विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात; 8 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, UGC
- Author, लक्कोजू श्रीनिवास
- Role, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् येथे स्टील प्लांटमध्ये झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी बीबीसी तेलुगुला सांगितले.
प्लांट एसएमएस-2 मधील हॉट-मोल्ड बकेट्स कोसळल्या. त्यातील द्रव स्वरूपातील तप्त स्टील खाली सांडले. या दुर्घटनेत अनेक कामगार गंभीर जखमी झाले, तर काहींना आपला जीव गमवावा लागला.
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मृतांमध्ये स्टील प्लांटचे पाच कर्मचारी आहेत आणि तीन कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.
SMS-2 च्या विभागप्रमुखांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
दुर्घटनेनंतर वंगलापुडी अनिता आणि एम. श्रीभारत यांनी घटनास्थळाला भेट दिली. अपघाताची कारणे जाणून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

फोटो स्रोत, UGC
अपघाताची कारणे जाणून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मदतकार्य, सुरक्षा उपाययोजना आणि प्रभावित कर्मचाऱ्यांना दिल्या जात असलेल्या वैद्यकीय सेवांचा आढावा घेण्यात आला.
जखमी कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
विशाखापट्टणम स्टील प्लांट अपघातातील जखमींबाबत माहिती मिळावी आणि इतर तपशील जाणून घेता यावेत यासाठी अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.

फोटो स्रोत, UGC
नियंत्रण कक्षासाठी 08912590100 आणि 08912590102 हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पीडित आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती मिळवण्यासाठी या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयाचे पंतप्रधानांनी सांत्वन केले. जखमी लवकर बरे व्हावे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे पंतप्रधानांनी ट्विटरवर (X) म्हटले.
स्थानिक प्रशासन सर्वोतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी म्हटले. मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांचा निधी तसेच जखमींना 50,000 रुपयांचा निधी पंतप्रधानांनी जाहीर केला आहे.
केंद्राचे स्टील आणि अवजड उद्योग राज्य मंत्री श्रीनिवास वर्मा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. स्टील प्लांटच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असे बीबीसी तेलुगुने म्हटले आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























