आईप्रमाणेच वडिलांच्या शरीरातही बदल होतात का? संशोधनाने शास्त्रज्ञही चकित का झाले?

मुलीशी खेळताना वडील

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दिएगो आर्गुएदास ऑर्टिज
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

बाळ जन्माला येण्यापूर्वी पुरुषांच्या शरीरातही मोठे हार्मोनल बदल होत असतात, ज्याचा त्यांच्या वागणुकीवर आणि बाळाच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो.

माझ्या मुलाच्या जन्मापूर्वीचे काही महिने आम्ही जय्यत तयारीत घालवले. मी आणि माझ्या जोडीदाराने 'अ‍ॅक्टिव्ह बर्थ' कार्यशाळा, स्तनपान मार्गदर्शन सत्र आणि रुग्णालयाचा प्रसूतीपूर्व कोर्स पूर्ण केला.

आम्ही गर्भधारणा आणि बाळांशी संबंधित पुस्तकांचा ढीग वाचून काढला. तसंच, अनेक वेबसाईट्सवर माहिती शोधली. आमचे माहितीचे नोटपॅड्स बघता बघता भरून गेले होते.

त्यावेळच्या माझ्या नोट्समध्ये स्त्रीचे शरीर बाळंतपण आणि मातृत्वासाठी कशा प्रकारे तयार होते, हार्मोन्समध्ये होणारे चढ-उतार, अवयवांची होणारी हालचाल आणि मेंदूला मिळणारा नवा आकार याचे सविस्तर तपशील होते.

मात्र, माझे शरीर आणि मेंदूही बाबा होण्यासाठी अशाच प्रकारे तयार होत आहेत, हे मला कोणीच सांगितले नव्हते. माझा मुलगा 1 वर्षाचा झाला, तेव्हा मला पहिल्यांदा ही संकल्पना 'फादर टाइम' (Father Time) या पुस्तकात वाचायला मिळाली.

प्राइमेटोलॉजिस्ट सारा ब्लाफर हर्डी यांनी या पुस्तकात असा युक्तिवाद केला आहे की, पुरुषांमध्येही ते सर्व आवश्यक जैविक बदल होतात. म्हणजे, ते सुद्धा आईइतकीच मुलाची काळजी घेऊ शकतात आणि त्यांच्यावर प्रेम करू शकतात. आईप्रमाणेच मुलाचे रक्षण करण्याची नैसर्गिक ओढ वडिलांमध्येही असते.

हे वाचून माझी उत्सुकता खरोखरच वाढली. मुलांच्या संगोपनात वडिलांचा सहभाग असावा, हा विचार मला नेहमीच योग्य वाटतो. पण मला वाटलं होतं की हा केवळ आमच्या पिढीने बदलत्या काळानुसार स्वीकारलेला एक आधुनिक विचार आहे.

हर्डी यांच्या पुस्तकातून मात्र एक वेगळीच आणि महत्त्वाची गोष्ट समजली की, हे सर्व आपल्या शरीराच्या नैसर्गिक रचनेतच दडलेलं आहे. ही माया, ही ओढ आपल्यामध्ये आधीपासूनच असते फक्त बाळ समोर आल्यावर ती क्षमता जागी होते.

हर्डी आणि इतर तज्ज्ञांच्या मुलाखती घेतल्यावर तसेच विविध अभ्यासांचा सखोल विचार केल्यावर मी एका साध्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो. मातृत्व ज्या प्रकारे स्त्रियांमध्ये बदल घडवून आणते अगदी त्याच पद्धतीने पितृत्व पुरुषांना बदलून टाकते.

वडील आपल्या बाळाच्या संगोपनात जितके जास्त गुंतलेले असतात तितकेच त्यांच्या स्वभावात आणि शरीरात हे बदल अधिक खोलवर होत जातात.

आपल्या हार्मोन्स आणि मज्जासंस्थेत होणारे हे बदल सिद्ध करतात की, वडिलांनी मुलांवर प्रेम करणे किंवा त्यांना सांभाळणे ही काही आजच्या काळातील नवी फॅशन नाही तर ते आपल्या शरीराच्या नैसर्गिक रचनेतच आहे.

कमी होणारे टेस्टोस्टेरॉन

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वडिलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी आधी इतर प्राण्यांचे निरीक्षण केले.

20 व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या या संशोधनानुसार, जेव्हा सस्तन प्राण्यांमधील 'नर' आपल्या पिल्लांची जबाबदारी स्वीकारतात, तेव्हा त्यांच्या हार्मोन्समध्ये स्पष्ट बदल दिसून येतात.

प्रामुख्याने आईच्या भूमिकेशी संबंधित असलेले टेस्टोस्टेरॉन, वासोप्रिन आणि प्रोलॅक्टिन यांसारखे हार्मोन्स वडिलांमध्येही कमी-जास्त होताना दिसले.

यावरून हे स्पष्ट झाले की, मुलांची काळजी घेताना वडिलांच्या शरीरातही आईप्रमाणेच नैसर्गिक प्रक्रिया घडतात.

जेव्हा अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ ली गेटलर यांनी 2000 च्या सुरुवातीच्या काळात विद्यार्थी असताना या संशोधनाबद्दल ऐकले तेव्हा त्यांना या विषयात प्रचंड रस निर्माण झाला.

गेटलर सध्या इंडियाना येथील युनिव्हर्सिटी ऑफ नोट्रे डेममध्ये 'हार्मोन्स, हेल्थ अँड ह्युमन बिहेविअर लॅबोरेटरी'चे संचालक आहेत.

ते सांगतात, "मी माझ्या शिक्षकांना विचारले होते की, मानवी वडिलांच्या बाबतीतही असा काही अभ्यास केला जात आहे का? आणि त्या वेळी त्यांचे उत्तर 'नाही' असेच होते."

पुरुषांमधील हार्मोनल बदलांचा पुरावा देणारा पहिला अभ्यास 2000 मध्ये कॅथरीन विन-एडवर्ड्स आणि अ‍ॅन स्टोरी या 2 कॅनेडियन शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केला होता.

गेटलर यांनी जेव्हा या विषयात संशोधन सुरू केले तेव्हा ही गोष्ट सिद्ध झाली होती की, ज्यांना मुले आहेत अशा वडिलांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी मुले नसलेल्या पुरुषांच्या तुलनेत कमी असते.

पण यात 'आधी कोंबडी की आधी अंडे' असा एक पेच होता. गेटलर यांनी मला समजावून सांगितले.

वडील झाल्यावर पुरूषांच्या शरीरात काय बदल होतात?

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC

"कमी टेस्टोस्टेरॉन असलेले पुरुष वडील होण्याची शक्यता जास्त असते की वडील झाल्यानंतर पुरुषांमध्ये हे जैविक बदल घडून येतात?" या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गेटलर यांनी फिलीपिन्सच्या सेबू सिटीमधील एका टीमसोबत काम करायला सुरुवात केली जी गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर संशोधन करत आहे.

2005 मध्ये या टीमने 21 वर्षे सरासरी वय असलेल्या आणि कोणताही पार्टनर नसलेल्या 624 पुरुषांच्या लाळेचे नमुने गोळा केले. या नमुन्यांद्वारे त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉनची पातळी तपासण्यात आली. त्यानंतर 4 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांची चाचणी घेण्यात आली.

या संशोधनाद्वारे त्यांना 2 प्रश्नांची उत्तरे शोधायची होती :

1. या मधल्या काळात जे पुरुष वडील झाले त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाली होती का?

2. जे वडील मुलांच्या संगोपनात जास्त वेळ घालवतात त्यांच्यातील ही पातळी अधिकच कमी झाली होती का?

जेव्हा या संशोधनाचे निकाल समोर आले तेव्हा दोन्ही प्रश्नांची उत्तरे "हो" अशीच होती.

मुलं नसलेल्या पुरुषांच्या तुलनेत जे पुरुष वडील झाले होते त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉनची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. तसेच, जे वडील आपल्या बाळाला सांभाळण्यात जास्त वेळ घालवत होते, त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉनची पातळी तितकीच वेगाने खाली घसरत होती.

इतकेच नाही तर जे वडील आपल्या लहान बाळासोबत झोपत होते, त्यांच्यातील या हार्मोन्सची पातळी देखील कमी आढळली.

वडील झाल्यावर पुरूषांच्या शरीरात काय बदल होतात?

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC

गेटलर यांच्या मते, "पुरुषांमध्येही वडील होण्यासाठी लागणारे नैसर्गिक बदल घडून येतात हे या संशोधनाने पहिल्यांदाच शास्त्रीय पुराव्यानिशी जगासमोर आणले."

ते म्हणतात की, ही निसर्गाचीच एक किमया आहे जिथे पुरुषांचे शरीर त्यांना मुलांचे संगोपन करण्यासाठी तयार करते.

अशाच प्रकारचे निकाल इतरही अनेक संशोधनांतून समोर आले आहेत. जोडीदाराच्या प्रेग्नन्सीच्या काळात ज्या पुरुषांचे टेस्टोस्टेरॉन कमी होते ते पुढे जाऊन अधिक जबाबदार आणि समाधानी वडील बनतात असे दिसून आले आहे.

या हार्मोन्सचा थेट संबंध वडिलांच्या प्रतिसादाशी असतो. बाळ रडू लागल्यावर ते तातडीने सावध होतात आणि बाळाकडे लक्ष देतात.

2018 मधील एका अभ्यासानुसार कमी टेस्टोस्टेरॉन असलेले वडील आपल्या लहान मुलांची काळजी घेण्यात जास्त रस घेतात आणि त्यांच्याशी अधिक जोडलेले असतात.

पण हे बदल नेमके कधी घडतात?" बाळ जन्माला येण्यापूर्वी की जन्मानंतर. हा प्रश्न अमेरिकेतील एमोरी युनिव्हर्सिटीच्या 'लॅबोरेटरी फॉर ह्युमन सोशल न्यूरोसायन्स'चे संचालक जेम्स के. रिलिंग यांच्या मनात घोळत होता.

रिलिंग यांनी मला सांगितले, "माझा असा अंदाज होता की, हे बदल प्रसूतीनंतरच्या काळात घडत असावेत जेव्हा वडील आपल्या बाळासोबत थोडा वेळ घालवतात आणि त्यांच्याशी संवाद साधू लागतात."

संशोधनाचे निकाल पाहून शास्त्रज्ञही चकित झाले. गर्भधारणेनंतर अवघ्या 4 महिन्यांनी जेव्हा त्यांनी वडिलांची चाचणी केली तेव्हा त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉन आणि व्हॅसोप्रेसिन हे दोन हार्मोन्स सामान्य गटाच्या तुलनेत आधीच कमी झाले होते.

2024 मध्ये पितृत्वाच्या विज्ञानावर आधारित 'फादर नेचर' हे पुस्तक लिहिणारे रिलिंग म्हणतात, "विशेष म्हणजे ज्या वडिलांचे टेस्टोस्टेरॉन जेवढे कमी होते तेवढेच ते प्रसूतीनंतर आई आणि बाळाच्या काळजीमध्ये जास्त सक्रिय होते."

त्यांच्या मते, वासोप्रेसिनचाही असाच परिणाम दिसून आला.

रिलिंग यांच्यासमोर आता हे मोठे प्रश्नचिन्ह आहेत की, हे नक्की का घडतं? गरोदर पत्नीच्या शरीरातून निघणाऱ्या काही नैसर्गिक वासांमुळे (फेरोमोन्स) पुरुषांमध्ये हे बदल होतात की आपण बाबा होणार आहोत या विचाराने झालेला तो मानसिक परिणाम असतो?

हे शास्त्र अजूनही नवीन असल्याने आपल्याला याची पक्की कारणं माहीत नाहीत. पण एक मात्र खरं आहे पुरुषांच्या शरीरात होणारे हे बदल केवळ टेस्टोस्टेरॉनपुरते मर्यादित नाहीत.

नात्याला जोडणारे 'प्रेमाचे हार्मोन' अर्थात 'ऑक्सिटोसिन'

'ऑक्सिटोसिन'चेच उदाहरण घ्या, ज्याला आपण 'प्रेमाचे हार्मोन' म्हणून ओळखतो. बाळंतपणापूर्वीच्या कोर्समध्ये मला या हार्मोनबद्दल सांगितले गेल्याचे आठवते.

प्रसूतीच्या वेळी वातावरण शांत आणि तणावमुक्त ठेवण्याचा सल्ला आम्हाला दिला गेला होता जेणेकरून माझ्या जोडीदाराच्या शरीरात 'ऑक्सिटोसिन'चा प्रवाह चांगला राहील आणि प्रसूतीची प्रक्रिया सुलभ होईल.

जगभरातील अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वडिलांमध्ये ऑक्सिटोसिनची पातळी जास्त असते. यामध्ये 1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांच्या वडिलांचा आणि 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांशी संवाद साधणाऱ्या वडिलांचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे, हा बदल आपण आपल्या मुलांसोबत किती वेळ घालवतो याच्याशी थेट संबंधित असल्याचे दिसून येते.

मुलांसोबत मनसोक्त खेळणाऱ्या आणि त्यांना सतत जवळ घेणाऱ्या वडिलांमध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण जास्त आढळले. अगदी पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावरही वडिलांच्या शरीरात हे बदल लगेच दिसून येतात.

रिलिंग यांच्या मते, ऑक्सिटोसिनमुळे वडिलांमधील संरक्षणाची आणि मायेची भावना अधिक जागी होते. हे तपासण्यासाठी पुरुषांच्या नाकावाटे या हार्मोनचा डोस दिला असता त्यांच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून येतात.

रिलिंग सांगतात, "एक अभ्यास तर मला खूप आवडता आहे. संशोधकांनी काही वडिलांना बाळासोबत खेळताना ऑक्सिटोसिनचा स्प्रे दिला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, हे हार्मोन मिळाल्यावर वडील अधिक उत्साही होतात आणि आपल्या हालचाली वेगाने करू लागतात."

हे सांगताना रिलिंग यांनी स्वतः आपली मान झटकन इकडे-तिकडे फिरवून एका उत्साही वडिलांची हुबेहूब नक्कल करून दाखवली.

अशा निकालांवरून असे सुचवले जाते की, ऑक्सिटोसिनमुळे एक सकारात्मक 'सेल्फ-रिइन्फोर्सिंग लूप' तयार होतो. म्हणजे असे एक चक्र जे स्वतःलाच प्रोत्साहन देते किंवा वाढवते.

जशी या हार्मोनची पातळी वाढते तशी वडिलांची आपल्या मुलासोबत गुंतून राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पुन्हा हार्मोनमध्ये अधिक वाढ होते.

वडील झाल्यावर पुरूषांच्या शरीरात काय बदल होतात?

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC

शास्त्रज्ञ या विषयाचा जितका खोलवर अभ्यास करत आहेत तितकेच त्यांना इतर हार्मोन्समध्येही बदल आढळून येत आहेत.

संशोधकांना असे दिसले की, इतर हार्मोन्सप्रमाणे 'वासोप्रेसिन'मध्येही बदल होतात. प्राण्यांमध्ये हे हार्मोन सहसा आपली जागा टिकवण्यासाठी किंवा दुसऱ्या नराशी भांडण्यासाठी किंवा आक्रमकतेसाठी वापरले जाते.

मात्र, बाळ जन्माला येण्यापूर्वीच होणाऱ्या बाबांच्या शरीरात हे हार्मोन कमी होते. याचा अर्थ असा की, निसर्गच वडिलांमधील आक्रमकता कमी करून त्यांना शांत आणि प्रेमळ बनवतो जेणेकरून ते बाळाची काळजी घेऊ शकतील.

प्रोलॅक्टिन हे हार्मोन खरं तर आईच्या अंगावर दूध येण्यासाठी ओळखलं जातं. पण संशोधकांना हे हार्मोन वडिलांमध्येही महत्त्वाचे बदल घडवताना आढळले आहे.

केवळ माणसांतच नाही तर पक्षी, मासे आणि दक्षिण अमेरिकेतील 'मार्मोसेट्स' नावाच्या माकडांमध्येही (जे आपल्या पितृप्रेमासाठी प्रसिद्ध आहेत) हे हार्मोन वडिलांना आपल्या पिल्लांची काळजी घ्यायला प्रवृत्त करते.

2023 मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डार्बी सॅक्सबी आणि त्यांच्या टीमने होणाऱ्या वडिलांमधील 'प्रोलॅक्टिन' या हार्मोनच्या पातळीचा अभ्यास केला.

ज्या वडिलांचे त्यांच्या न जन्मलेल्या बाळाशी घट्ट नाते होते त्यांच्यामध्ये या हार्मोनची पातळी जास्त असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, बाळाच्या जन्माआधीची ही हार्मोनची पातळीच हे ठरवते की, पुढे जाऊन ते वडील आपल्या मुलाची काळजी घेण्यात किती सक्रिय असतील.

आपण ऑक्सिटोसिनच्या बाबतीत पाहिलेच आहे की, जे वडील आपल्या बाळाची जास्त काळजी घेतात त्यांच्यामध्ये हे हार्मोनल बदल अधिक स्पष्टपणे दिसून येतात.

मानसशास्त्रज्ञ डार्बी सॅक्सबी म्हणतात, "केवळ मातांच्या शरीरातच हार्मोनल बदल होतात असे नाही. पुरुषांमध्येही अशाच प्रकारचे नैसर्गिक बदल आणि त्याचे परिणाम दिसून येत आहेत."

दुसरी पौगंडावस्था

सॅक्सबी आता या गोष्टीचा अभ्यास करत आहेत की, हार्मोन्समुळे होणारे हे बदल वडिलांच्या मेंदूवर नेमका काय परिणाम करतात.

त्या म्हणतात, "वडील होणाऱ्या पुरुषांचा अभ्यास करणं खूप रंजक आहे. कारण स्वतः गरोदर न राहताही पालक म्हणून जे मोठे शारीरिक आणि मानसिक बदल स्त्रियांच्या आयुष्यात येतात, तेच बदल हे पुरुषही अगदी जवळून अनुभवत असतात."

बाळाला जन्म देणाऱ्या मातांच्या शरीरात गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणाच्या वेळी मोठ्या प्रमाणात हार्मोन्समध्ये बदल होतात. त्या तुलनेत वडिलांच्या बाबतीत हे बदल हळूहळू घडतात.

सॅक्सबी यांच्या मते, ही एक महत्त्वाची संधी आहे. यामुळे संशोधकांना हे समजून घेता येते की, केवळ पोटात बाळ असल्यामुळे कोणते बदल होतात आणि बाळ सोबत असल्याच्या अनुभवामुळे कोणते बदल घडतात.

या विषयावर सॅक्सबी यांचे 'डॅड ब्रेन' हे पुस्तक 2026 साली वाचकांच्या भेटीला येत आहे.

पहिल्यांदाच वडील होणाऱ्या पुरुषांच्या मेंदूत नक्की काय चालतं हे पाहण्यासाठी सॅक्सबी आणि त्यांच्या स्पॅनिश सहकाऱ्यांनी एक संशोधन केलं.

बाळ जन्माला येण्याआधी आणि नंतर केलेल्या ब्रेन स्कॅनमधून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे वडिलांचा मेंदू या काळात विकसित होत होता. नवीन जबाबदाऱ्या आणि अनुभवांना सामोरं जाण्यासाठी त्यांचा मेंदू स्वतःला तयार करत होता. असं या संशोधनातून सिद्ध झालं.

सॅक्सबी वडील होण्याच्या या प्रवासाची तुलना 'पौगंडावस्थेशी' करतात. ज्याप्रमाणे किशोरवयात मुलांच्या शरीरात आणि मेंदूत मोठे बदल होतात तसेच बदल वडील होतानाही होतात.

त्यांच्या एका दुसऱ्या संशोधनातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. ज्या वडिलांचे आपल्या न जन्मलेल्या बाळाशी घट्ट नाते होते त्यांच्या मेंदूत मोठे बदल झाले.

तसेच ज्या वडिलांनी बाळाच्या संगोपनासाठी जास्त सुट्टी घेण्याचे ठरवले होते त्यांच्याही मेंदूत लक्षणीय बदल दिसून आले.

शेवटी 2026 मध्ये रिलिंग नावाच्या शास्त्रज्ञानेही याला दुजोरा दिला. त्यांनी सिद्ध केले की, वडिलांच्या मेंदूची रचना खरोखरच बदलते. यालाच वैज्ञानिक भाषेत 'न्यूरोलॉजिकल बदल' म्हणतात.

वडिलांमधील हे बदल एका साध्या नियमावर काम करतात. 'जितका सहभाग, तितका मोठा बदल'.

तुम्ही तुमच्या बाळासोबत जितका जास्त वेळ घालवाल तितकेच तुमचे शरीर आणि मेंदू त्याला प्रतिसाद देऊ लागतात.

सारा हर्डी यांच्या मते, ही प्रक्रिया एखाद्या ट्रिगर सारखी आहे. जेव्हा एखादा पुरुष बाळाची काळजी घ्यायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या शरीरातील पितृत्वाशी संबंधित यंत्रणा सक्रिय होते आणि त्याच्या स्वभावात आणि शरीरात बदल घडू लागतात.

सारा हर्डी यांच्या मते, मुलांची काळजी घेण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या मेंदूत आधीपासूनच दडलेली असते. यालाच त्यांनी 'अ‍ॅलोपॅरेंटल सबस्ट्रेट' असं नाव दिलं आहे.

जेव्हा एखादा पुरुष बाळाची जबाबदारी घेतो किंवा त्याला तसं पोषक वातावरण मिळतं तेव्हा त्याच्या मेंदूतील ही सुप्त शक्ती जागी होते.

त्यांच्या मते, मानवी संस्कृतीच्या विकासात एकमेकांना मदत करण्याची वृत्ती खूप महत्त्वाची ठरली. बाळ जन्माला आल्यावर केवळ आईनेच नाही तर वडिलांनीही त्याची पूर्ण जबाबदारी उचलणे फायद्याचे ठरू लागले. यामुळेच निसर्गाने पुरुषांमध्येही बाळाला सांभाळण्याची क्षमता निर्माण केली जी आजही आपल्यामध्ये टिकून आहे.

वडील झाल्यावर पुरूषांच्या शरीरात काय बदल होतात?

फोटो स्रोत, Getty Images

सारा हर्डी म्हणतात, "निसर्ग हा एका अशा काटकसरी गृहिणीसारखा आहे जी कोणतीही गोष्ट वाया घालवत नाही. एखादी वस्तू (क्षमता) सध्या उपयोगात नसेल, तर ती फेकून दिली जात नाही तर कपाटात नीट जपून ठेवली जाते."

"पुरुषांच्या बाबतीतही निसर्गाने असंच केलं आहे. बाळाला सांभाळण्याची क्षमता त्यांच्यात आधीपासूनच साठवून ठेवली आहे."

2014 मधील एका संशोधनातून हेच सिद्ध झालं आहे ज्याला सारा हर्डी विज्ञानातील सर्वात रोमांचक माहिती मानतात.

रुथ फेल्डमन यांच्या नेतृत्वाखालील टीमने एका अनोख्या प्रयोगासाठी काही पालकांना एकत्र केले. यात काही सामान्य जोडपी होती. जिथे आई बाळाची काळजी घ्यायची.

तर दुसरीकडे, मुलांचे संगोपन करणारे समलिंगी पुरुष होते. संशोधकांनी या सर्व वडिलांना त्यांच्या बाळांचे व्हिडीओ दाखवले आणि त्याच वेळी त्यांच्या मेंदूत काय बदल होतात हे पाहण्यासाठी त्यांचे ब्रेन स्कॅन केले.

स्त्री-पुरुष जोडप्यांमध्ये मुख्य काळजी घेणाऱ्या मातांच्या मेंदूतील भावना आणि नैसर्गिक प्रतिसादाचा भाग जास्त सक्रिय होता.

याउलट त्यांना मदत करणाऱ्या वडिलांच्या मेंदूचा 'सामाजिक विचारांचा' भाग जास्त कार्यक्षम होता. याचा अर्थ असा की, हे वडील बाळासाठी काही करण्यापूर्वी आधी परिस्थितीचा अंदाज घेत होते.

परंतु जे समलिंगी पुरुष बाळाची मुख्य जबाबदारी सांभाळत होते त्यांच्या मेंदूमध्ये आईसारखाच 'नैसर्गिक भावनेचा' भाग सक्रिय झालेला दिसला.

विशेष म्हणजे, त्यांच्यात 'परिस्थितीचा विचार करणारा' भागही तितकाच कार्यक्षम होता. थोडक्यात मुलांच्या संगोपनामुळे त्यांच्या मेंदूची संपूर्ण रचनाच बदलत होती.

समाजातील बदल

मी ज्या तज्ज्ञांशी चर्चा केली आणि या विषयातील जेवढी काही माहिती वाचली त्या सर्वांचा एकच निष्कर्ष आहे की, वडिलांच्या शरीरात होणारे हे वैज्ञानिक बदल लक्षात घेता आता कुटुंबांसाठी बनवले जाणारे सरकारी नियम बदलण्याची गरज आहे

"वडिलांना मुलांशी हे नाते निर्माण करण्याची संधी बळकट करणे ही समाजाची तातडीची गरज आहे," असे डार्बी सॅक्सबी म्हणतात.

त्यांच्या मते, सुधारित पालक रजा (पॅटर्निटी लिव्ह) धोरणांमुळे वडील आणि मुलांमधील बंध अधिक मजबूत होऊ शकतो.

आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे पुरुषांना सुरुवातीपासूनच या प्रक्रियेत सहभागी करणे, असे ली गेटलर यांनी मला सांगितले.

यात सोनोग्राफीला (Ultrasound) उपस्थित राहणे, तपासण्यांसाठी सोबत जाणे आणि गर्भधारणेदरम्यान जोडीदाराशी सक्रियपणे संवाद व सहभाग ठेवणे यांचा समावेश होतो.

"कुटुंब नव्या बाळाच्या स्वागताची तयारी करत असतानाच, गर्भधारणेच्या काळात पितृत्वाशी संबंधित ही जैविक प्रक्रिया सक्रिय होत असल्याचे आपल्याला माहिती आहे," त्यांनी मला सांगितले.

लहान बाळाला खेळवणारे वडील.

फोटो स्रोत, Getty Images

सक्रिय आणि सहभागी वडिलांमुळे संपूर्ण कुटुंबाला फायदा होतो. पाकिस्तान, केनिया आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये अधिक सहभागी जोडीदार असलेल्या मातांनी चांगल्या मानसिक आरोग्याचा अनुभव नोंदवला आहे. महत्त्वाचं म्हणजे, मुलांनाही त्याचा फायदा होतो.

2026 च्या सुरुवातीला प्रकाशित झालेल्या आणि 7 वर्षे 292 कुटुंबांचा पाठपुरावा करणाऱ्या एका मोठ्या अभ्यासात अमेरिकेतील संशोधकांनी निष्कर्ष काढला की, अधिक लक्ष देणाऱ्या वडिलांच्या मुलांचे हृदयविकाराशी संबंधित आरोग्य अधिक चांगले होते.

विशेष बाब म्हणजे, मातांच्या वर्तनाचा तसाच परिणाम दिसून आला नाही.

"पितृत्वाच्या जैविकतेमुळे सुरुवातीपासून मजबूत आणि निरोगी कुटुंब उभारण्यासाठी एक पाया तयार होतो, अशा दृष्टीने विचार करण्याला नक्कीच जागा आहे," असे गेटलर म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)