सम्राट चौधरी ठरले भाजपचे बिहारचे पहिले मुख्यमंत्री; नितीश कुमार राज्यसभेवर

वाचन वेळ: 6 मिनिटे

सम्राट चौधरी यांनी पाटणा येथे बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते राज्यातील भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री आहेत.

त्यांच्यासोबत जनता दल युनायटेडचे ​​(जेडीयू) विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

हे दोघेही उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याचे मानलं जात आहे. या शपथविधी सोहळ्याला नितीश कुमारही उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय कुमार चौधरी म्हणाले, "नितीश कुमार यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा हा परिपाक आहे. त्यांनी बिहारला ज्या मार्गावर नेले आहे, त्याच मार्गावर आमचं नवीन सरकारही चालेल."

तर, बिजेंद्र प्रसाद यादव म्हणाले, "आम्ही नितीश कुमार यांचे कार्य पुढे चालू ठेवू."

या सोहळ्यात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री जितन राम मांझी म्हणाले, "नवीन मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीनं मी खूप आनंदी आणि भावूक झालो आहे. आज मी जे काही आहे ते नितीशजींमुळेच आहे. त्यांनीच मला 2014 मध्ये मुख्यमंत्री बनवलं. त्यांच्यामुळेच महादलित समाजातील एक व्यक्ती मुख्यमंत्री बनली."

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे सम्राट चौधरी यांच्या मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला.

अशाप्रकारे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा 21 वर्षांचा कार्यकाळ संपला आहे.

2000 साली नितीश कुमार सात दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते. मात्र, मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कायमस्वरूपी कार्यकाळ नोव्हेंबर 2005 मध्ये सुरू झाला होता.

विजय कुमार चौधरी

ते 2005 मध्ये जेडीयूमध्ये सामील झाले. 2010 पासून, त्यांनी समस्तीपूरमधील सरैरंजन मतदारसंघातून सातत्याने विजय मिळवला आहे.

त्यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलेलं आहे. ते नितीश कुमार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.

मागील सरकारमध्ये, त्यांच्याकडे जलसंपदा, संसदीय कामकाज, बौद्धिक संपदा आणि विकास मंत्रालय (IPRD) आणि बांधकाम या चार विभागांची जबाबदारी होती.

1982 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार होते.

सुरुवातीला त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दलसिंगसराई मतदारसंघातून विजय मिळवला होता.

बिजेंद्र प्रसाद यादव

बिजेंद्र प्रसाद यादव हे 2005 पासून बिहार सरकारमध्ये सातत्याने मंत्री आहेत.

ते सुपौल मतदारसंघातून सातत्याने विजयी झाले आहेत. ते नितीश कुमार सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. ते जयप्रकाश नारायण यांचे निकटचे सहकारी होते.

त्यांनी नितीश कुमार सरकारमध्ये ऊर्जा आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. बिहारमधील वीजपुरवठा परिस्थिती सुधारण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

नितीश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे निरीक्षक शिवराज सिंह चौहान यांनी सम्राट चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्याची घोषणा केली.

मंगळवारी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाटणा येथे भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यात चौधरींचा भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली.

यानंतर, ते बिहारचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा आहे. तथापि, एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर याची घोषणा केली जाईल.

विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर सम्राट चौधरी यांनी, "भारत श्रेष्ठ मानण्याच्या आणि पक्षाला अग्रस्थानी ठेवण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेनुसार आम्ही काम करत राहू," अशी प्रतिक्रिया दिली.

नितीश कुमार यांनी आम्हाला सरकार कसे चालवायचे आणि बिहारच्या लोकशाहीसाठी काय चांगले आहे हे शिकवलं आहे. मी सर्वांना निश्चितपणे खात्री देऊ इच्छितो की, ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे आणि नितीश कुमार यांनी समृद्ध बिहारचे स्वप्न पाहिले आहे, त्याचप्रमाणे आपण सर्व मिळून ही स्वप्ने पूर्ण करू, असे सम्राट चौधरींनी म्हटले.

बिहारचं राजकारण तीन दशकांहून अधिक काळ लालू यादव आणि नितीश कुमार यांच्याभोवती फिरत होतं. पण आता राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे.

राज्यात जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत राहिला आहे, तेव्हा त्याची भूमिका नेत्याऐवजी मित्रपक्षाची राहिली आहे. त्यामुळं भाजपला कधीही मुख्यमंत्रिपद मिळवता आलं नाही, असं बिहार हे एकमेव हिंदी भाषिक राज्य आहे.

नितीश कुमार राज्यसभेवर

दरम्यान यापूर्वी नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपध घेतली.

नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात तब्बल दोन दशकानंतर एक मोठा बदल घडला.

नितीश कुमार बिहारचं राजकारण सोडून राज्यसभेचा रस्ता निवडू शकतील अशी मोठी चर्चा बिहारमध्ये होत होती. तसंच घडलं.

नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलं होतं की, "मागच्या दोन दशकांमध्ये तुम्ही माझ्यावर मोठा विश्वास दाखवला. त्याच विश्वासाच्या जोरावर आम्ही बिहार आणि तुम्हा सर्वांची सेवा केली आहे."

नितीश कुमारांनी लिहिलं होतं की, "तुमच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आज बिहार विकास आणि आदराचा एक नवीन आयाम सादर करत आहे. यासाठी मी यापूर्वीही अनेक वेळा तुमचे आभार मानले आहेत."

नितीश कुमार म्हणाले होते, "माझ्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासूनच मला बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती. या संदर्भात, मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य होण्याचा प्रयत्न करीत आहे."

"मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे खात्री देऊ इच्छितो की तुमच्याशी असलेले हे संबंध भविष्यातही कायम राहतील आणि विकसित बिहार उभारण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्याचा माझा संकल्प अबाधित राहील. स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल," असं नितीश कुमार या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी

नितीश कुमार 2005 पासून बिहारच्या सत्ताकारणाचा महत्त्वाचा भाग राहिले आहेत. त्यानंतर दोन दशकं नितीश कुमार बिहारमध्ये सत्तेत राहिले आहेत.

2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर नितीश कुमार त्यांचं बहुमत सिद्ध करू शकले नव्हते. त्यानंतर 2005 मध्ये भाजपच्या पाठिंब्याने नितीश कुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले होते.

2014-15 मध्ये, काही महिन्यांसाठी, नितीश कुमार यांनी त्यांच्याच पक्षाच्या जितन राम मांझी यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. त्यानंतर पुन्हा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनले आणि मग 'सत्ता कुणाचीही असो मुख्यमंत्री नितीशच असतील' असं म्हटलं जाऊ लागलं.

जनता दल युनायटेड (जेडीयू)मध्ये सध्या काय चाललंय?

नितीश कुमारांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रकाशित होऊ लागल्यानंतर जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या अनेक कार्यकर्त्यांनी बिहारमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती.

जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असावेत अशी मागणी या आंदोलनात केली होती.

मागच्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

नितीश कुमार यांनी सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे.

लोजपा (आर)चे नेते चिराग पासवान यांनी याबाबत लिहिलं की, "एनडीए आघाडीकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमचा अनुभव, समर्पण आणि सामाजिक सेवेची भावना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात देश आणि समाजाच्या हितांना बळकटी देईल असा पूर्ण विश्वास आहे."

भाजपच्या नेत्यांनी काय म्हटलं?

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, "त्यांनी यापूर्वी राज्यसभेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोणीही त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही; ते स्वतःच्या मर्जीने जात आहेत. त्यांनी विधान परिषद, बिहार विधानसभा आणि लोकसभा या तिन्ही सभागृहांतून लोकांची सेवा केली आहे."

नितीश कुमार यांच्या घोषणेनंतर, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं.

'हा जनतेचा विश्वासघात' - काँग्रेस

बिहारच्या सत्तेत होणारा हा बदल मतदारांचा विश्वासघात आहे असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

नितीश कुमार यांच्या या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत प्रतिक्रिया दिली होती.

"बिहारची निवडणूक सुरु असताना काँग्रेस जे सातत्याने म्हणत होतं ते खरं झालं आहे. जी-2 यांच्यातर्फे नेतृत्व आणि सरकारमध्ये बदल करण्यात आले आहेत. हा जनमताचा अपमान आहे," असं ते म्हणाले होते.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले, "बिहारच्या राजकारणात अचानक एक भुकंप घडला. कुणालाही याचा अंदाज आला नाही की निवडणुकीनंतर भाजप एवढ्या लवकर नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकेल."

"आमचे नेते तेजस्वी यादव सतत म्हणत होते की भाजप जेडीयूला संपवल्याशिवाय आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून काढल्याशिवाय शांत बसणार नाही. जेडीयूचे अनेक लोक भाजपसोबत मिळून काम करत होते. असं असलं तरी अनेकांना नितीश कुमारच मुख्यमंत्री राहावेत असंही वाटत होतं. हे एक मोठं राजकीय अपहरण आहे."

आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी त्यावेळी लिहिलं की, "हे ट्विट नितीश कुमार यांनी स्वतः लिहिलेलं किंवा लिहून घेतलेलं नाही तर ते दिल्लीवरून आल्याचं स्पष्ट दिसतंय. यामुळे जेडीयूच्या आत्मा दुखावला आहे."

यावर प्रतिक्रिया देताना जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, "ते बिहारचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांचा कार्यकाळ अखेर संपेल हे स्वाभाविक होते. अर्थात, हा बिहार सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांचा अंतर्गत विषय आहे.

मात्र, नितीश कुमार हे एकेकाळी इंडिया ब्लॉकमध्ये आमचे सहकारी होते आणि त्यामुळे, निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यांनी त्यांचे राज्यसभेत जाणं ही महत्त्वाची घटना आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)