणतात,

"आम्हाला वाटतं की त्या काळामध्ये जेवढी आवश्यकता होती, त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक आज शिवाजी महाराजांचे विचार सांगण्याची आवश्यकता आहे. कारण आताचं जे वातावरण आहे, त्यात दुही माजवण्याचा कार्यक्रम चालू आहे. एक काहीतरी धर्म राष्ट्राच्या दिशेनं हा देश घेऊन जाण्याचं काम करताहेत. ते या युगासाठी हानिकारक आहे.

"पण शिवाजी महाराजांचा त्याच्यामध्ये वापर होतोय. इतिहासाचं जे डिस्टॉर्शन होतंय, ते भयानक आहे. म्हणून त्याचे प्रयोग आज आम्हाला लावावेसे वाटले."

देशभरात 933 प्रयोग

20 मे 2012 रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग माटुंगा इथं पार पडला. आजपर्यंत नाटकाचे संपूर्ण देशभरात 933 प्रयोग पार पडलेत. नाटकाच्या काही प्रयोगांचं आयोजन कॉलेजांमध्ये, तर काही प्रयोगांचं आयोजन गावखेड्यांतील जत्रांमध्येही करण्यात आलं.

राजकुमार तांगडे हे या नाटकाचे लेखक.

या नाटकाच्या जन्माविषयी बोलताना राजकुमार सांगतात, "आतापर्यंत शिवाजी महाराजांवर जी नाटकं झाली ती महाराजांच्या चरित्रावरची झाली. म्हणजे महाराजांच्या आयुष्यावरचा एखादा प्रसंग आणि त्याच्यावर लिहिलेली ती नाटकं, अशी ती बऱ्यापैकी होती. पण आपण जे करणार आहोत ते पहिलं असं नाटक असेल जे चरित्रांवर नाही तर विचारांवर आधारित नाटक असेल. महाराजांचे विचार कसे होते, ते आम्हाला या नाटकाच्या माध्यमातून सांगायचं होतं."

ग्रामीण भागात राहत असल्यामुळे प्रत्येक वेळी आपण समाजाला सोडून जगू शकत नाही. त्याच्यामुळे नाटकात आलेले कॅरेक्टर्स माझ्या अवतीभवतीचीच आहेत, असं राजकुमार पुढे सांगतात.

नाटकाच्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नावापासूनच त्याला विरोध करण्यात आला. तो आजतागायतही काही प्रमाणात कायम आहे. संभाजी तांगडे आणि कैलास वाघमारे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.

संभाजी तांगडे सांगतात, "ज्यांनी ज्यांनी खरं सांगण्याचा प्रयत्न केला, त्या त्या काळामधी त्यांना विरोध झालेलाच आहे. त्याच्यामुळे हे नाटक त्याच महापुरुषांच्या विचारांवर चालणारं नाटक आहे. त्यामुळे याला छोटासा विरोध होतोच.

"अजूनही शिवाजी अंडरग्राऊंडचा कुठे प्रयोग असला की या नाटकाच्या विरोधात काही संघटना अर्ज देत राहतात. यांना शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगतात वगैरे म्हणतात. पण शिवाजी महाराजांचं मोठेपण आम्ही सांगतोय, हे त्यांना अजूनही कळलेलं नाही."

राजकुमार सांगतात, "शिवाजी महाराज हे काही कुठल्या एका जातीचे नाहीत. ते कुठल्या एका धर्माचे नाही. एका गटाचे किंवा एका पक्षाचे नाहीत. शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. हेच नाटकाच्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या टायटलमधून आपल्याला लक्षात येतं."

दरम्यानच्या काळात या नाटकाचे प्रयोग सातत्यानं चालू होते. पण त्यांची संख्या कमी होती. मुंबई वगळता इतर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग होत राहिले.

त्यामुळे मग मुंबईत व्यावसायिक नाटकाच्या थिएटरमध्ये प्रयोग झाला म्हणजेच रंगभूमी आहे का? असा सवाल संभाजी तांगडे उपस्थित करतात.

खरे शेतकरीच साकारताहेत पात्र

आता नाटकातील पात्रांच्या पेहरावात बदल करण्यात आलीय. सेट्सची रचना थोडी बदलण्यात आलीय. लाईट्सचं नियोजनही बदलल्याचं दिग्दर्शक सांगतात.

नाटकात ज्यांनी ज्यांनी पात्रं साकारलीय, त्यातील बुहतेक सगळेच जण गावाकडे शेती करतात. यापैकी संघराज वाघमारे आणि किशोर उढाण. ज्यांनी नाटकात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका साकारलीय.

जालन्यातील वाहेगावचे संघराज वाघमारे म्हणतात, "या नाटकाला जात असताना शेतीच्या कामाचं व्यवस्थित नियोजन लावून प्रयोग करायचे आणि तिकडून आले की परत शेतीची कामं करायचे."

संघराज वाघमारे यांच्या घराचं कच्च बांधकाम झालेलं दिसतं. घरावर 'जय भीम' असा झेंडा लावलेला दिसून येतो.

तर, बानेगावचे किशोर उढाण सांगतात, "शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही नुकसान होता कामा नये, असं शिवाजी महाराज सांगायचे. मी एक शेतकरी आहे. आपलं मूळ काम पेरणी करणं हेच आहे, पण त्याचबरोबर आपण शिवाजी महाराजांच्या विचारांची पेरणी केली पाहिजे, असं मला यातून वाटतं."

नाटकाच्या सुरुवातीच्या काळात यांतील पात्रांच्या आडनावांवरुनही टीका सहन करावी लागल्याचं कलाकार सांगतात. हे 'त्यांचंच' नाटक, अशी टिप्पणीही कलाकारांना ऐकायला मिळाली.

"यात मूळ अठरापगड जातीची माणसं आलेली आहेत. माळी, वंजारी, मातंग, बौद्ध, मराठा, ब्राह्मण अशा अठरापगड जातीची मंडळी याच्यामध्ये आहे. आमच्यासाठी जात हा मुद्दा नाहीये. आम्ही एक कुटुंब आहोत. रंगमळा हे आमचं कुटुंब आहे."

रंगमळा हा राजकुमार आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या इतर स्थानिक कलाकारांचा एक समूह आहे.

'नाटकातील विचार महत्त्वाचा'

13 एप्रिल 2026 रोजी 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाचा एक प्रयोग छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. या प्रयोगाला लोकांचा हाऊसफुल असा प्रतिसाद मिळाला. खुर्च्यांवर बसून याशिवाय जिथं जागा उपलब्ध आहे तिथं बसून लोक या नाटकाचा आनंद घेत होते.

या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात अशाकाही लोकांनी पात्र साकारालंय ज्यांनी व्यवस्थेविरोधात जाऊन स्वत:ची वेगळी वाट निर्माण केली किंवा ते वाट निवडण्याचं धैर्य दाखवलं. यातील एक पात्र आहे अक्का या नावाचं. जे डॉ. अश्विनी भालेकर यांनी साकारलंय.

डॉ. अश्विनी भालेकर सांगतात, "मला स्वातंत्र्यांची जास्त ओढ होती की, आपल्याला बाहेर पडायला मिळेल, म्हणून मग मी इन्व्हॉल्व झाले आणि मग मला याची आवड लागली.

"माझ्या वडिलाला वाळीत टाकण्यापर्यंतच्या गोष्टी झालेल्या आहेत. माझ्या नातेवाईकांनीच बोलले की, तमाशा-बिमाशा किती दिवस."

अश्विनी भालेकर यांनी या नाटकाच्या आजपर्यंतच्या 930 प्रयोगांमध्ये भूमिका साकारल्याचं सांगितलं.

शिवाजी महाराजांवरील नाटकात काम करायला मिळतंय, हीच अभिमानाची बाब असल्याचं यात पात्र साकारणारे अशोक देवकर सांगतात. ते शेतीसोबत शिलाई मशीन चालवतात.

नाटकात 'यमाजी'ची भूमिका साकारणाऱ्या प्रवीणकुमार डाळिंबकर यांना तर अपघातानंतर चाहत्यांनी पैशांचीही मदत केली.

प्रवीणकुमार डाळिंबकर सांगतात, "नाटक तुम्हाला पैसा देतं, नाव देतं, पण ही माणसं देत नाही. माझ्या आयुष्यातला अपघातानंतरचा हा नवीन जन्म आहे. आमच्याकडे ना हत्तीघोडे आहेत, ना आमच्याकडे जरीचे कपडे आहेत. अजिबात नाही. आमचा विचारच महत्त्वाचा आहे."

'शिवाजी महाराजांचा वापर द्वेषासाठी नको'

शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला, हे गुरुजी वर्गात शिकवतात, तेव्हा इतर मुलं माझ्याकडे बघतात, असं 'पाशा' नावाचं पात्र जेव्हा म्हणतं, तेव्हा सगळे प्रेक्षक स्तब्ध होऊन ऐकत असतात.

'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक शिवाजी महाराजांच्या शेती, महिला, धर्म, पर्यावरण अशा वेगवेगळ्या धोरणांवर सोप्या भाषेत प्रकाश टाकतं.

शिवाजी महाराज सर्वसामान्य समाजाची खूप मोठी गरज असून महाराजांचा वापर स्वार्थासाठी, द्वेष पसरवण्यासाठी करू नका, असं 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक ठणकावून सांगतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)