'मोठं होताना सोबत आशाताईंचे सूर नसते तर माझं काय झालं असतं?' - ब्लॉग

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे'

कवीवर्य मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेल्या या ओळी आशा भोसले यांच्यासाठीच होत्या असं मला नेहमी वाटतं.

नव्वदीच्या काळात टीव्हीवर त्यांना पाहिलं होतं, तेव्हापासून ते अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमापर्यंत, आशाताईंमध्ये बदल झाल्याचं मला कधी वाटलंच नाही.

जणू वयाला थांबवण्याची जादू त्यांच्याकडे होती. ऑफ व्हाईट रंगाची किंवा क्रीम कलरची साडी, गळ्यात एखादा सुंदरसा दागिना, केसांत माळलेला गजरा या गोष्टी त्यांना चिरतरुण बनवत होत्या. पण त्यापेक्षाही एक गोष्ट त्यांच्याकडे आणखी असल्याची जाणवायची- ती म्हणजे त्यांचा उत्साह.

कार्यक्रम कोणताही असो आशाताई असल्या की त्याला बहार यायची आणि क्षणभर सर्व कामं सोडून तो पाहावा असं वाटायचंं.

आशा भोसलेंनी 20 हून अधिक भाषांमधून हजारो गाणी गायली. किती चित्रपटांची किंवा गाण्यांची त्यांच्याशिवाय आपण कल्पनाच करू शकणार नाहीत.

आवाजातला टवटवीतपणा, त्यातील चढ-उतार, वैविध्य हे सारं काही ऐकलं की असं वाटायचं अरे एकच व्यक्ती अशी दोन वेगवेगळी गाणी कशी म्हणू शकते. पण दोनवरच थांबतील तर त्या आशाताई कसल्या?

त्यांचं प्रत्येक गाणं त्या इतक्या वेगळ्या पद्धतीने म्हणायच्या की माझ्यासारख्या अनेक लोकांना, ज्यांना संगीताचे विशेष ज्ञानही नाही त्यांना देखील त्यातला फरक समजू शकायचा.

पण माझ्यासाठी आशाताई म्हणजे फक्त मधुर संगीत, आवाजातील वैविध्य, त्यांची सुरांवरची पकड एवढंच नव्हत्या. आयुष्यातल्या चांगल्या वाईट काळात त्यांच्या गाण्यांनी मला जी साथ दिली, ती मला महत्त्वाची वाटते. म्हणून आज आशाताई आपल्यात नाहीत ही जाणीव वेदनादायी ठरते.

एवढ्या लोकांच्या काळजाला भिडणारी गाणी त्या गाऊ शकल्या त्याचं कारण म्हणजे त्या महान कलाकार होत्या आणि त्याचवेळी आपल्यातील देखील होत्या. आपल्या वाट्याला आलेली सुख-दुःख उदार मनाने त्यांनी स्वीकारली.

आपली सख्खी बहीण लता मंगेशकर या भारतातली महान गायिकांपैकी एक आहेत याचं दडपण न घेता त्यांनी आपली गायकी सिद्ध केली आणि माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांच्या मनावर त्या आपलं नाव कोरून गेल्या. त्यांच्या जगण्याच्या ऊर्मीतूनच त्यांनी आपली कला ही सर्वोच्च पातळीवर नेली.

त्यांचं मी ऐकलेलं पहिलं गाणं कोणतं असेल हे निश्चित आठवत नाही. लहान असताना मला वाटायचं की टीव्हीत दिसणारे कलाकार असतात तेच गाणी गातात. त्यामुळे गाणं म्हणणारे लोक कोणी असतात याची तर मला कल्पना देखील नव्हती. पण त्यावेळी दूरदर्शनवर नवीन वर्षाच्या संध्याकाळी किंवा काही निमित्ताने गाण्याचे कार्यक्रम असायचे त्यात हे कळलं आणि त्यात पहिल्यांदा आशाताई गाताना दिसल्या.

आठ-दहा वर्षांचा असेल. एका परिचतांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्याकडे 'बाजीगर'ची कॅसेट होती. त्याच्या कव्हरवर आशा भोसलेंचं नाव पहिल्यांदा वाचलं आणि कळलं की, अरे आपल्याला आवडणारं 'किताबे बहुतसी पढी होगी तुमने' हे गाणं त्यांनी म्हटलंय.

मग गाणं आवडलं की गायक किंवा गायिका कोण यावर लक्ष जाऊ लागलं. तेव्हा कळलं बहुतेक जी गाणी आपल्याला आवडत आहेत ती आशा भोसलेंचीच आहे. जसं की डीडीएलजे मधलं 'जरा सा झुम लो मैं' किंवा मराठी लावणी 'रेशमांच्या रेघांनी.'

आपल्याला आशा भोसले आवडतात यावर पूर्ण शिक्कामोर्तब होण्यासाठी 'रंगीला' आला. त्यातलं 'तनहा तनहा' हे गाणं टीव्हीवर ऐकलं आणि म्हटलं की ही कॅसेट आपल्याला पाहिजे. आई-बाबांकडे हट्ट करुन 35 रुपयांची कॅसेट आणली. 'रंगीला रे', 'तनहा तनहा' ही दोन गाणी ऐकण्यासाठी कॅसेट फॉरवर्ड-बॅकवर्ड करून खराब करून टाकली.

नंतर जेव्हा 'ताल' आला तेव्हा 'कही आग लगे जाए' या गाण्याने तर अक्षरशः वेड लावलं. 'रात शबनमी भिगी चांदणी - जानम समझा करो' आणि राम गोपाल वर्मांच्या 'मस्त' चित्रपटातलं 'हे रामा कृष्णा गोविंदा गोपाला' ही सगळीच गाणी फेव्हरेट ठरली.

आशाताईंनी नव्या काळाची आव्हानं पेलली

नव्वदीत अनेक ताज्या दमाचे गायक-गायिका आले होते, नवं तंत्रज्ञान, नवे संगीतकार सारं काही बदललं होतं. पण या काळात गाताना आपल्या आवाजाचा वेगळा बाज ठेवून त्यातली गोडी टिकवून ठेवणं हे आव्हान आशा भोसलेंनी लीलया पेललं.

इतकंच नाही तर त्या काळात वाढलेल्या माझ्यासारख्या अनेक मुला-मुलांचा काळ त्यांनी त्यांनी त्यांच्या गाण्यात रंगवून टाकला.

नव्वदी संपली आणि कॅसेट्स गेल्या. सीडी-डीव्हीडी/MP3 प्लेअर्स आले. एकेका 'एमपी 3' मध्ये 100-100 गाणी बसू लागली. त्याच बरोबर आणखी गोष्ट घडली ती म्हणजे रिमिक्स आलं.

'सजना है मुझे सजना के लिए', 'तू तू है वही' अशी गाणी कानावर पडू लागली. पुन्हा एकेदिवशी 'रिव्हिलेशन' झालं की हे रिमिक्स होण्याआधी मूळ गाणी आशा भोसलेंनीच गायली आहेत.

हे एकदा कळल्यावर मग मी आशा भोसलेंची MP3 चं घेऊन आलो. तेव्हापासून मी त्यांचा 'ऑफिशिएल फॅन' बनलो.

'दैय्या दैय्या मैं कैसी फसी', 'मुथुकोडी कवाडी हडा', 'ये मेरा दिल प्यार का दीवाना', 'पिया तू अब तो आजा' ही त्यांची उडत्या चालीची गाणी तर पाठच केली. कोणतं गाणं आशा भोसलंचं आहे आणि कोणतं लता मंगेशकरांचं सांगून मित्र कंपनीची वाहवा मिळवू लागलो.

पुढे-पुढे जसा काळ सरकत गेला तसं कळलं की आशा भोसलेंची इतर गाणी ऐकताना देखील आपलं मन त्यात रमतं. अतिशय धीरगंभीर 'मेरा कुछ सामान तुम्हारा पास पडा है', 'सलोना सा सजन है और मैं हू' या गाण्यांनी वाऱ्यासारखं भिरभिरत राहणारं मन दोन क्षण शांत केलं.

उमराव जान आणि आशाताई एक अतूट नातं

'उमराव जान'ची खरी 'जान' ही खय्याम यांनी दिलेलं संगीत आहे. या चित्रपटासाठी आशाताईंनी पाच गाणी गायली. 'दिल चीज क्या है', 'इन आंखो की मस्ती' ही गाणी तर केव्हाही गुणगुणवाशी वाटतात.

'उमराव जान'मधील गाणी अजरामर झाली. आणि ही अजरामर व्हावीत यासाठी आशाताईंनी किती मेहनत घेतली हे स्वतः खय्याम यांनीच एका इंटरव्यूत सांगितले आहे. खय्याम यांनी आशाताईंना सांगितलं की त्यांना या चित्रपटातील गाणी गायची आहेत. पण त्यांनी एक अट ठेवली. की 'मला या गाण्यांमध्ये आशा नकोय. तर उमराव जान हवी आहे.'

त्या पात्राला जशी योग्य असतील तशीच गाणी हवी आहेत. त्यांनी विचारलं 'म्हणजे कसं गायचं हे तुम्ही मला आधी गाऊन दाखवा.' खय्याम यांनी एक गाणं गाऊन दाखवलं. त्यावर आशाताई म्हणाल्या की जर 'असं गायचं असेल तर मला रियाजासाठी आणखी आठ दिवस द्यावेत.'

खय्याम यांनी आपल्या आवाजात कॅसेट रेकॉर्ड करून दिली आणि त्यांनी त्याप्रमाणे रियाज केला.

नंतर त्या स्टुडिओत आल्या. ज्या शैलीत त्या नेहमी गायच्या ती शैलीच खय्याम यांनी पूर्णपणे बदलली होती. तेव्हा त्यांना वाटलं की आपण असं तर कधी गात नाहीत. ही शैली योग्य ठरेल का?

खय्याम यांनी त्यांना विश्वास दिला आणि त्यांनी ते गाणं आणि पुढची गाणी तशी गायली.

जेव्हा त्यांनी या गाण्याचं रेकॉर्डिंग ऐकलं तेव्हा आशाताईंनाच विश्वास नव्हता बसत की हे आपण गायलं आहे.

'आजही इन आखो की मस्ती मैं' गाणं जेव्हा ऐकतो आणि जेव्हा ते गाणं जसं वर चढतं तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहतो.

ही तर आशाताईंची हिंदी गाणी झाली. पण त्यांची मराठी गाणी माझ्यासाठी एखाद्या खजिन्याहून कमी नाहीत.

मराठी गाण्यांची अवीट गोडी

'चांदण्यात फिरताना..' या सारखं दुसरं रोमँटिक गाणं असेल असं मला वाटत नाही. त्यात जेव्हा 'श्वास तुझा मालकंस' ही ओळ येते तेव्हा ते गाणं काही औरच झालेलं असतं.

जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं आणि आशाताईंनी गायलेलं 'साधी भोळी मीरा तुला' गाणं मी शेकडो वेळा ऐकलं असेल.

'फुलले रे क्षण माझे', 'ऋतू हिरवा', 'गेले द्यायचे राहून', 'मी मज हरपून बसले', 'केव्हा तरी पहाटे' अशी मराठीत त्यांनी गायलेली सगळीच गाणी मनाला वेगळाच आराम देतात. त्यांनी जी मराठी गाणी गायली ती आपण केवळ मराठी आहोत म्हणून आपल्याला ऐकता येतात आणि हे आपलं भाग्यचं आहे, असं म्हणत माझं मन त्यांना नकळत धन्यवाद देऊन जातं.

आता तर स्पॉटीफाय, युट्युब, गाना डॉट कॉम यावर शेकडो गायकांची गाणी क्लिक सरशी उपलब्ध आहेत. या नव्या माध्यमांमुळे आपल्याला आवडतं ते आपण स्वतःहून जाऊन ऐकू असं पण होत नाही. ट्रेंड्स, युट्युबचे अल्गोरिदम यांनी आपलं ऐकणं निश्चितच बदललं आहे पण या साऱ्या कोलाहलात आशाताईंचा धीर देणारा आवाज आहे याचं समाधान आहे.

आज मी 41 वर्षांचा आहे आणि किमान गेल्या तीस वर्षांपासून त्यांची गाणी आधी नकळत, नंतर जाणीवपूर्वक ऐकत आलो आहे. नव्वदीच्या काळात मोठं होताना सोबत त्यांचे सूर नसते तर माझं काय झालं असतं ही भीती माझी पाठ सोडत नाही.

12 एप्रिल 2026 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचा रेकॉर्डेड आवाज हा माझ्यासोबत तर नेहमीच राहील, पण आता ते ऐकताना मनात माझ्या येईलच की आशाताई आपल्याला सोडून गेल्या आहेत.

पण जाताना भरभरून कसं जगायचं, 'या जगण्यावर शतदा कसं प्रेम करायचं' हे सांगून त्या गेल्या ही गोष्ट पण माझ्या आठवणीत कायम राहील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)