You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेली केरळची नर्स अजूनही वाचू शकते, 'हे' आहेत पर्याय
- Author, इमरान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
केरळमधील निमिषा प्रिया या पेशाने नर्स असलेल्या महिलेला येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. येमेनमधील एका नागरिकाची हत्या केल्याचा आरोपाखाली निमिषा सध्या येमेनमधील तुरुंगात आहेत.
निमिषा यांचे पती आणि इतर कुटुंबीय तिची सुटका करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत.
येमेनमधील युद्धजन्य परिस्थिती, तिथले कायदे या सर्व प्रतिकूल गोष्टींच्या पार्श्वभूमीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
निमिषा प्रिया या केरळमधून येमेनला का गेल्या होत्या, हत्येचं प्रकरण काय आहे, निमिषा यांची कौटुंबिक स्थिती काय आहे, त्यांचे कुटुंबीय कशाप्रकारे प्रयत्न करत आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
निमिषा प्रिया या भारतीय नर्स आहेत. येमेनमध्ये आपल्या व्यावसायिक भागीदाराची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
येमेनच्या सर्वोच्च ज्युडिशियल कौन्सिलनं निमिषा प्रिया यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशद मुहम्मद अल-अलीमी यांनी या शिक्षेला मंजुरी दिली आहे. मात्र, असं असलं तरी निमिषा प्रिया यांना स्वत:चा जीव वाचवण्याचा एक पर्याय अजूनही उपलब्ध आहे.
राष्ट्राध्यक्ष रशद मुहम्मद अल-अलीमी यांनी देखील निमिषा यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला मंजुरी दिल्याची बातमी येमेनमधून आल्यानंतर केरळच्या कोचीमधील निमिषा यांचं कुटुंब अस्वस्थ, चिंताग्रस्त झालं.
मात्र, निमिषा यांच्या कुटुंबाच्या वकिलाचं म्हणणं आहे की, नर्स निमिषा यांना माफी मिळवून देण्यासाठी मृताच्या कुटुंबाशी चर्चा करण्याचा पर्याय अजूनही खुला आहे.
निमिषा यांच्या वकिलानं काय सांगितलं?
निमिषा प्रिया यांच्या कुटुंबाचे दिल्लीतील वकील सुभाष चंद्रन यांनी बीबीसीला सांगितलं की, "अजूनही मृताच्या कुटुंबाला 'ब्लड मनी' (नुकसान भरपाई म्हणून दिलेली रक्कम) च्या रुपात पैसे देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे."
"मृताच्या किंवा पीडिताच्या कुटुंबाबरोबर आमची चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मात्र, ही बाब फक्त भारत सरकारच्या मदतीनंच शक्य होऊ शकते. आम्ही स्वत: मृताच्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकत नाही."
येमेनमध्ये हा असा देश आहे, जिथे शरिया कायद्याचं पालन होतं.
त्यामुळे येमेनमध्ये आरोपीला देण्यात आलेली शिक्षा तेथील सरकार तेव्हाच माफ करू शकतं, जेव्हा पीडितावर किंवा मृतावर हल्ला करणारी व्यक्ती, मृताच्या कुटुंबाला 'ब्लड मनी' रुपात पैसे देण्यासाठी तयार होतो आणि त्या कुटुंबाची त्यासाठी संमती असते.
येमेनमध्ये हूती बंडखोरांमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे एप्रिल 2015 पासून भारतानं आपला दूतावास सनामधून हलवला होता.
निमिषा प्रिया यांचे वकील सुभाष चंद्रन म्हणाले, "मृताच्या कुटुंबाबरोबर वाटाघाटी करवून देत असलेल्या वकिलाला आम्ही आधीच दोन हफ्त्यांमध्ये 40 हजार अमेरिकन डॉलर (जवळपास 38 लाख रुपये) दिले आहेत."
"आम्ही पहिल्यांदा त्यांना 20 हजार अमेरिकन डॉलर (जवळपास 19 लाख रुपये) दिले होते. ही काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. त्यानंतर गेल्या शुक्रवारी (27 डिसेंबर) आम्ही त्यांना आणखी 20 हजार अमेरिकन डॉलर (जवळपास 19 लाख रुपये) दिले आहेत."
"पहिला हफ्ता जिबूती मध्ये दिला होता. त्यानंतर दूतावास सौदी अरेबियातील रियाधमध्ये स्थलांतरित झाला होता. त्यामुळे दुसरा हफ्ता तिथे देण्यात आला."
निमिषा प्रिया यांची कहाणी
निमिषा प्रिया यांचं वय फक्त 19 वर्षे असतानाच म्हणजे 2008 मध्ये त्या येमेनला गेल्या होत्या. कारण त्यांना त्यांच्या आईचं आयुष्य सुखकारक करायचं होतं. त्यांची आई त्यावेळेस घरकाम करायची.
निमिषा यांच्या आई प्रेमा कुमारी (वय वर्षे 57) आज सना (येमेन) मध्येच आहेत आणि आपल्या मुलीला माफी मिळण्याची वाट पाहत आहेत. निमिषा प्रिया यांना 13 वर्षांची एक मुलगी देखील आहे.
येमेनला गेल्यानंतर तीन वर्षांनी, टॉमी थॉमस या एका ऑटोचालकाशी लग्न करण्यासाठी निमिषा प्रिया कोचीला परत आल्या होत्या. लग्नानंतर टॉमी थॉमस आणि निमिषा दोघेही येमेनला गेले होते.
येमेनमध्ये थॉमस यांनी एका इलेक्ट्रिशियनचा मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
त्यानंतर 2012 मध्ये निमिषा यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे थॉमस केरळमध्ये परतले होते. कारण येमेनमध्ये मुलीचं संगोपन करणं थॉमस यांच्यासाठी कठीण होतं.
काही काळानंतर 2014 मध्ये निमिषा यांनी एका बिझनेस पार्टनरसह येमेनमध्येच स्वत:चं क्लिनिक सुरू केलं. त्याआधी त्या एका क्लिनिकमध्ये नर्स म्हणून काम करत होत्या. येमेनमध्ये स्थानिक भागीदार असल्यावरच व्यवसाय सुरू करता येतो.
निमिषा यांचे स्थानिक भागीदार होते, तलाल अब्दो महदी हे येमेनमधील नागरिक.
निमिषा जेव्हा आपल्या मुलीच्या बाप्टिस्टासाठी कोचीला आल्या होत्या, तेव्हा महदीसुद्धा त्यांच्यासोबत कोचीला आले होते.
दिल्ली उच्च न्यायालयात निमिषा यांच्या कुटुंबानं दाखल केलेल्या याचिकेनुसार, महदी जेव्हा निमिषाच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी कथितरित्या निमिषा यांच्या लग्नाचे फोटो चोरले होते.
या याचिकेनुसार, यानंतर महदी यांनी असं चित्र निर्माण केलं की निमिषा यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. निमिषा यांच्यावर शारीरिक 'अत्याचार' केल्याचा आणि क्लिनिकमधून मिळणारं सर्व उत्पन्न हिसकावून घेतल्याचा आरोपदेखील मेहदी यांच्यावर आहे.
निमिषा यांचे पती टॉमी थॉमस यांनी बीबीसीला सांगितलं, "येमेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर भारत सरकारनं येमेनमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली, त्यानंतर महदी यांची वर्तणूक बदलली."
"निमिषा येमेन सोडू शकत नव्हत्या. कारण येमेनमध्ये स्वत:चं क्लिनिक सुरू करण्यासाठी त्यांनी उसनवारीनं पैसे घेतले होते. महदी जेव्हा आमच्या घरी आले होते, तेव्हा ते एक चांगले व्यक्ती होते. त्यांना पत्नी आणि मुलं देखील होती."
2017 मध्ये महदी यांना बेशुद्ध करण्याचं औषध अधिक प्रमाणात दिल्याचा आणि कथितरित्या महदी यांच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप निमिषा यांच्यावर लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.
निमिषाच्या मुलीचे हृदयद्रावक प्रश्न
निमिषा यांचे पती टॉमी थॉमस कोचीमध्ये ऑटो रिक्षा चालवतात.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "27 डिसेंबरला आमची मुलगी 13 वर्षांची झाली. ती वडिलांना विचारते की, तिचं आईशी काही बोलणं झालं होतं का? कारण ती दोन वर्षांची होती तेव्हापासून तिनं आपल्या आईला पाहिलेलं नाही."
"ती जेव्हा छोटी होती, तेव्हा आम्ही तिला सांगितलं होतं की, तिची आई तुरुंगात आहे. कारण तिच्या आईवर एका अशा गुन्ह्याचा आरोप आहे, जो तिने केलेला नाही. आम्ही तिला एका हॉस्टेलमध्ये ठेवलं आहे. कारण मी ऑटो रिक्षा चालवतो. तेव्हा ती एकटी राहू शकत नाही."
थॉमस म्हणाले, "प्रत्येक मंगळवारी, ती आपल्या आईशी बोलते. तेव्हा तिचा पहिला प्रश्न हाच असतो की आई परत कधी येणार?"
"जर मी तिच्या आईला फोन करायला विसरलो तर माझी मुलगी खूपच चिडते. तिच्या वाट्याला आईचं प्रेम आलेलं नाही. तिला आईची उणीव भासते."
थॉमस म्हणाले, "काल (31 डिसेंबर), दुपारी मी माझ्या पत्नीशी बोललो होतो. नंतर संध्याकाळी आम्ही येमेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेबद्दल ऐकलं."
"निमिषा जेव्हा मला फोन करते, तेव्हा ती पहिला प्रश्न हाच विचारते की आमची मुलगी काय करते आहे. ती तर तुरुंगात आहे. बाहेर काय घडतं आहे, हे तिला माहितच नाही."
त्यांनी सांगितलं की महदी यांच्या कुटुंबाला वकिलानं तडजोड म्हणून जो 'ब्लड मनी' किंवा रक्कम दिली आहे, ती सेव्ह निमिषा इंटरनॅशनल कौन्सिलच्या माध्यमातून गोळा करण्यात आली होती.
थॉमस किंवा सेव्ह निमिषा इंटरनॅशनल कौन्सिल, महदी यांच्या कुटुंबाशी थेट संपर्क करू शकत नाहीत. कारण येमेनमधील कायदे अतिशय कडक आहेत.
थॉमस म्हणाले, "येमेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्ही पीडित किंवा मृताच्या कुटुंबाला भेटू शकत नाही. तिथला कायदा असा आहे की जर जीव गेला किंवा हत्या करण्यात आली तर त्यासाठी एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यूदंडाची."
"तिथली व्यवस्था अशीच आहे. त्यामुळे आम्ही येमेनमधील स्थानिक नेते आणि शेख यांच्याशी चर्चा करत आहोत की त्यांनी आमच्या बाजूनं मृताच्या कुटुंबाशी चर्चा करावी."
अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील थॉमस यांना अजूनही आशा आहे. ते म्हणाले, "माझं मन सांगतं की आम्हाला निमिषाला वाचवण्यात यश येईल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)