होर्मुझ सामुद्रधुनीवर 'नौदल नाकेबंदी'ची धमकी; ट्रम्प अमेरिकन सैनिकांचाच जीव धोक्यात घालतायेत?

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प
    • Author, अँथनी झर्कर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्या नेतृत्वाखालील एका राजनैतिक पथकाने शनिवारी (11 एप्रिल) इराणविरूद्धचे अमेरिकेचे युद्ध संपवण्यासाठी एक करार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला.

त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपलं पुढचं पाऊल ठरवायचं होतं. त्यांचा निर्णय रविवारी (12 एप्रिल) सकाळी 'ट्रुथ सोशल'वरील पोस्टमधून जाहीर करण्यात आला.

त्यांनी लिहिलं की, अमेरिका इराणवर 'नेव्ही ब्लॉकेड' अर्थात 'नौदल नाकेबंदी' लादेल. त्यांनी पुढे म्हटलं की, "होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जो कोणी बेकायदेशीर टोल भरेल, त्याला खुल्या समुद्रातून जायला सुरक्षित मार्ग मिळणार नाही."

त्यांनी असंही सांगितलं की, आपल्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांचं दळणवळण सुरक्षित मार्गाने करण्यासाठी अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भूसुरुंग हटवणे सुरूच ठेवेल. त्यांनी पुढे असंही सांगितले की, योग्य वेळी इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्यासाठी अमेरिकन सैन्य सज्ज आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले की, इस्लामाबादमध्ये झालेल्या 20 तासांच्या चर्चेत थोडीफार प्रगती झाली, परंतु इराणनं अमेरिकेची ती मागणी मात्र स्वीकारलेली नाही, ज्यामध्ये इराणला आपला अणुकार्यक्रम सोडून देण्यास सांगितलेलं होतं.

मात्र, व्हेन्स यांच्या चर्चेत सहभागी असलेल्या एका अमेरिकन अधिकाऱ्याने हा दावा काहीसा फेटाळून लावला.

ते म्हणाले की, इराणसोबतच्या चर्चेतील कोंडी केवळ याच मुद्द्यापुरती मर्यादित नसून, त्यात अनेक मतभेदांचा समावेश आहे.

जसं की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचं नियंत्रण आणि येमेनमधील हुथी बंडखोर व लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांसारख्या प्रदेशातील अप्रत्यक्ष गटांना दिलेला पाठिंबा अशा काही मुद्द्यांवर मतभेद आहेत.

ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलावरील धोका वाढवला आहे का?

ट्रम्प यांच्या अलीकडील पोस्टमध्ये गेल्या आठवड्यात देण्यात आलेल्या विध्वंसक धमकीसारखा सूर नसला तरी, त्यांनी अमेरिकेसमोर नवीन आव्हानं आणि धोके निर्माण नक्कीच केलेले आहेत.

  • सागरी सुरुंग निर्मुलन मोहिमांमुळे अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांवर इराणी हल्ल्यांचा धोका वाढेल का?
  • इराणला नक्की कोणत्या देशाने टोल दिला, हे अमेरिका कसं ठरवणार?
  • अमेरिकन नौदलाची नाकेबंदी झुगारून देणाऱ्या परदेशी जहाजांविरुद्ध अमेरिका बळाचा वापर करेल का? इराणच्या तेलावर अवलंबून असलेल्या चीनसारख्या देशांची प्रतिक्रिया काय असेल?
  • इराणच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत तोडण्याच्या उद्देशाने उचललेल्या या पावलामुळे तेलाच्या किमती आणखी वाढतील का?

या प्रश्नांची उत्तरे अद्यापही स्पष्ट नाहीयेत.

तेहरानच्या क्रांती चौकात एक महिला इराणी ध्वज फडकवत आहे. हा फोटो 12 एप्रिल रोजी काढण्यात आला.

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, तेहरानच्या क्रांती चौकात एक महिला इराणी ध्वज फडकवत आहे. हा फोटो 12 एप्रिल रोजी काढण्यात आला.

नंतर रविवारी, अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने जाहीर केलं की, नौदल नाकेबंदीमुळे इराणच्या बंदरांमधून येणारी आणि जाणारी सर्व जहाजे थांबवली जातील. हा ट्रम्प यांच्या पूर्वीच्या प्रस्तावापासून वेगळा निर्णय होता.

"सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने इराण ती उघडण्यासाठी कसा हतबल होईल, हे मला समजत नाहीये," असं सिनेटच्या गुप्तचर समितीवरील ज्येष्ठ डेमोक्रॅटिक सदस्य, व्हर्जिनियाचे सिनेटर मार्क वॉर्नर यांनी सीएनएनला सांगितलं.

सीबीएसच्या 'फेस द नेशन' या कार्यक्रमात बोलताना, गेल्या वर्षीपर्यंत हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे अध्यक्ष असलेले ओहायोचे रिपब्लिकन काँग्रेस सदस्य माईक टर्नर म्हणाले की, होर्मुझमधील सध्याची परिस्थिती सोडवण्यासाठी नाकेबंदी हा एक मार्ग आहे.

"सामुद्रधुनीतून कोण दळणवळण करू शकेल हे आम्ही त्यांना ठरवू देणार नाही, असं सांगून राष्ट्राध्यक्ष आपल्या सर्व मित्रराष्ट्रांना आणि इतर देशांना वाटाघाटीच्या टेबलावर आणू पाहत आहेत. हा मुद्दा सोडवण्यात आला पाहिजे," असंही ते म्हणाले.

ट्रम्प यांच्यासमोरचे पर्याय

गेल्या आठवड्यात, इराण आणि अमेरिका दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर आणि समोरासमोर चर्चेसाठी येण्यास सहमत होण्यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प एका कठीण परिस्थितीत सापडले होते.

ते अमेरिकेकडून होणारे हल्ले आणखी वाढवू शकले ​​असते. त्यामुळे इराणच्या नागरी पायाभूत सुविधांचं दीर्घकालीन नुकसान झालं असतं. मानवतावादी संकट अधिक गडद झालं असतं आणि जागतिक अर्थव्यवस्था आणखी अस्थिर झाली असती.

किंवा ते या युद्धापासून माघार घेऊ शकले असते. या युद्धाचा मुद्दा अमेरिकन जनतेमध्ये तसाही लोकप्रिय ठरलेला नाहीये. आणि आता हा मुद्दा डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही समर्थकांनाही निराश करताना दिसतो आहे. खरं तर याच समर्थकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दीर्घकाळ चालणारी परदेशी युद्धे आणि मध्यपूर्वेतील गुंत्यांपासून दूर राहण्याबाबतचे वचन देताना ऐकलेलं होतं.

रविवारी ट्रम्प यांनी फ्लोरिडातील मियामी येथे एका UFC लढतीला हजेरी लावली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, रविवारी ट्रम्प यांनी फ्लोरिडातील मियामी येथे एका UFC लढतीला हजेरी लावली.

नवीन सीबीएस सर्वेक्षणानुसार, बहुसंख्य अमेरिकन (59 %) लोकांचा असा विश्वास आहे की, हे युद्ध अमेरिकेसाठी काही प्रमाणात किंवा खूपच जास्त प्रमाणात वाईट ठरत आहे.

अनेकांना असं वाटतं की, अमेरिकेची मुख्य उद्दिष्ट्ये, जसे की होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणे, इराणी जनतेला अधिक स्वातंत्र्य देणे आणि इराणचा अणुकार्यक्रम कायमस्वरूपी नष्ट करणे, अद्याप साध्य झालेली नाहीयेत.

दोन्ही बाजूंच्या बहुसंख्य लोकांना असं वाटतं की, ही उद्दिष्टे साध्य करणं अमेरिकेसाठी अत्यावश्यक आहे.

जवळपास एक आठवडा उलटला आहे. अमेरिकेने विजयाचे दावे केलेले असले तरी, राष्ट्राध्यक्षांपुढील आव्हाने बदललेली नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या या डावाची त्यांच्या पक्षाला किंमत मोजावी लागू शकते

रविवारी सकाळी 'फॉक्स न्यूज'शी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अखेरीस इराण अमेरिकेला हवं असलेलं 'सर्व काही' देईल. ते असंही म्हणाले की, येत्या काही महिन्यांत तेलाच्या किमती स्थिर राहू शकतात किंवा वाढू शकतात, परंतु अमेरिकेची अर्थव्यवस्था टिकाऊ राहील, असा त्यांना विश्वास आहे.

कमी शब्दात सांगायचं तर, हा एक जुगारच आहे.

रविवारी झालेल्या UFC लढतीदरम्यान ट्रम्प आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यात काही वेळा तीव्र शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, रविवारी झालेल्या UFC लढतीदरम्यान ट्रम्प आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यात काही वेळा तीव्र शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यातच, नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुका जवळ येत असल्याने, जर ते चुकीचे ठरले, तर त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत मोठं नुकसान सोसावं लागू शकतं.

शनिवारी रात्री, त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष इराणी लोकांशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानात असताना, डोनाल्ड ट्रम्प UFC (अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप) सामना पाहण्यासाठी मियामीला गेले होते. ही एक मिश्र मार्शल आर्ट्स स्पर्धा असून यात लढवय्ये एकमेकांवर प्रहार करत होते.

तिथे उपस्थित पत्रकारांच्या मते, ते एक फारच विचित्र दृश्य होतं.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हजारो प्रेक्षकांसमोर रिंगमधील हिंसक लढती पाहिल्या, सेलिब्रिटींशी संवाद साधला आणि अधूनमधून त्यांचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो व इतर सल्लागारांशी गहन चर्चाही केली.

अल्टिमेट फायटिंग केजचे सामने हे अत्यंत आक्रमक असतात. पण त्या ठरलेल्या नियमांमध्ये आणि वेळेच्या मर्यादेत आयोजित केल्या जातात. या सामन्यांच्या शेवटी एक विजेता आणि एक पराजित ठरतो. हा निर्णय पुरेसा सुस्पष्ट असतो.

परंतु, आता दुसऱ्या महिन्यामध्ये प्रवेश करणाऱ्या आणि सध्या दोन आठवड्यांची शस्त्रसंधी संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या इराणच्या युद्धात मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता कमीच आहे.

हा संघर्ष आता इच्छाशक्तीची कसोटी बनला आहे. एकीकडे, अमेरिका आणि इस्रायलच्या अविरत हल्ल्यांना तोंड देण्याची इराणची क्षमता, आणि दुसरीकडे, या युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आणि राजकीय दबावाला तोंड देण्याची ट्रम्प यांची क्षमता.

अंतिमतः, या लढ्यात सामील असलेल्या सर्वच बाजू कमकुवत होऊ शकतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)