'सीरियल किलर' डॉक्टर; प्राणघातक औषधं देऊन अनेक रुग्णांना मारलं, गुन्हे लपवण्यासाठी त्यांची घरं जाळण्याचा प्रयत्न

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बेथनी बेल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, जर्मनी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
गंभीर आजारी रुग्णांवर उपचार करणाऱ्या (पॅलिएटिव्ह केअर ) एका जर्मन डॉक्टरला 15 रुग्णांची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बर्लिनमधील एका न्यायालयाने या 41 वर्षांच्या डॉक्टरला दोषी घोषित केलंय.
जर्मनीच्या प्रायव्हसी कायद्यामुळे त्याची पूर्ण ओळख जाहीर न करता फक्त 'जोहान्स एम.' असंच नाव समोर आणलं गेलं आहे.
त्याने सप्टेंबर 2021 ते जुलै 2024 या काळात 12 महिला आणि 3 पुरुषांची हत्या केली होती.
हे मृत्यू म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असू शकतं. म्हणजेच जी माहिती सध्या उघड झाली आहे ती केवळ सुरुवात आहे, प्रत्यक्षात त्याने केलेले गुन्हे यापेक्षा जास्त असू शकतात असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कारण सरकारी वकील सध्या या डॉक्टरशी जोडल्या गेलेल्या इतरही अनेक प्रकरणांचा तपास करत आहेत.
'रुग्णांच्या संमतीशिवाय औषधांचे प्राणघातक मिश्रण दिले'
या डॉक्टरचे शिकार ठरलेले पेशंट्स 25 ते 94 वर्ष वयोगटातले होते.
कोर्टात चाललेल्या खटल्यात हे स्पष्ट झालं की, हे सगळे जण गंभीर आजारी नक्कीच होते. पण त्यांचा मृत्यू इतक्यात होईल अशी परिस्थिती नव्हती.
फिर्यादी पक्षाने म्हणजेच सरकारी वकिलांनी असा दावा केला आहे की, रुग्णांच्या घरी दिलेल्या भेटींदरम्यान या डॉक्टराने आपल्या रुग्णांच्या संमतीशिवाय त्यांना वेगवेगळ्या औषधांचे प्राणघातक मिश्रण दिले होते.
इतकंच नाही तर आपले गुन्हे लपवण्यासाठी त्याने कित्येक वेळा त्यांच्या घरी आग लावण्याचा प्रयत्नही केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
जुलै 2024 मध्ये या डॉक्टरला अटक होण्याच्या काही दिवस आधी सरकारी वकिलांनी सांगितलं होतं की त्याने एकाच दिवसात दोन रुग्णांची हत्या केली.
यात सेंट्रल बर्लिनमध्ये राहणारे एका 75 वर्षीय वृद्ध आणि काही तासांनंतर शेजारच्या भागात राहणारी एक 76 वर्षांची महिला समाविष्ट होती.
जवळपास वर्षभर कोर्टात चाललेल्या या खटल्यात हा डॉक्टर बहुतेक वेळ गप्पच होता. पण गेल्या महिन्यात त्याने गंभीर आजारी असलेल्या 12 रुग्णांची हत्या केल्याची कबुली दिली.
त्याने न्यायालयासमोर साक्ष दिली की,आपण जे काही केलं ते अगदी बरोबर होतं आणि आपण या लोकांना 'त्रास आणि आजारपणातून' वाचवत आहोत, असा त्याचा ठाम समज झाला होता.
त्याने सांगितलं की, "या सगळ्या काळात, मी जे काही केलं ते त्या रुग्णांच्या भल्यासाठीच होतं असं मला वाटत होतं."
त्याचसोबत, लोकांना जो काही मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागला त्याबद्दल त्यानं माफीही मागितली.
इतर 76 प्रकरणांची चौकशी सुरू
या डॉक्टरने आणखी काही रुग्णांची हत्या केली असावी असा संशय अधिकाऱ्यांना आहे. सरकारी वकील सध्या अशाच इतर 76 प्रकरणांची चौकशी करत आहेत.
जर्मन मीडियानुसार, जर हे नवीन गुन्हे खरे ठरले आणि तो दोषी आढळला तर जर्मनीच्या इतिहासातील हे सगळ्यात मोठ्या सिरीयल किलिंग प्रकरणांपैकी एक ठरेल.
या डॉक्टरने न्यायालयासमोर सांगितलं की तो 'पुढच्या कायदेशीर प्रक्रियेत जास्त सक्रियपणे भाग घेईल.'
खटल्याच्या आधीच्या सुनावणीदरम्यान, पीडित रुग्णांच्या नातेवाईकांनी न्यायालयासमोर सांगितलं होतं की, जे काही घडलं त्यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये.

फोटो स्रोत, Getty Images
2021 मध्ये मृत्यू झालेल्या सर्वात तरुण पीडितेच्या (25 वर्षीय महिला) आईला न्यायालयात रडू कोसळलं. त्या म्हणाल्या, 'तिनं कधीच असं म्हटलं नव्हतं की तिला आता जगायचं नाहीये."
2024 मध्ये जीव गमावलेल्या एका 72 वर्षांच्या वृद्ध महिलेच्या मुलाने सांगितलं की, त्याच्या आईचा तिच्या बहिणीसोबत बाल्टिक समुद्रावर फिरायला जाण्याचा प्लॅन होता. तो कोर्टात म्हणाला, "माझ्या आईला आणखी जगायचं होतं."
कोर्टाने निकाल देताना स्पष्ट केलं की, या डॉक्टरचा गुन्हा गंभीर आहे. त्याची तुरुंगवासाची शिक्षा संपल्यानंतरही त्याला नजरकैदेत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच त्याच्या डॉक्टरी व्यवसायावर कायमची बंदी आणली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























