कॉलेजची वाट ठरली अखेरची, विद्यार्थिनीची भर दिवसा निर्घृणपणे हत्या; कुटुंबीयांना शोक अनावर

विकास उर्फ रिशु पटियाल

फोटो स्रोत, Saurabh Chauhan

फोटो कॅप्शन, विकास उर्फ रिशु पटियाल आणि सिया
    • Author, सौरभ चौहान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी शिमल्यामधून
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

(या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)

हिमाचल प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या रस्त्यावरच हत्या करण्यात आली आहे.

ही घटना सोमवारी (13 एप्रिल) सकाळी सुमारे सव्वा नऊच्या सुमारास मंडी जिल्ह्यातील गोपालपूर पंचायत अंतर्गत येणाऱ्या नैन गावाजवळ घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव सिया गुलेरिया आहे.

याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलिसांनी सांगितले आहे.

आरोपीने गवत कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार कोयत्याने सियाच्या गळ्यावर अनेक वेळा वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण हिमाचल प्रदेशात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण भागातील महिलांची सुरक्षितता, बस सुविधेची कमतरता आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

मृत विद्यार्थीनी कोण होती?

सिया गुलेरिया ही नैन गावची रहिवासी होती. ती सरकाघाट कॉलेजमध्ये व्होकेशनल कोर्सच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. कुटुंब आणि स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सिया हुशार आणि अभ्यासू होती. ती तिच्या आई आणि लहान बहिणीची काळजी घेत असत.

तिच्या लहान बहिणीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे सियाने तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं नियोजन केलं होतं.

सिया

फोटो स्रोत, Saurabh Chauhan

फोटो कॅप्शन, सिया

सिया तीन बहिणींमध्ये मधली होती. तिचे वडील जोगिंदर गुलेरिया सोलन जिल्ह्यातील बद्दी येथे ट्रक ड्रायव्हर आहेत. मोठी बहीण बद्दीमध्ये नोकरी करते, तर आई आणि छोटी बहीण घरी राहतात. सिया अभ्यासात हुशार तर होतीच शिवाय ती कुटुंबाला आर्थिक मदतही करत होती.

वडिलांचे दु:ख

बीबीसीशी बोलताना भावूक झालेले सियाचे वडील जोगिंदर गुलेरिया यांना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, "माझं सियाशी सकाळीच बोलणं झालं होतं. ती साधारण सकाळी 9 वाजता कॉलेजला जात असत. नंतर मी घरखर्चासाठी पैसे पाठवले आणि पत्नीला फोन केला."

"तेव्हा जे ऐकलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काही वेळापूर्वी जिचा हसरा आवाज ऐकून मन आनंदी झालं होतं, तिच्यासोबत असं काही घडेल याची कल्पनाही नव्हती."

जोगिंदर गुलेरिया पुढे म्हणाले की, सिया तिच्या आई आणि लहान बहिणीची खूप काळजी घेत असत. ती म्हणायची की लहान बहिणीचे बारावीचे पेपर संपल्यानंतर तिला स्वतःसोबत कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देईल. बहिणीला तर शिकवेलच पण त्याचबरोबर कुटुंबाचा खर्चही उचलेल असं ती म्हणायची.

सियाच्या आईची अवस्था रडून रडून खूप वाईट झाली आहे. संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांची खराब स्थिती आणि बस सेवा नसल्यामुळे सियाला मुख्य चौकापर्यंत पायी जावं लागत असत.

'सियाला इतक्या क्रूरपणे का मारलं?'

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली होती. गोपालपूरच्या नैन गावाजवळील निर्मनुष्य ठिकाणी हल्लेखोराने तिला अडवले आणि धारदार कोयत्याने तिच्यावर वार केले.

सियाने स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे केला, असं मानलं जात आहे. त्यानंतर आरोपीने तिच्या गळ्यावर एकामागोमाग अनेक वार केले, ज्यात तिचा हातही कापला गेला.

शवविच्छेदनासाठी मृतदेह नेरचौक मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. त्यानंतर मंगळवारी (13 एप्रिल) सकाळी सियावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सियाची मैत्रिण कशिश, जी रोज तिच्यासोबत कॉलेजला जायची. तिने सांगितलं की, ती नेहमीप्रमाणे गोपालपूर कॉलेजला जाण्यासाठी माही गावातील बस थांब्यावर सियाची वाट पाहत होती. त्या दोघी फोनवर बोलत होत्या.

दोन मिनिटांत बस स्टॉपवर पोहोचेल, असं सियाने मैत्रिणीला सांगितलं होतं. तेवढ्यात तिचा दोनदा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. घटनास्थळी पोहोचल्यावर सिया जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

Caption- पोलीस आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विकासला अमली पदार्थांचे व्यसन आहे

फोटो स्रोत, Saurabh Chauhan

फोटो कॅप्शन, पोलीस आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विकासला अमली पदार्थांचे व्यसन आहे

बीबीसीशी बोलताना कशिश म्हणाली की, "आम्ही दोघी रोज एकत्र कॉलेजला जात असत. सिया नैन गावातून माही बस स्टॉपपर्यंत पायी यायची. आजपर्यंत कधीही, कोणीही तिला त्रास दिला नव्हता. घरातून निघाल्यावर ती येत असल्याचे मला फोन करून सांगायची."

"नेहमीप्रमाणे मी तिला विचारण्यासाठी फोन केला होता. आता तिच्या ओरडण्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे. मला समजत नाही की, तिच्यावर हल्ला का झाला? तिला इतक्या क्रूरपणे का मारलं गेलं?"

आरोपी कोण आहे?

मंडी पोलिसांनी या खून प्रकरणात 35 वर्षीय विकास उर्फ रिशु पटियाल याला अटक केली आहे. तो गोपालपूर तहसीलमधील माइना गावचा रहिवासी असून नैन गावाजवळच राहत होता.

आरोपी बद्दी येथे प्लंबरचे काम करायचा. त्याच्याकडून आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. यावरून पोलिसांना त्याची माहिती मिळाली. पोलीस आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विकासला नशेची सवय आहे आणि तो सिंथेटिक ड्रग्जचं व्यसन करतो.

घटना घडल्यानंतर सुमारे दोन तासांनी गावकऱ्यांनी घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर दूर जंगल, शेतात आणि नाल्याच्या परिसरात लपलेल्या आरोपीला पकडले. संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसल्याने जमावाने त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांची कारवाई

मंडीचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी आरोपीला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "तपास सुरू आहे. हत्येमागचं कारण चौकशी आणि अहवालानंतर समोर येईल. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत आणि यात आणखी कोणी सहभागी होते का? की आरोपी एकटाच होता, याचाही तपास केला जात आहे."

Caption- हत्येमागचं कारण काय आहे, याचा तपास केला जात असल्याचे मंडीचे पोलीस अधिक्षक विनोदकुमार यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Saurabh Chauhan

फोटो कॅप्शन, हत्येमागचं कारण काय आहे, याचा तपास केला जात असल्याचे मंडीचे पोलीस अधिक्षक विनोदकुमार यांनी सांगितलं.

राज्य महिला आयोगाने या प्रकरणात मंडीच्या पोलीस अधिक्षकांकडून अहवाल मागितला आहे.

ही घटना समजताच संपूर्ण गाव आणि आसपासचा परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.

ग्रामस्थांनी सरकाघाट-घुमारवीं महामार्ग रोखून धरला. सोमवारी सायंकाळी जमावाने पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली आणि न्यायाची मागणी केली. 'आरोपीला फाशी द्या' अशा घोषणा देण्यात आल्या.

दोन तासांनंतर पोलीस उपअधीक्षक संजीव यांच्या मध्यस्थीमुळे महामार्ग खुला झाला. मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत संपूर्ण परिसरातील बाजारपेठ बंद होती.

ग्रामस्थांना चिंता

उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी ही घटना 'दुःखद आणि अस्वीकार्य' असल्याचं म्हटलं.

ते म्हणाले, "एका सभ्य आणि सुसंस्कृत समाजात अशा घटनांना स्थान नाही. दोषींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. आम्ही शोकाकुल कुटुंबासोबत आहोत."

राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी पोलीस महासंचालकांशी फोनवर बोलून कुटुंबाप्रति शोक व्यक्त केला. तसेच महिलांच्या सुरक्षेवर त्यांनी भर दिला.

स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, गोपालपूर भागात आधी तीन बसची सेवा होती, पण सरकारने त्या बस बंद केल्या. त्यामुळे विद्यार्थिनींना पायी जावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका आहे.

मंडी जिल्ह्यातील भाजप आमदार राकेश जम्वाल म्हणाले की, सिया हत्याकांडाने देवभूमी हिमाचलच्या शांततेला आव्हान दिले आहे. ही घटना ग्रामीण भागातील तरुणांमधील वाढत्या व्यसनाधीनच्या समस्येकडे आणि कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण करते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)