श्वारमा खाल्ला आणि 24 तासांत तिचा मृत्यू, बाहेर मांसाहार करताना अशी काळजी घ्या

श्वॉर्मा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तंगदुराई कुमारपांडियन
    • Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी

आपण सध्या आधुनिक युगात वावरत आहोत. विज्ञानानं इतकी प्रगती केलीय की आपल्याला जगाची संस्कृती, खाद्यपदार्थ, कपडे, चालीरीती आणि जीवनशैलीची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून चटकन मिळते. आपल्याला ज्या पद्धती, कपडे, खाद्यपदार्थ आणि जीवनशैली आवडते ती आपण लगेच अवलंबण्याचा प्रयत्न करतो.

इंटरनेटमुळे नव्या खाद्यसंस्कृतीची माहिती मिळाली. ग्रिल चिकन, बर्गर, स्प्रिंग रोल, श्वारमा , नूडल्स, फ्राईड राईस आणि मांसाचे विविध प्रकार खाण्याची चटक आपल्याला लागली आहे. हे फास्ट फूड लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे बनले आहेत.

या फास्ट फूड उपाहारगृहांच्या शाखा मोठ्या शहरांमध्ये इकडे तिकडे विखुरल्या आहेत. लोक त्या ठिकाणी जाऊन फास्ट फूडचा आस्वाद घेतात. पण ते अन्नच आता विष बनल्याचं दिसू लागलंय.

गेल्या वर्षी केरळमध्ये श्वारमा खाणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मृत्यू झाला होता. यामुळे मांसाहार करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आणि मनात भीती देखील बसली.

अशीच एक घटना तामिळनाडूत घडली आहे. नमक्कल जिल्ह्यातील परमाथी वेल्लोर भागातील कलैयारासी नावाची 14 वर्षीय मुलगी तिच्या नातेवाईकांसह परिसरात सुरू असलेल्या एका खाजगी फास्ट फूड उपाहारगृहामध्ये श्वारमा खायला गेली होती.

काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळली.

चिकन

फोटो स्रोत, Getty Images

त्यादिवशी त्याच उपाहारगृहामध्ये जेवलेल्या 5 मुलांसह 43 जण आजारी पडले आणि त्यांना उपचारासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

यानंतर नमक्कलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात शवरमाच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. याप्रकरणी दुकानाचा मालक आणि आचारी अशा 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षेसाठी तपासणीचे आदेश

या घटनेने तामिळनाडू राज्यात खळबळ उडाली असून तामिळनाडूचे वैद्यकीय आणि लोककल्याण मंत्री एम. सुब्रमण्यन यांनी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना फास्ट फूड उपाहारगृहांची तपासणी करण्याचे आणि निकृष्ट खाद्यपदार्थ विकणाऱ्या उपाहारगृहांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणानंतर संपूर्ण तामिळनाडूतील अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी आपापल्या जिल्ह्यांमध्ये सक्रिय झाले असून कडक तपासणी सुरू झाली आहे. शिळं चिकन आणि निकृष्ट खाद्यपदार्थ जप्त करत उपाहारगृहांना दंड आकारण्याचं काम सुरू आहे.

चिकन मटण

फोटो स्रोत, Getty Images

पण सरसकट सगळेच उपाहारगृह वाईट नसतात. मांसाहारासाठी दर्जेदार उपाहारगृहांची निवड कशी करायची या विषयावर तामिळनाडूचे अन्न सुरक्षा अधिकारी जयरामा पांडियन यांनी बीबीसी तमिळशी संवाद साधला.

त्यांनी सांगितलं की, उपाहारगृहांमध्ये जनतेला सकस आहार घेता यावा यासाठी आम्ही अन्न सुरक्षा विभागाच्या वतीने विविध उपाययोजना सुरू आहेत.

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून (FSSAI -फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया) गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालेल्या शाकाहारी आणि मांसाहारी उपाहारगृहांमध्ये गेल्यास कोणतीही शारीरिक हानी होणार नाही असं त्यांनी सांगितलं.

उपाहारगृहांचे मालक हे प्रमाणपत्र उपाहारगृहांच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवतील.

अन्न सुरक्षा विभागाच्या वतीने, आम्ही दर 90 दिवसांनी रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, लहान उपाहारगृह आणि मोठ्या उपाहारगृहांना भेट देतो आणि अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्नाचा थोडासा भाग प्रयोगशाळेत पाठवतो.

तपासणी

जयरामा पांडियन यांनी पुढे सांगितलं की, तपासणीत जर तो खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचा आहे असं आढळलं तर उपहारगृहावर कायदेशीर कारवाई करून दंड आकारला जाईल. शिवाय ते उपाहारगृह सील करण्याची कारवाई केली जाईल.

जयरामा पांडियन सांगतात की, उपाहारगृहांमध्ये गेल्यावर तेथील स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पद्धत याचा विचार करून त्याचा दर्जा ठरवता येतो.

तसंच, अन्न सुरक्षा विभागाच्या वतीने आपण उपहारगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागीय अधिकाऱ्यांमार्फत अन्न सुरक्षितपणे हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण देत आहोत.

एकट्या मदुराई जिल्ह्यात 7000 हून अधिक कर्मचाऱ्यांना अन्न हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. संपूर्ण तामिळनाडूमध्ये याच प्रकारे काम सुरू असल्याचं जयरामा पांडियन यांनी स्पष्ट केलं.

अन्नाचा दर्जा कसा ठरवाल?

अन्न सुरक्षा विभागच अन्नाच्या सुरक्षिततेची खात्री करू शकतो. पण लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि चांगल्या उपहारगृहात जाऊन जेवणं महत्त्वाचं आहे.

जयरामा पांडियन सांगतात, तुम्ही तुमच्या ताटातील अन्न चाखून आणि वास घेऊन त्याची गुणवत्ता ओळखू शकता.

तपासणी

शावरमा खाल्ल्याने नमक्कल येथील 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. यानंतर लोककल्याण मंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाभरातील फास्ट फूड विक्री केंद्रांची तपासणी सुरू झाली आहे.

पण जे लोक निकृष्ट दर्जाचं अन्न खातात त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. निकृष्ट किंवा खराब अन्नपदार्थ खाल्ल्यास काय कराल?

अन्न खराब झालं तर काय कराल?

डॉक्टर क्लॉडिया मर्लिन यांनी बीबीसी तमिळशी याविषयावर संवाद साधला.

वैद्यकीय दृष्टिकोनातून आपण अन्नाकडे फक्त अन्न म्हणून पाहत नाही, तर शरीराला ऊर्जा देणारे विविध पदार्थ म्हणून पाहतो

डॉक्टर क्लॉडिया मर्लिन सांगतात, "एखादे अन्न ताटात येण्याआधी तिचा बीजापासून ताटापर्यंतचा प्रवास परिपूर्ण असावा लागतो, तरच ते अन्न आहे. जर त्याच्या या प्रवासात काही जरी चूक झाली तरी ते माणसासाठी विष बनतं."

चिकन

फोटो स्रोत, Getty Images

एक डॉक्टर म्हणून आम्ही फास्ट फूड न खाण्याची शिफारस करतो, कारण त्या अन्नामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली पोषक तत्वं योग्य प्रमाणात नसतात.

फास्ट फूडमध्ये कॅलरी आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही दिवसभरात खाल्लेल्या अन्नाचा एक भाग भाज्या, एक भाग प्रथिने आणि एक भाग पाण्याचा असावा. तुम्ही संतुलित अन्न खाल्ल्यासच तुमचे वजन वाढणार नाही आणि तुमचे शरीर नीट काम करेल.

फास्ट फूड खाल्ल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. काहीवेळा यामुळे कर्करोगासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

उलटी

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या तरुणाईचा बाहेर खाण्याकडे जास्त ओढा आहे. त्यांना रोज बाहेर खायची सवय असते. त्यामुळे वजन वाढते आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांवर परिणाम होतो.

दोन आठवड्यांतून केवळ एकदाच बाहेरचं खावं जेणेकरून शरीरावर त्याचा परिणाम दिसून येणार नाही

खराब झालेलं अन्न किंवा खराब दर्जाचं अन्न खाल्ल्यास पोटदुखी, उलट्या, जुलाब, सर्दी आणि ताप यांसारखे आजार जडण्याची शक्यता असते.

प्रत्येकाची लक्षणं सारखीच असतात असं नाही. काही लोकांना अन्न खाल्ल्यानंतर 6 ते 24 तासांनंतर त्याचे परिणाम दिसू लागतात. तर काही लोक दोन ते तीन दिवसांनंतरही आजारी पडतात.

जेव्हा अशी लक्षणं आढळतात तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींनुसार प्रथमोपचार म्हणून घरच्या घरीच ओआरएस पावडर घ्या. अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी होते. ओआरएसमुळे ते प्रमाण वाढते.

ओरएस

फोटो स्रोत, Getty Images

जर तुमच्या घरी ओआरएस पावडर नसेल तर 1:6 चमचा मीठ, 6 चमचे साखर आणि लिंबू पाण्यात पिळून घ्या आणि रुग्णालयात जाईपर्यंत हे पाणी सतत प्या. शरीरातील पाण्याची पातळी कमी होता कामा नये याकडे लक्ष द्या.

डॉक्टर क्लॉडिया मर्लिन इशारा देतात की, अशावेळी रूग्णालयात जाऊन योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. आजाराकडे दुर्लक्ष केल्यास घातक ठरू शकते.

"एखाद्या पदार्थाचे सेवन करताना तुम्हाला त्याच्या चवीत, वासात फरक जाणवत असेल तर ते अन्न खाणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही त्यापेक्षा जास्त खाल्लं तर त्यामुळे विषबाधा होऊ शकते.

नमक्कल जिल्ह्यातील मुलीच्या मृत्यू मागचं कारण आहे दूषित अन्न. एकाच उपहारगृहात जेवलेल्या 43 लोकांना आरोग्याच्या समस्या जाणवल्या. या घटनेत उपहारगृहातील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले मांस दूषित असण्याची शक्यता आहे.

डॉ. मर्लिन पुढे सांगतात की, "मुलांच्या आरोग्याच्या समस्या टाळायच्या असतील तर उपहारगृहात गेल्यावर प्रथम पालकांनी मांस-आधारित पदार्थ चाखून पाहावेत आणि मगच मुलांना ते द्यावेत."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.